
नाशिक (Nashik) : येथील मिर्ची चौकात ऑक्टोबरमध्ये बस अपघातानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपघात रोखण्यासाठी सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार रेझिलीएंट इंडिया कंपनीने सर्वेक्षण करून महापालिकेला अहवाल सादर केला आहे. त्यात शहरात बाह्य रिंग रोड उभारणे, द्वारका ते दत्तमंदिर व मिरची चौक ते नांदूर नाका दरम्यान उड्डाणपुलाची आवश्यकता असल्याची शिफारस केली आहे. याबरोबरच शहरातील सिग्नलवर सीसीटीव्ही बसवून वेगाने जाणाऱ्या वाहनांना ई-चलन लागू करण्याचे अहवालात स्पष्ट केले आहे. दरम्यान महापालिकेनेही या शिफारशींची तातडीने अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. यामुळे लवकरच शहरातील सर्व ब्लॅकस्पॉटवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून वेगमर्यादा न पाळणाऱ्या वाहनांवर ई चलन कारवाई केली जाणार आहे.
शहर पोलिस प्रशासनने यापूर्वी महापालिकेला २८ अपघात ब्लॅक स्पॉटचा अहवाल सादर केला होता. त्यात २८ पैकी २६ ब्लॅक स्पॉटवर सिग्नलची नितांत आवश्यकता असल्याचे यापूर्वीच सांगितले होते. आता या सर्व सिग्नलवर सीसीटीव्ही बसवण्याची शिफारस करण्यात आली आहे. दरम्यान रेझिलीएंट इंडिया कंपनीने सर्वेक्षण अहवाल सादर केला असून त्यात तत्काळ करण्याच्या उपाययोजना व भविष्यकालीन उपाययोजना, अशा दोन प्रकारच्या शिफारशी केल्या आहेत. या अहवालात शहरातील २८ ब्लॅक स्पॉटवर अपघात कमी करण्यासाठी गतिरोधक, व्हाइट स्ट्रीप, झेब्रा क्रॉसिंग दिशादर्शक फलक, दृश्यमानता वाढवण्याच्या सूचना केल्या आहेत. शहरात ११४ किलोमीटर लांबीचे विविध राष्ट्रीय व राज्य महामार्ग असून, या मार्गावरील वाहतूक शहराबाहेरून बाह्य रिंगरोडच्या माध्यमातून वळवण्याची शिफारस केली आहे.
द्वारका चौक ते दत्त मंदिर व मिर्ची चौक ते नांदूरनाका या दरम्यान उड्डाणपूल उभारण्याची शिफारस केली आहे. त्याचप्रमाणे सतत अपघात होणाऱ्या २३ ब्लॅकस्पॉटच्या सिग्नलवर सीसीटीव्ही बसवण्याच्याही सूचना दिल्या आहेत. या सिग्नलवर नियमांचे उल्लंघण करणाऱ्या वाहनधारकांविरोधात ई चलन लागू करावे, अशी शिफारस केली आहे. सध्या स्मार्ट सिटी कंपनीकडून नाशिक शहरात सीसीटीव्ही बसवण्याचे काम सुरू असून ते पूर्ण झाल्यानंतर या ब्लॅकस्पॉटवरील सर्व सिग्नलवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे. वेगाची मर्यादा न पाळणे व सिग्नल तोडणे याबाबत ई चलन लागू केल्यानंतर आपोआप वाहनांचा वेग कमी होऊन अपघातांना आळा बसणार आहे. दरम्यान रेझिलीएंट इंडिया कंपनीने महापालिकेला सादर केलेल्या अहवालाच्या अनुषंगाने तातडीने उपाययोजना केल्या जाणार असल्याचे महापालिकेच्या बांधकाम विभागाने स्पष्ट केले आहे. तसेच मिर्ची चौकात उड्डाणपूल उभारण्याबाबतचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने राज्य सरकारला पाठवला आहे.