

मुंबई (Mumbai): राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील 'लालफितीचा कारभार' आणि 'भ्रष्टाचाराची वाळवी' किती खोलवर रुजली आहे, याचा आणखी एक धक्कादायक नमुना समोर आला आहे.
गेली ८ वर्षे धूळ खात पडलेला जनतेच्या घामाचा ६५ कोटींचा निधी अचानक 'मोकळा' करण्यात आला असून, महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाचे सीईओ महेश आव्हाड यांनी बदलीचे आदेश येताच घाईघाईने या खरेदीचे कार्यादेश काढल्याने खळबळ उडाली आहे. कर्मचारी राज्य विमा महामंडळ, ईएसआयसी दरांचा आडोसा घेत झालेली ही खरेदी म्हणजे तिजोरीवर टाकलेला दरोडा असल्याची चर्चा आता वैद्यकीय वर्तुळात रंगली आहे.
बदलीच्या दिवशीच 'लक्ष्मीदर्शन'?
सदोष औषध पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना अभय देणे आणि ७०० कोटींच्या औषध खरेदी टेंडरमध्ये (E-215) फेरफार करून मर्जीतील कंत्राटदारांचे खिसे भरण्याचे गंभीर आरोप असलेले सीईओ महेश आव्हाड यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी तडकाफडकी बदली केली. (‘टेंडरनामा’ने पहिल्या दिवसापासून हे प्रकरण लावून धरले आहे.) मात्र, प्रशासकीय नैतिकतेचे धिंडवडे उडवत, बदलीचे आदेश हाती पडताच आव्हाड यांनी ६५ कोटी ३९ लाख रुपयांच्या खरेदीचे कार्यादेश काढले. हा 'घाईघाईतील निर्णय' नेमका कुणाच्या फायद्यासाठी, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
हाफकिन महामंडळाकडे सन २०१७-१८ पासून २०२२-२३ या कालावधीत औषध खरेदीसाठी वर्ग केलेला निधी अखर्चित पडला होता. जवळपास ७-८ वर्षे या निधीकडे ढुंकूनही न पाहणाऱ्या प्रशासनाला अचानक जाग आली. ११ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रशासकीय मान्यता मिळवून ३१ मार्चपर्यंत (अवघ्या ४५ दिवसांत) ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे बंधन घालण्यात आले.
महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणामार्फत या ३१ प्रकारच्या औषधांची आणि सर्जिकल साहित्याची खरेदी करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. मात्र, इतक्या अवाढव्य खरेदीसाठी पारदर्शक टेंडर प्रक्रिया राबवणे तांत्रिकदृष्ट्या अशक्य असताना, केवळ मर्जीतील ठेकेदारांना लाभ पोहोचवण्यासाठी हा घाट घातला गेल्याचा आरोप होत आहे. इतक्या घाईघाईने ही खरेदी प्रक्रिया राबविण्याची आवश्यकता नव्हती असे आरोग्य विभागातील वरिष्ठांचे म्हणणे आहे.
या खरेदीसाठी राज्य शासनाने ईएसआयसीच्या दरकराराचा आधार घेतला आहे. मात्र, धक्कादायक वास्तव हे आहे की, खुल्या बाजारातील किमती आणि ईएसआयसीचे रेटकार्ड यात २० ते २५ टक्क्यांची मोठी तफावत असून, चढ्या दराने औषधे खरेदी करून सरकारी तिजोरीचे नुकसान केले जात आहे.
या खरेदीसाठी ईएसआयसीची रीतसर पूर्वपरवानगी घेतलेली नाही. उद्या जर कंपन्यांनी निकृष्ट औषधे पुरवली किंवा पुरवठा अर्धवट सोडला, तर तांत्रिक कारणास्तव ईएसआयसी किंवा महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरण या कंत्राटदारांवर कारवाई करू शकणार नाही. यापूर्वीही अशाच प्रकारे ठेकेदारांना पळवाट मिळवून देण्यात आली होती.
जेजे रुग्णालयाचा हक्क हिरावला
या निधीतील ५ कोटी रुपये हे विशेषतः मुंबईतील जेजे रुग्णालयासाठी मंजूर करण्यात आले होते. मात्र, या निर्णयानुसार हा जेजेच्या हक्काचा निधी इतरत्र वळवण्यात आला आहे. ही केवळ वित्तीय अनियमितता नसून जेजे रुग्णालयात उपचार घेणाऱ्या गरीब रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार आहे.
या खरेदी यादीत ३१ प्रकारच्या औषधांचा समावेश आहे. यात सामान्य मल्टिव्हिटॅमिन्ससोबतच 'Emicizumab' आणि 'Faricimab' सारख्या एका वायलची ५६ हजार रुपये किंमत असलेल्या महागड्या इंजेक्शनचा समावेश आहे.
इतक्या मोठ्या प्रमाणात आणि इतक्या घाईत या महागड्या औषधांची गरज खरोखरच होती का, की केवळ 'कमिशन' लाटण्यासाठी ही खरेदी केली गेली, याची चौकशी होणे गरजेचे आहे. प्राधिकरणाने काढलेल्या सातशे कोटींच्या टेंडरमध्ये नसलेली औषधे जाणीवपूर्वक खरेदी करण्यात आली आहेत. या खरेदीमागे ‘हरणे’ नावाच्या व्यक्तीने मोठी भूमिका पार पाडल्याची चर्चा आहे.
सर्व खरेदीच्या चौकशीची मागणी
महेश आव्हाड यांच्या कार्यकाळात झालेल्या ७०० कोटींच्या टेंडर प्रक्रियेतील फेरफार आणि आताच्या ६५ कोटींच्या वादग्रस्त खरेदीमुळे प्राधिकरणाची विश्वासार्हता रसातळाला गेली आहे. बदली होऊनही शेवटच्या क्षणी कार्यादेश काढण्याची ही तत्परता भ्रष्टाचाराकडे अंगुलीनिर्देश करणारी आहे. त्यामुळेच, आव्हाड यांच्या संपूर्ण कार्यकाळातील सर्व औषध खरेदीची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
एकूण ३१ प्रकारच्या औषधांमध्ये खालील प्रमुख बाबींचा समावेश आहे.
मल्टिव्हिटॅमिन्स आणि सप्लिमेंट्स: कॅल्शियम एस्पार्टेट, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स सिरप आणि लोह-फॉलिक ॲसिड ड्रॉप्सची मोठ्या प्रमाणात खरेदी होणार आहे.
महागडी औषधे: यात 'Emicizumab' (३० मिलीग्राम) आणि 'Faricimab' (६ मिलीग्राम) सारख्या महागड्या इंजेक्शनचा समावेश आहे, ज्याची किंमत प्रति वायल ५६,००० रुपयांपर्यंत आहे.
दैनंदिन गरजेच्या वस्तू: सर्जिकल स्पिरीट (१ लाख लिटरपेक्षा जास्त), डायक्लोफेनाक स्प्रे आणि पोव्हीडोन आयोडीन ड्रेसिंग.