साधुग्रामसाठी १,२८२ एकर जमीन तात्पुरती ताब्यात घेणार; जिल्हा प्रशासनाची तयारी सुरू

नांदूर-दसक, आगरटाकळी परिसरातील १२५ गटांमधील १,१९० एकर ११ आर आणि मठ-मंदिरांच्या १४ गटांतील ९१.९६ एकर जमीन तात्पुरती ताब्यात घेण्याचे नियोजन
सिंहस्थ कुंभमेळा नाशिक
simhastha maha Kumbh Nashik, sadhugramTendernama
Published on

नाशिक (Nashik): नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील विस्तारित साधुग्राम आणि संलग्न सुविधांसाठी खासगी जमीन तात्पुरत्या स्वरूपात ताब्यात घेण्याच्या प्रक्रियेला जिल्हा प्रशासनाने वेग दिला आहे. साधुग्रामसाठी एकूण १ हजार २८२ एकर खासगी जमीन भाडेतत्त्वावर तात्पुरती ताब्यात घेण्याचे नियोजन असून, याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भूसंपादन शाखेने महापालिका आयुक्तांसह संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांना सविस्तर मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.

नांदूर-दसक, आगरटाकळी आणि परिसरातील १२५ गटांमधील सुमारे १ हजार १९० एकर ११ आर जमीन संलग्न सुविधांसाठी वापरण्यात येणार आहे. तर साधुग्रामसाठी ट्रस्ट आणि मठांच्या मालकीच्या १४ गटांमधील सुमारे ९१.९६ एकर जमीन तात्पुरत्या वापरासाठी घेण्याचे प्रस्तावित आहे.

सिंहस्थ कुंभमेळा नाशिक
गारगाई-देव नदीजोड प्रकल्प फास्टट्रॅकवर; पाच धरणांच्या तांत्रिक तपासणीसाठी ४.५७ कोटींचे टेंडर

तपोवनातील ३७७ एकर आरक्षण

नाशिकमध्ये दर बारा वर्षांनी होणाऱ्या सिंहस्थाच्या काळात साधुग्राम उभारण्यासाठी नाशिक महापालिकेने तपोवन परिसरात ३७७ एकर क्षेत्रावर आरक्षण टाकले आहे. त्यापैकी ९४ एकर क्षेत्र महापालिकेने यापूर्वीच ताब्यात घेतले आहे. उर्वरित २८३ एकर क्षेत्र मागील २०१५च्या सिंहस्थात वर्षभरासाठी भाडेतत्त्वावर घेण्यात आले होते.

यावेळी तपोवनातील साधुग्रामसाठी आरक्षित असलेल्या २८३ एकर क्षेत्रापैकी १९१.२१ एकर जमीन संपादनासाठी राज्य सरकारने यापूर्वीच २,२६७ कोटी रुपये मंजूर केले आहेत. या आरक्षित क्षेत्रातील ९१.९६ एकर जमीन मठ आणि आश्रमांच्या मालकीची आहे.

त्यामुळे या जमिनीचे संपादन करण्याऐवजी सिंहस्थाच्या कालावधीत ती तात्पुरत्या स्वरूपात भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्याचबरोबर विस्तारित साधुग्रामसाठी १ हजार १९० एकर ११ आर जमीनही तात्पुरत्या भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहे.

सिंहस्थ कुंभमेळा नाशिक
Nashik: पीटीसीसमोरील ६२ एकर जमीन प्रकरणाला नवे वळण; जमीन वाचवण्यासाठी यूएलसी घोटाळा

मोजणीपासून ताब्यापर्यंत व्हिडिओ चित्रण

जमीन ताब्यात घेण्यापूर्वी संबंधित जमिनीचा मालकी हक्क, क्षेत्रफळ आणि विद्यमान बांधकामांची अचूक पडताळणी केली जाणार आहे. भूधारकांच्या उपस्थितीत संयुक्त मोजणी करून झाडे, पिके, विहिरी, जलवाहिन्या, घरे, गोठे आणि शेततळी यांची नोंद घेतली जाणार आहे.

मोजणीपासून जमीन ताब्यात घेणे आणि कुंभमेळ्यानंतर ती संबंधितांना परत करण्यापर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रण बंधनकारक करण्यात आले आहे. जागेचे अक्षांश-रेखांश नोंदवून जिओ-टॅग छायाचित्रे पंचनाम्यासोबत जोडली जाणार आहेत.

मोजणीवेळी भोगवटादारांसह स्थानिक पंच, कृषी, सार्वजनिक बांधकाम, वनविभाग आणि भूमी अभिलेख विभागाच्या प्रतिनिधींची उपस्थिती आणि स्वाक्षरी आवश्यक राहणार आहे. साधुग्रामच्या मोजणीवेळी महापालिकेसह जीवन प्राधिकरणाच्या प्रतिनिधींचीही उपस्थिती राहणार आहे.

भाडेपट्टा आणि नुकसानभरपाई वेळेत देण्याच्या सूचना

विहित मुदतीत अंतिम निवाडा जाहीर करून निश्चित भाडेपट्टा अथवा नुकसानभरपाई वेळेत अदा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. न्यायालयीन आदेशानुसार वाढीव मोबदला आणि अन्य खर्चासाठी आवश्यक निधीची तरतूद महापालिकेला करावी लागणार आहे.

ही संपूर्ण कार्यवाही महापालिकेच्या विकास योजना आराखडा २०१७ मधील तरतुदींनुसार आणि कुंभमेळा प्राधिकरणाच्या प्रस्तावानुसार केली जाणार आहे.

सिंहस्थ कुंभमेळा नाशिक
नाशिकमध्ये टीडीआर धोरणाचा परिणाम; रुग्णालये, उद्याने, मैदानांसाठी पावणे नऊ एकर जमीन उपलब्ध

Key Points

  • सिंहस्थासाठी साधुग्राम आणि संलग्न सुविधांकरिता १,२८२ एकर खासगी जमीन तात्पुरती भाडेतत्त्वावर घेण्याचे नियोजन

  • नांदूर-दसक, आगरटाकळी आणि परिसरातील १२५ गटांमधील १,१९० एकर ११ आर जमीन संलग्न सुविधांसाठी वापरणार

  • मठ आणि ट्रस्टच्या मालकीच्या १४ गटांमधील ९१.९६ एकर जमीन तात्पुरत्या वापरासाठी घेण्याचे प्रस्तावित

  • तपोवनातील साधुग्रामसाठी ३७७ एकर क्षेत्रावर आरक्षण

  • आरक्षित क्षेत्रातील १९१.२१ एकर जमीन संपादनासाठी २,२६७ कोटी रुपये यापूर्वीच मंजूर

  • जमीन मोजणीपासून ताबा आणि सिंहस्थानंतर परत करण्यापर्यंत व्हिडिओ चित्रण बंधनकारक

  • जिओ-टॅग छायाचित्रांसह झाडे, पिके, विहिरी, जलवाहिन्या आणि बांधकामांची नोंद केली जाणार

  • विहित मुदतीत अंतिम निवाडा करून भाडेपट्टा किंवा नुकसानभरपाई अदा करण्याच्या सूचना

Tendernama
www.tendernama.com