यवतमाळ (Yavatmal) : पुसद नगरपालिकेअंतर्गत प्रस्तावित करण्यात आलेल्या विकासकामांना राज्य शासनाने गुरुवारी मंजुरी दिली आहे. या विविध विकासकामांसाठी 10 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. शहरातील विकासकामांचा निधी मिळविण्यासाठी आमदार इंद्रनील नाईक यांनी उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नाला यश मिळाले असून, 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
पुसद नगरपालिका क्षेत्रातील विकासकामांचे विवरण या शासन निर्णयात देण्यात आलेले आहे. त्यानुसार नगरपालिका पुसदअंतर्गत प्रभाग क्रमांक दहामध्ये मिलिंद नाईक यांच्या घराजवळील नगरपालिकेच्या खुल्या जागेत योगाभवनाचे बांधकाम करणे अंतर्भूत आहे. पूस नदीलगत असलेल्या लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीस संरक्षण भिंतीचे बांधकाम करणे, तसेच सुशोभीकरण करणे, प्रभाग क्रमांक तीनमध्ये शहा चौकातील पूस नदीवरून शमशुल उलुम शाळेपर्यंत जाणाऱ्या पुलाचे बांधकाम करणे, नगरपालिका पुसदअंतर्गत प्रभाग क्रमांक 11 मध्ये देशमुखनगर येथील खुल्या जागेत राजमाता अहिल्यादेवी होळकर योगाभवनाचे बांधकाम करणे, प्रभाग क्रमांक तीनमधील गढी वॉर्ड येथील मुस्लिम कब्रस्तान संरक्षण भिंतीचे बांधकाम करणे, नगरपालिकेअंतर्गत प्रभाग क्रमाकं 14 मधील नवीन पुसद बगीच्यामधील व्यायाम शाळेचे बांधकाम करणे व साहित्य खरेदी करणे, प्रभाग क्रमांक तीनमधील मस्तान शहा बाबा दर्गा परिसरामध्ये सुशोभिकरण करणे, पुसद येथील मुख्य चौकामध्ये दिशा व स्थळदर्शक फलक बसविणे, येथील प्रभाग क्रमांक 14 मधील गिरीराज पार्क येथे शेळके यांच्या घरापासून ते धानोरकर यांच्या घरापर्यंत जाणाऱ्या रस्त्याचे सिमेंट काँक्रिट बांधकाम करणे, नगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 14 मधील ऋग्वेद कॅम्पस येथे महेश गुल्हाने यांच्या घरासमोरील रस्त्याचे सिमेंट काँक्रिट बांधकाम करणे, या विकासकामांचा समावेश आहे. शासनाने प्रदान केलेल्या या निधीतून विकासकामे दर्जेदार व्हावीत, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. हा निधी मिळविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल नागरिकांनी आमदार नाईक यांचे आभार मानले.
नागरिकांमधून समाधान
पुसद शहरात होणाऱ्या विविध विकासकामांसाठी शासनाच्यावतीने सुमारे 10 कोटी रुपये विकासनिधीला मंजुरी देण्यात आलेली आहे. त्यामुळे पुसद शहरातील विविध विकासकामांना आता गती मिळणार आहे. शहरातील विकासकामांचा निधी मिळविण्यासाठी आमदार इंद्रनील नाईक यांनी केलेल्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. विशेष म्हणजे या निधीमधून आता पुसद शहरातील विविध विकासाची कामे होणार असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.