
मुंबई (Mumbai): वाढवण बंदरापर्यंत मालवाहू वाहनांना वेगवान कनेक्टिविटी देण्याच्या उद्देशाने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ३२.१८ किमी लांबीच्या महामार्गासाठी टेंडर काढले आहे. या विशेष महामार्गासाठी २५७५ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. टेंडर भरण्याची अंतिम मुदत २२ ऑक्टोबरपर्यंत आहे.
कंत्राटदाराला अडीच वर्षांत हा महामार्ग बांधून पूर्ण करायचा आहे. या महामार्गासाठी परिसरातील २४ गावांमधील ४१३ हेक्टर जमीन संपादित होत आहे. त्यापैकी २२ गावांमधील एकूण ९० टक्के जमीन 'एनएचएआय'च्या ताब्यात आलेली आहे.
डहाणूजवळ वाढवण हे तब्बल २.२५ कोटी कंटेनर हाताळणी क्षमतेचे बंदर विकसित करण्यात येणार आहे. या बंदरापर्यंत मालवाहू वाहनांना वेगाने पोहोचण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग ४८वरील (मुंबई-अहमदाबाद महामार्ग) तवा जंक्शन ते वाढवणच्या दक्षिणेकडील वरोरदरम्यान ३२.१८ किमी लांबीच्या विशेष महामार्गाचे नियोजन 'एनएचएआय'ने केले आहे.
सविस्तर प्रकल्प आराखड्यात, 'डीपीआर'नुसार या महामार्गाचा खर्च ३४८५.९९ कोटी रुपये होता. त्यात ८९७ कोटी रुपये निव्वळ भूसंपादन खर्च होता. बांधकामाचा खर्च २५५८ कोटी रुपये निश्चित होता. प्रत्यक्ष टेंडरमध्ये त्यात १८ कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
टेंडरची अखेरची तारीख २२ ऑक्टोबर आहे. कंत्राटदाराला कार्यादेश दिल्यानंतर अडीच वर्षांत हा महामार्ग बांधून पूर्ण करावा लागेल. त्यानंतर दहा वर्षे बांधकामाच्या दुरुस्ती व देखभालीची जबाबदारीही कंत्राटदारावरच असेल. हा प्रवेश नियंत्रित पथकरआधारित महामार्ग असेल. सुरुवातीला चौपदरी असून, तो भविष्यात गरजेनुसार आठ पदरी विस्तारित करता येईल, या पद्धतीने त्याचे बांधकाम केले जाणार आहे.
या विशेष महामार्गाच्या ३२.१८ किमीदरम्यान बांधकामाधीन बुलेट ट्रेन मार्गाला सुमाडी येथे, रेल्वेच्या डेडीकेटेड फ्रेट कॉरिडोर व सध्याच्या पश्चिम रेल्वेमार्गाला बावडा व वाणगाव येथे, बांधकामाधीन बडोदा-मुंबई द्रुतगती मार्गाला चिंचारे येथे, असे चारच प्रवेश महामार्गावर असतील. यानंतर हा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग ४८ (मुंबई-अहमदाबाद रस्ता) ला तवा येथे जोडला जाईल.
या महामार्गासाठी २४ गावांमधील ४१३ हेक्टर जमीन संपादित होत आहे. त्यापैकी २२ गावांमधील एकूण ९० टक्के जमीन 'एनएचएआय'च्या ताब्यात आली असून, कंत्राटदार अंतिम होईपर्यंत उर्वरित जमीनही ताब्यात येईल, असे 'एनएचएआय'च्या मुंबई प्रादेशिक कार्यालयांतर्गत पनवेल युनिटचे प्रमुख यशवंत घोटकर यांनी सांगितले. याच युनिटअंतर्गत हा महामार्ग उभारण्यात येत आहे.