

नाशिक (Nashik) : केंद्र सरकारने जीएसटी 2.0 लागू केल्यानंतर जीएसटी दरात सात ते बारा टक्के कपात झाली व त्यातल्या त्यात वाहनांवरील जीएसटी दारात दहा टक्के कपात झाली. त्याचा परिणाम दिवाळी दसरा या काळातील वाहन विक्रीवर दिसून आला आहे.
या सणांच्या काळात म्हणजे ऑक्टोबरमध्ये राज्यात 4 लाख 45 हजार 993 वाहनांची विक्री झाली आहे. राज्यातील सर्व परिवहन कार्यालयांमध्ये झालेल्या नोंदणीनुसार वाहन खरेदीत पुणे जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे. ऑक्टोबरमध्ये झालेल्या वाहन खरेदीत राज्यातील पहिल्या पाच जिल्ह्यांत पुण्यासह, ठाणे, मुंबई उपनगर, नाशिक व नागपूर यांचा समावेश आहे.
केंद्र सरकारने यावर्षी 22 सप्टेंबरपासून जीएसटी 2.0 लागू केला. या सुधारणेमुळे जीएसटी कर आकारणीचा 12 टक्क्यांचा स्लॅब रद्द केला. तसेच 28 टक्क्यांच्या स्लॅबमधील बहुतांश वस्तू 18 टक्के स्लॅबमध्ये समाविष्ट केल्या. यामुळे बहुतांश वस्तूंच्या जीएसटी दरात सात ते 12 टक्के कपात झाली.
या कर कपातीचा वाहन क्षेत्रावर सकारात्मक दिसून आला. यामुळे देशात मागील वर्षीच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये 32 टक्के अधिक वाहन विक्री झाली आहे. मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये 21 लाख 43 हजार वाहनांची विक्री झाली होती. ती वाढून यंदा 28 लाख 32 हजार झाली आहे. राज्यातही ऑक्टोबरमध्ये 4 लाख 43 हजार 993 वाहनांची विक्री झाली आहे. देशाचा विचार करता एकूण वाहन विक्रीच्या तुलनेत एकट्या महाराष्ट्रात 15 टक्क्यांपेक्षा अधिक विक्री झाली आहे.
राज्यातील 36 जिल्ह्यांचा विचार केल्यास पुणे जिल्ह्यात 80 हजार 213 वाहनांची विक्री झाली आहे. राज्यातील एकूण वाहन विक्रीच्या तुलनेत एकट्या पुणे जिल्ह्यात 18 टक्के वाहनांची विक्री झाली आहे.
राज्यात एकूण 57 परिवहन कार्यालये आहेत. या परिवहन कार्यालयनिहाय वाहन नोंदणीचा विचार केल्यास पुणे (एमएच 12) परिवहन कार्यालयात 44 हजार 699 वाहनांची नोंद झाली आहे. पिंपरी चिंचवड (एम एच 14) या परिवहन कार्यालयात 29 हजार 453 वाहनांची नोंदणी झाली आहे. तर नाशिक (एम एच 15) परिवहन कार्यालयात 17 हजार 362 वाहनांची नोंदणी झाली आहे. छत्रपती संभाजीनगर (एम एच 20) परिवहन कार्यालयात 15 हजार 465 व ठाणे (एम एच 04) परिवहन कार्यालयात 14 हजार 392 वाहनांची नोंदणी झाली आहे.
जिल्हानिहाय विचार केल्यास पुणे व पिंपरी चिंचवड या पुणे जिल्ह्यातील दोन्ही परिवहन केंद्रांवर राज्यात सर्वाधिक वाहन नोंदणी झाल्याने पुणे जिल्हा वाहन विक्रीत अव्वल ठरला आहे. ठाणे व कल्याण या दोन परिवहन कार्यालयांमध्ये 36 हजार 333 वाहनांची नोंदणी झाली आहे. मुंबईमधील तीन परिवहन कार्यालयांमध्ये एकूण 28 हजार 104 वाहनांची नोंदणी झाली आहे. त्यानंतर नाशिक जिल्ह्यातील नाशिक व मालेगाव परिवहन कार्यालयांमध्ये 22 हजार 740 वाहनांची नोंदणी झाली आहे.
सर्वाधिक वाहनविक्री झालेले जिल्हे
पुणे (80 हजार 213)
ठाणे (36 हजार 333)
मुंबई उपनगर (28 हजार 104)
नाशिक (22 हजार 740)
नागपूर (22 हजार 367)
सर्वाधिक वाहन नोंदणी झालेली परिवहन कार्यालये
पुणे (एम एच 12)
पिंपरी चिंचवड (एम एच 14)
नाशिक ( एम एच 15)
ठाणे (एम एच 04)
छ. संभाजी नगर (एम एच 20)