
पुणे (Pune): दिवसेंदिवस विस्तारणाऱ्या पुणे शहरात रिक्षांची संख्याही झपाट्याने वाढली. मात्र, त्या तुलनेत थांब्याची संख्या मात्र घटली आहे.
प्रादेशिक परिवहन समितीने नुकतेच ६९५ थांब्यांना मंजुरी दिली आहे. यात काही थांबे सध्या अस्तित्वात असलेले आहेत तर काही नव्याने दिले आहेत. पण हे थांबे मंजूर करताना आधीचे थांबे रद्द करण्यात आले आहेत.
पूर्वी पुण्यात रिक्षा थांब्याची संख्या ९५० होती, ती आता ६९५ झाली आहे. सद्यःस्थितीत पुण्यात १ लाख ४० हजार रिक्षा असून, त्यांच्यासाठी थांबे वाढविण्याची गरज असताना, थांब्याची संख्या मात्र घटली आहे. यामुळे रिक्षा संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. याचा फटका प्रवाशांसह रिक्षा चालकांनादेखील बसणार आहे.
पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालय, वाहतूक पोलिस व पुणे महापालिका यांच्यावतीने काही दिवसांपूर्वी रिक्षा थांब्यासंदर्भात फेर सर्वेक्षण करण्यात आले. यात ६९५ रिक्षा थांब्याचे ठिकाण सुचविण्यात आले. त्याला नुकतेच प्रादेशिक परिवहन समितीने मंजुरी दिली आहे. नव्या ठिकाणांचा समावेश झाला असला तरीही व्यवहार्य नसल्याचे रिक्षा संघटनांचे म्हणणे आहे.
रिक्षा थांब्याचे क्षेत्र निवडताना पोलिस ठाण्याची हद्द विचारात घेतली आहे. ४१ पोलिस ठाण्याच्या हद्दीचा विचार केला आहे. मात्र, हा निकष योग्य नसल्याचा आरोप रिक्षा संघटनांनी केला आहे. त्यामुळेच पुण्यात रिक्षा थांब्याची संख्या ३५५ ने घटली आहे.
थांब्यांना का लागलाय ब्रेक ?
- रस्त्यावर वाहनांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ
- दुचाकींच्या पार्किंगचा प्रश्न गंभीर
- रस्त्याच्या दुतर्फा विक्रेते, हातगाड्या लागल्याने जागाच नाही
- वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याने रिक्षा थांबा हलविणे अथवा रद्द करण्याचा निर्णय
रिक्षांची संख्या वाढत असताना थांब्याची संख्या कमी झाली आहे. हे अत्यंत चुकीचे आहे. ‘आरटीओ’चे सर्वेक्षण अपुरे आहे. अपुऱ्या सर्वेक्षणाच्या आधारे रिक्षा थांब्याची संख्या निश्चित करणे हे चुकीचे आहे. आम्ही लवकरच आरटीओ अधिकाऱ्यांना भेटणार आहोत. थांबे वाढावेत हीच आमची मागणी आहे.
- नितीन पवार, सरचिटणीस, रिक्षा पंचायत, पुणे
रिक्षा थांब्यासदंर्भात आम्ही संयुक्त सर्वेक्षण करून, त्याचा अहवाल प्रादेशिक परिवहन समितीसमोर मांडला. त्याला मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार पुणे महापालिका जागेची उपलब्धता करणार आहे. थांबा ठरविताना वाहतुकीला अडथळा ठरणार नाही, याचा प्रामुख्याने विचार केला.
- स्वप्नील भोसले, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे.