
मुंबई (Mumbai): मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला एक मोठे यश मिळाले आहे. नॅशनल हाय स्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड, एनएचएसआरसीएलने महाराष्ट्रातील बुलेट ट्रेन कॉरिडॉरवर 40 मीटर लांबीचा पहिला प्री-स्ट्रेस्ड काँक्रिट बॉक्स गर्डर यशस्वीपणे लॉन्च केला आहे.
हे काम पालघर जिल्ह्यातील डहाणू जवळच्या सखारे गावात झाले. हा गर्डर फुल स्पॅन लॉन्चिंग गँट्री तंत्रज्ञानाचा वापर करून लॉन्च करण्यात आला. बुलेट ट्रेन हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून तो 2026 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
एनएचएसआरसीएलने दिलेल्या माहितीनुसार, शिळफाटा आणि गुजरात-महाराष्ट्र सीमेदरम्यान 13 कास्टिंग यार्ड बांधले जाणार आहेत, ज्यापैकी 5 यार्ड सध्या कार्यरत आहेत. हे तंत्रज्ञान एप्रिल 2021 पासून या प्रकल्पात वापरले जात आहे आणि यामुळे गुजरातमध्ये 319 किलोमीटर लांबीच्या व्हायाडक्टचे काम पूर्ण झाले आहे.
प्रत्येक 40 मीटर लांबीचा पी.एस.सी. बॉक्स गर्डर सुमारे 970 मेट्रिक टन वजनाचा आहे, जो भारतीय बांधकाम उद्योगातील सर्वात जड गर्डर आहे. हे गर्डर एकाच युनिटमध्ये तयार केले जातात आणि त्यात कोणतेही जोड नसतात. ते तयार करण्यासाठी 390 क्यूबिक मीटर काँक्रीट आणि 42 मेट्रिक टन स्टीलचा वापर होतो. बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी फुल-स्पॅन गर्डर जास्त उपयुक्त आहेत, कारण ते सेगमेंटल गर्डरपेक्षा 10 पट वेगाने काम पूर्ण करू शकतात.
फुल-स्पॅन प्री-कास्ट बॉक्स गर्डर लॉन्च करण्यासाठी स्ट्रॅडल कॅरियर, ब्रिज लॉन्चिंग गँट्री, गर्डर ट्रान्सपोर्टर आणि लॉन्चिंग गँट्री अशा विशेष मशीन्सचा वापर केला जात आहे. गर्डरच्या पुरवठ्यात कोणताही व्यत्यय येऊ नये म्हणून ते अगोदरच कास्टिंग यार्डमध्ये तयार करून ठेवले जात आहेत.
सध्या महाराष्ट्रात बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. ठाणे, विरार आणि बोईसर या तिन्ही उन्नत स्टेशनवर काम वेगाने सुरू आहे. विरार आणि बोईसर स्टेशनसाठी पहिला स्लॅब टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. पिलर फाउंडेशन आणि पिलरचे काम अनेक ठिकाणी सुरू असून, आतापर्यंत सुमारे 48 किलोमीटरचे पिलर बांधले गेले आहेत.
फुल स्पॅन बॉक्स गर्डर लॉन्चिंगच्या माध्यमातून डहाणू परिसरात व्हायाडक्टचे बांधकाम सुरू झाले आहे. पालघर जिल्ह्यात 7 डोंगराळ बोगद्यांचे खोदकाम सुरू असून, 6 किलोमीटर लांबीच्या बोगद्यापैकी 2.1 किलोमीटरचे खोदकाम पूर्ण झाले आहे. वैतरणा, उल्हास आणि जगदनी नद्यांवरील पुलांचे बांधकाम सुरू झाले आहे.
मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स आणि शिलफाटा यांच्यादरम्यान 21 किलोमीटर लांबीची भारतातील पहिला भूमिगत/समुद्रतळ बोगदा तयार होत आहे. या 21 किलोमीटरच्या बोगद्यापैकी 16 किलोमीटरचे काम टनेल बोरिंग मशीनद्वारे, तर उर्वरित 5 किलोमीटरचे काम न्यू ऑस्ट्रेलियन टनेलिंग मेथड तंत्रज्ञानाने केले जाईल. यात ठाणे खाडीतील 7 किलोमीटर लांबीच्या समुद्रतळ बोगद्याचाही समावेश आहे.
मुंबई बुलेट ट्रेन स्टेशनचे किती काम झाले?
शिळफाटा येथून न्यू ऑस्ट्रेलियन टनेलिंग मेथडद्वारे 4.65 किलोमीटर बोगद्याचे खोदकाम पूर्ण झाले आहे. विक्रोळी (56 मीटर खोलीवर) आणि सावली शाफ्ट (39 मीटर खोलीवर) येथे बेस स्लॅबचे कास्टिंग पूर्ण झाले आहे. शाफ्टच्या ठिकाणी स्लज ट्रीटमेंट प्लांट बसवला जात आहे. महापे टनेल लाइनिंग कास्टिंग यार्डमध्ये टनेल लाइनिंग सेगमेंट तयार केले जात आहेत. वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये बनत असलेल्या मुंबई बुलेट ट्रेन स्टेशनच्या 83% खोदकामाचे काम पूर्ण झाले आहे. स्टेशनच्या दोन्ही बाजूला 100 फूट खाली बेस स्लॅब कास्टिंग सुरू झाले आहे.
बुलेट ट्रेन कधी सुरू होईल?
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मार्च महिन्यात सांगितले होते की, बुलेट ट्रेन प्रकल्प 2026 पर्यंत तयार होईल. सुरुवातीला सुरत आणि बिलिमोरा दरम्यान सेवा सुरू होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे तत्कालीन पंतप्रधान शिंजो आबे यांनी 14 सप्टेंबर 2017 रोजी अहमदाबादमध्ये या प्रकल्पाचा शुभारंभ केला होता. भारतात हाय-स्पीड रेल कॉरिडॉरच्या निधी, बांधकाम, देखभाल आणि व्यवस्थापनासाठी नॅशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडची स्थापना 12 फेब्रुवारी 2016 रोजी कंपनी अधिनियम, 2013 अंतर्गत करण्यात आली होती.