
पुणे (Pune): पुण्याच्या मध्यवर्ती भागातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी भूमिगत रस्त्यांचे काम प्रस्तावित आहे. छत्रपती शिवाजी महाराज रस्ता व बाजीराव रस्ता रस्त्यावर भूमिगत रस्त्याचे सविस्तर प्रकल्प अहवालाचे काम (डीपीआर) अंतिम टप्प्यात आले होते. मात्र, नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रस्ता ज्या विभागाचा असेल, त्यांनीच त्याचे काम करण्याच्या सूचना दिल्याने बांधकाम विभागाकडून याला ‘ब्रेक’ लागला आहे.
आता या रस्त्याचा ‘डीपीआर’ व भूमिगत रस्त्याचे काम पुणे महापालिकेलाच करावे लागणार आहे. यामुळे या कामाला आणखी विलंब लागण्याची शक्यता आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून गेल्या काही महिन्यांपासून छत्रपती शिवाजी महाराज रस्ता व बाजीराव रस्त्यावर भुयारी मार्गासाठी ‘डीपीआर’ तयार करण्याचे काम सुरू होते. येत्या काही दिवसांत ‘डीपीआर’ सादर झाला असता; पण आता मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलेल्या निर्णयामुळे आता पुणे महापालिकेलाच हे काम करावे लागणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज रस्ता व बाजीराव रस्त्यावरून दररोज सुमारे २० हजारांहून अधिक वाहनांची वाहतूक होते. हे दोन्ही रस्ते अत्यंत वर्दळीचे व दाटीवाटीचे आहेत. त्यामुळे या रस्त्यावर उड्डाणपूल बांधणे अथवा रस्त्याची रुंदी वाढविणे शक्य नाही. परिणामी, या रस्त्यांवर भूमिगत रस्ता तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे भूमिगत रस्त्यांचे प्रस्ताव मांडण्यात आले. त्यानंतर शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पुण्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला याचा ‘डीपीआर’ सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार काम सुरू होते; पण आता नव्याने ही यंत्रणा राबवावी लागणार आहे.
मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन केले जाईल. मात्र, तत्पूर्वी आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहोत. यात आवश्यक ती चर्चा होऊन पुढील निर्णय घेतला जाईल.
- नवलकिशोर राम, आयुक्त, पुणे महापालिका
छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर शनिवार वाडा ते स्वारगेट व बाजीराव रस्त्यावरील सारसबाग ते शनिवार वाडा भूमिगत रस्त्याच्या ‘डीपीआर’चे काम सुरू होते. मात्र, मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचनेनुसार आता या रस्त्याचे काम पुणे महापालिका करणार आहे.
- भरतकुमार बाविस्कर, अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, पुणे