

पुणे (Pune): महापालिकेने शहरातील पाच रस्त्यांवर प्रायोगिक तत्त्वावर सशुल्क पार्किंग सुरु करण्याच्या हालचालींना आता वेग आला आहे.
सध्या तांत्रिक प्रक्रिया सुरू असून नोव्हेंबरमध्ये ती पूर्ण होईल. त्यानंतर महापालिकेकडून पुढील महिन्यापासून सशुल्क पार्किंगची सुविधा उपलब्ध करून दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे खरेदी व विविध कामानिमित्त मध्यवर्ती भागात येणाऱ्या नागरिकांची वाहने लावण्याची अडचण दूर होण्यास मदत होणार आहे.
शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांमधील प्रमुख रस्त्यांवर खरेदीसाठी किंवा विविध प्रकारच्या कामानिमित्त नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. मात्र स्थानिक रहिवासी, व्यावसायिकांकडून त्यांची वाहने संबंधित पार्किंगच्या ठिकाणी रात्रंदिवस व कायमस्वरूपी लावून पार्किंग अडविण्याचा प्रयत्न केला जातो.
मध्यवर्ती भागात किंवा उपनगरांमध्ये येणाऱ्या नागरिकांना जागा उपलब्ध होत नाही. परिणामी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असल्याचे म्हणणे शहर वाहतूक पोलिसांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमोर मांडले होते. त्यामुळे महापालिकेने सशुल्क पार्किंग सुरु करण्यास प्राधान्य दिले आहे.
शहरातील पाच प्रमुख रस्त्यांवर ‘नो पार्किंग, नो हॉल्टिंग’ तसेच काही मर्यादित भागांत सशुल्क पार्किंग करण्याचा ठराव मार्च २०१८ मध्ये मांडला होता. संबंधित निर्णयास आयुक्तांची मान्यता मिळाली नव्हती.
दरम्यान, महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी संबंधित ठरावानुसार तसेच वाहतूक पोलिसांशी चर्चा करून प्रमुख रस्त्यांवर सशुल्क पार्किंग तसेच ५० मीटरपर्यंत ‘नो पार्किंग’ करण्याचा निर्णय घेतला होता.
त्यानुसार, महापालिका व शहर वाहतूक पोलिसांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या यासंदर्भात काही बैठका झाल्या आहेत. त्यानंतर आता पाच रस्त्यांवर सशुल्क पार्किंग करण्यासाठीचा प्रस्ताव तयार करून तो मान्यतेसाठी स्थायी समितीसमोर ठेवला आहे. सर्व तांत्रिक प्रक्रियेस एक महिन्याचा कालावधी लागणार आहे, त्यानंतर पुढील महिन्यापासून प्रायोगिक तत्त्वावर सशुल्क पार्किंग व्यवस्था सुरू होण्याची शक्यता आहे.
सशुल्क पार्किंगचा दर
- दुचाकी- ४ रुपये
- चारचाकी- २० रुपये
- सशुल्क पार्किंगची वेळ- सकाळी ८ ते रात्री १०
- मोफत पार्किंग- रात्री १० नंतर
'या' रस्त्यांवर होणार सशुल्क पार्किंग
१) जंगली महाराज रस्ता व नामदार गोपाळकृष्ण गोखले रस्ता (फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता)
२) लक्ष्मी रस्ता
३) बालेवाडीतील हायस्ट्रीट रस्ता
४) विमाननगर रस्ता
५) बिबवेवाडी रस्ता
शहरातील पाच रस्त्यांवर प्रायोगिक तत्त्वावर सशुल्क पार्किंग सुविधेबाबतचा प्रस्ताव मान्यतेसाठी स्थायी समितीसमोर ठेवणार आहे. पुढील आठवड्यात टेंडर प्रक्रिया राबविली जाईल. सर्व तांत्रिक प्रक्रियेसाठी एक महिना लागू शकतो. त्यानंतर प्रत्यक्ष अंमलबजावणी होऊ शकते.
- दिनकर गोजारे, प्रमुख, विशेष प्रकल्प विभाग, महापालिका