

मुंबई (Mumbai): वाशिम जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी वाशिम एमआयडीसीतील रस्ते, पाणीपुरवठा आणि पायाभूत सुविधांच्या कामांसाठी एकूण ४४ कोटी ८५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्य व अंतर्गत रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी १८ कोटी, पाणीपुरवठा योजनेसाठी १६ कोटी आणि पायाभूत सुविधांसाठी १० कोटी ८५ लाख रुपये मंजूर करण्यात येणार असल्याची माहिती उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिली.
वाशिम जिल्ह्यातील औद्योगिक विकासाच्या प्रश्नांबाबत मंत्रालयात झालेल्या बैठकीत रस्ते, पाणीपुरवठा, वीज आणि एमआयडीसीतील भूखंड वाटपाचा आढावा घेण्यात आला. उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत आणि पालकमंत्री तथा कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि एमआयडीसीचे अधिकारी तसेच जिल्ह्यातील उद्योजक उपस्थित होते.
एमआयडीसीतील रस्त्यांसाठी १८ कोटी
वाशिम विकास केंद्रातील मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांची अवस्था खराब झाली असून, त्यांच्या डांबरीकरणासाठी १८ कोटी रुपयांचा प्रस्ताव प्रलंबित होता. या प्रस्तावाला तत्काळ मान्यता देऊन आकांक्षित जिल्हा म्हणून वाशिमला प्राधान्य देत निधी मंजुरीची कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश सामंत यांनी दिले.
पंचाळा धरणातून पाणी आणणार
एमआयडीसीतील सध्याचा पाणीपुरवठा विहिरीवर अवलंबून आहे. उन्हाळ्यात विहीर आटल्याने उद्योगांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. ही समस्या दूर करण्यासाठी पंचाळा धरणातून पाणी आणण्याच्या १६ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेला मान्यता देऊन तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले.
वीजपुरवठ्यासाठी ३.८२ कोटींची तरतूद
एमआयडीसीमध्ये वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने उद्योगांच्या कामकाजावर परिणाम होत आहे. ही समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी वाशिम येथे ३३ केव्ही वीजवाहिनी उभारण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी ३ कोटी ८२ लाख रुपये डीपीडीसीतून देण्याची जबाबदारी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्वीकारली.
भूखंड वाटपाला गती देण्याचे निर्देश
वाशिम एमआयडीसीतील भूखंडांचे वाटप जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचनाही सामंत यांनी दिल्या. एमआयडीसीमध्ये कायमस्वरूपी प्रशासकीय यंत्रणा उपलब्ध करून देण्याबरोबरच उद्योजकांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रादेशिक अधिकाऱ्यांनी आठवड्यातील एक दिवस वाशिममध्ये उपलब्ध राहावे, असे निर्देश देण्यात आले.
एमआयडीसीसाठी स्वतंत्र पाणी आरक्षणाचा विचार
इसापूर धरणातून वाशिमसाठी प्रस्तावित पाणीपुरवठा योजनेत एमआयडीसीसाठी स्वतंत्र पाणी आरक्षणाचा विचार करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. यासाठी जलसंपदा विभागाच्या पाणीवाटप समितीकडे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश सामंत यांनी दिले.
एमआयडीसीच्या पाणीपुरवठ्यासाठी स्वतंत्र व्यवस्था आणि स्वतंत्र पाइपलाइन आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
Key Points
वाशिम एमआयडीसीसाठी ४४.८५ कोटी रुपये,
मुख्य व अंतर्गत रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी १८ कोटी रुपये,
पाणीपुरवठा योजनेसाठी १६ कोटी रुपये,
पायाभूत सुविधांसाठी १०.८५ कोटी रुपये,
३३ केव्ही वीजवाहिनीसाठी ३.८२ कोटी रुपये डीपीडीसीतून देण्याची तयारी,
पंचाळा धरणातून एमआयडीसीला पाणी आणण्याचे नियोजन,
एमआयडीसीतील भूखंड वाटपाची प्रक्रिया जलद करण्याचे निर्देश,
इसापूर धरणाच्या प्रस्तावित पाणीपुरवठा योजनेत एमआयडीसीसाठी स्वतंत्र पाणी आरक्षणाचा विचार,
उद्योजकांच्या अडचणींसाठी प्रादेशिक अधिकाऱ्यांनी आठवड्यातील एक दिवस वाशिममध्ये उपलब्ध राहण्याचे निर्देश.