

नाशिक (Nashik) : नाशिक - त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा अवघा २० महिन्यांवर येऊन ठेपला असताना अद्याप एकाही विकास कामाला प्रारंभ झालेला नाही. यामुळे ही कामे कधी होणार, याबाबत टीका होत होती. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अखेर पावले उचलण्यास सुरवात केली आहे.
सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणने सात हजार कोटींच्या कामांच्या टेंडर प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत. त्याबरोबर या कामांचे एकत्रित भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते ७ नोव्हेंबरला करण्याचे नियोजन सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाने केले आहे.
नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. यावेळच्या सिंहस्थ कुंभासाठी राज्य सरकारने प्रथमच कुंभमेळा प्राधिकरण स्थापन केले असून या प्राधिकरणच्या माध्यमातून सिंहस्थाच्या कामांचे नियोजन केले जात आहे.
नाशिक महापालिका, जिल्हा प्रशासन व त्र्यंबकेश्वर पालिका यांनी मिळून जवळपास २५ हजार कोटींचा विकास आराखडा तयार केला असून, त्यातील सात हजार कोटींच्या कामांना सरकारची मंजुरी मिळालेली असल्याने प्रशासनाने त्या कामांची टेंडर प्रक्रिया पूर्ण केलेली आहे.
राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होणार आहेत. या निवडणुकांच्या आचार संहितेचा या कामांच्या भूमिपूजनाला अडथळा येऊ नये म्हणून कुंभमेळा प्राधिकरणने त्यापूर्वी या कामांचे भूमिपूजन करण्याचे नियोजन केले आहे.
मुख्यमंत्री फडणवीस या भूमिपूजनासाठी ७ नोव्हेंबरला नाशिक-त्र्यंबकेश्वर दौ-यावर येत असून त्यांच्या हस्ते या सात हजार कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन होणार आहे.
या कामांचे होणार भूमिपूजन
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते त्र्यंबकेश्वर शहरासाठीची उपसा जलसिंचन योजना, दर्शनपथ, शहरांतर्गत रस्ते, नाशिकमधील रस्ते, मलजल नि:स्सारण प्रकल्प आणि नाशिक - त्र्यंबकेश्वर या सहापदरी रस्त्याच्या कामांचे भूमिपूजन होणार आहे.
सिंहस्थातील प्रमुख कामे
साधुग्रामसाठी २७० एकर अधिग्रहण : १०५० कोटी रुपये
नमामी गोदा प्रकल्प : २७०० कोटी रुपये
रामकालपथ : १४६ कोटी रुपये
जिल्ह्यातील राज्यमार्ग :२२७० कोटी रुपये
ओझर विमानतळ विस्तारीकरण : ६७० कोटी रुपये