Sambhajinagar : जलवाहिनीत फसले रस्ते, मुख्य मार्गांची लागली ‘वाट’

Sambhajinagar
SambhajinagarTendernama

छत्रपतीं संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामामुळे शहरातील प्रमुख आणि अंतर्गत रस्त्यांची वाट लागल्याने त्यावरून मार्गक्रमण करणाऱ्या दुचाकीस्वार वाहनचालकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. संबंधित यंत्रणेकडून महत्प्रयासाने झालेले गुळगुळीत रस्ते विद्रूप होऊन त्यांची धड दुरुस्तीही न केल्याने नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे शहरातील सर्वच प्रमुख आणि अंतर्गत रस्ते पाणी पुरवठा योजनेत फसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

Sambhajinagar
Sambhajinagar : अखेर 'त्या' भागातील मलनिःसारण वाहिनीचे काम पूर्ण; नागरिकांना दिलासा

शहरात मागील तीन ते चार वर्षांपासून पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू आहे. या वेळी जे मार्ग उखरून काम करण्यात आले, ते पूर्वीप्रमाणे न करता थातूरमातूर माती टाकून बुजवले आहेत. यामुळे वाहनचालकांना वाहन चालवताना अडचणी येत असून, अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. या कामांमुळे शहरातील धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कांचनवाडी ते सातारा - देवळाई, रेल्वे स्टेशन ते बसस्थानक, विश्रांती चौक ते गोपाल स्वीट भांडार, गांधीनगर ते राजा बाजार, कामगार चौक ते महालक्ष्मी चौक, जालनारोड ते सोहम मोटर्स ते महालक्ष्मी चौक, कामगार चौक ते उच्च न्यायालय,महावीर चौक ते कॅम्ब्रीज, सातारा - देवळाई, हर्सुल टी पाॅईंट ते जिल्हाधिकारी कार्यालय व अन्य परिसरातील अंतर्गत रस्त्यांसह रेणुकामाता मंदिर कमान ते अहिल्याबाई होळकर चौक ते म्हाडा काॅलनी ते देवळाई, बीड बायपास सह शहरातील बहुतांश मुख्य मार्ग तसेच अंतर्गत मार्ग खराब झालेले आहेत. या मार्गांंची सुधारणा करण्यासाठी पाणी पुरवठा योजनेचे काम करत असलेल्या कंत्राटदाराने महानगरपालिकेला त्यांचेच काम असल्याचे म्हणत अजूनही पैसे भरले नाहीत, दुसरीकडे महानगरपालिकेच्या तिजोरीचा अंदाज बघता त्यामुळे तूर्तास हे मार्ग सुस्थितीत होण्याची शक्यता नाही. यातच आता आगामी काळात पाऊस कोसळल्यामुळे ही माती रस्त्यांवर पसरून अपघाताला आमंत्रण दिले जाणार आहे.

Sambhajinagar
Sambhajinagar : कोट्यवधींचा खर्च पाण्यात; फुटपाथवर वाहनांचा ताफा, शहरभर वाहतूक कोंडी

शहरासाठी २०१९ मध्ये पाणी पुरवठा योजना मंजूर झाली आहे. यामध्ये जवळपास दिड हजार किलोमीटरचे पाणी पुरवठा योजनेद्वारे शहरातील रस्ते पाईप गाडण्यासाठी खोदले जात आहेत. मात्र, तब्बल चार वर्षांनंतरही पाणी पुरवठा योजनेचे काम पूर्णत्वास आले नाही. ही शोकांतिकाच आहे. कारण या योजनेसाठी अजूनही पुरेसा निधी आलेला नाही. दरम्यान, काही दिवसांपूर्वी  अर्धवट कामासाठी केंद्र सरकारने अमृत -२ योजनेंतर्गत महानगरपालिकेचाही वाटा उचलला. १६८० कोटीची ही योजना २७४० कोटींवर गेली. याच निधीमधून जुन्या शहरासह सिडको - हडको, गारखेडा, मुकुंदवाडी, चिकलठाणा, गारखेडा, उस्मानपुरा, कांचणवाडी, नारेगाव, ब्रीजवाडी, हर्सूल, नक्षत्रवाडी, विटखेडा, सातारा - देवळाई, भावसिंगपुरा, बेगमपुरा, पद्मपुरा, शहानूरवाडी,या महानगरपालिका हद्दीतील ९ झोन मधील ११८ वार्डातील मुख्य व अंतर्गत रस्त्यांवर गेल्या दोन वर्षांपासून टप्प्या टप्प्याने खोदकाम सुरू आहे.

काही रस्त्यांचे सरकारी अनुदानातून वर्षभरापूर्वीच काम झाले, पाणी पुरवठा योजनेंतर्गत काम असल्यामुळे रस्त्यांच्या अगदी मधोमध रस्ते फोडण्यात येत आहेत, कारण पाणी वाहून नेण्यासाठी मोठ्या व्यासाचे पाइप त्याच्यामध्ये टाकणे आवश्यक आहे. पाणी पुरवठा योजनेंतर्गत काम होत आहे, ही चांगली बाब आहे, कारण गेल्या कित्येक वर्षांपासून तहाणलेल्या छत्रपती संभाजीनगर वासीयांची तहाण भागविण्याच्या, दृष्टीने आवश्यकच आहे. मात्र, हे काम झाल्यानंतर जे चांगले रस्ते उखरून ठेवले , त्यावर तीच माती टाकून तकलादू पद्धतीने बुझवण्यात आले आहेत. त्यावर डांबर किंवा काँक्रीट टाकण्यात आले नाही.

Sambhajinagar
Mumbai SRA : 'त्या' 33 हेक्टर जागेच्या विकासाद्वारे 16,575 झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन; एमएमआरडीएला 5 हजार अतिरिक्त घरे

दरम्यान, पाणी पुरवठा योजनेचे काम करताना अनेक ठिकाणी प्राणघातक खड्डे करून ठेवण्यात आले आहेत. ते अगदी रस्त्याच्या मधोमध तर कुठे रस्ता शोल्डरमध्ये आहेत. त्यावरही काही टाकण्यात आले नाही. त्यामुळे शहरातील कुठल्याही रस्त्यावर सध्या वाहन घेऊन जाणे म्हणजे अवघडच काम झाले आहे. त्यापेक्षाही अधिक गेल्या तीन वर्षांपासून रस्त्यातच पाईप ठेवल्याने अडचणीचे रस्ते सध्या झालेले आहेत. कारण हे शहरातील मुख्य मार्ग आहेत. शहरात येणारी आणि शहरातून जाणारी प्रत्येक महामंडळाची बस, शहर बस याशिवाय जिल्हाधिकारी कार्यालय, पोलिस आयुक्त कार्यालय यासह अन्य शासकीय कार्यालयाच्या दिशेने जाणारे हे प्रमुख मार्ग असल्यामुळे या मार्गांवरून मोठ्या प्रमाणावरून वाहन जातात. याच मार्गांवर एका बाजूचे  मार्ग मधोमध उखरून त्यामध्ये जलवाहिनीचे काम करण्यात आले. शहरात बहूतांश रस्त्यांवर जलवाहिने टाकण्याचे काम आता पूर्ण झाले आहे. मात्र, रस्त्याची एक बाजू अंदाजे २५ फूट रुंदीची आहे, त्यापैकी रस्त्याची किमान १२ ते १३ फूट जागा या कामामुळे वापरात येत नसून, त्या ठिकाणी आता चारचाकी व दूचाकी वाहने पार्किंग करण्यात येत आहे. तसेच संपूर्ण रस्त्यांवर मातीच माती पसरली आहे. मुख्य रस्त्याची ही परिस्थिती झाल्यामुळे त्या ठिकाणाहून मोठे वाहन गेले की, दोन मिनिट दुचाकीचालकांना काहीच दिसत नाही, कारण सर्वत्र धूळच धूळ अंगावर येते. यातही रस्ते अरुंद झाले आहेत, त्यामुळे वाहनांची कोंडी होते.

यासर्व प्रकारामुळे एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे सर्व असले तरी काम पूर्ण हाेऊन आता अनेक महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला असताना रस्ते पूर्वस्थितीत करण्यासाठी कोणत्याही उपाययोजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून करण्यात आलेल्या नाहीत. कारण शहरातील काही रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या व महानगरपालिकेच्या  अखत्यारीतील आहेत, या मार्गांवर डांबरीकरण करून त्याला सुस्थितीत आणण्याचे काम कोण करणार आहे, याबाबत स्पष्टता नाही. त्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून संबंधित विभागांना छदामही दिला नाही.‌ जर ही कामे सार्वजनिक बांधकाम व महानगरपालिकेला करावयाची असल्यास किमान एक हजार कोटीहुन अधीक निधी लागेल. शिंदे सरकारने मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त आयोजित मंत्रीमंडळाच्या बैठकीच महापालिका प्रशासक तथा आयुक्त व स्मार्ट सिटीचे सीईओ जी. श्रीकांत यांना आता महानगरपालिका सक्षम करा, सरकारकडे अपेक्षा ठेऊ नका, यापूर्वी खुप दिले, असे सांगितल्याने सरकारकडून अपेक्षा नाही. त्यामुळे आता ही रक्कम मजीप्रा महानगरपालिकेला कुठुन कशी देणार, त्यानंतर साबांवि व महानगरपालिका कधी काम सुरू करणार याबाबत तूर्तास काही हालचाली नाही. ‘मजीप्रा’च्या या अंदाधुंद कारभारामुळे त्रास मात्र वाहनचालकांना होत आहे. यासंदर्भात "टेंडरनामा" प्रतिनिधीने मजीप्राच्या नियोजनशून्य कारभार्यांना विचारले असता टेंडरमध्ये रस्ते दुरुस्तीची तरतूद असल्याचे सांगितले जात आहे. मग तरतूद असताना रस्त्यांची कामे कंत्राटदाराकडून का केली जात नाहीत, यावर कारभारी बोलायला तयार नाहीत. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com