
नागपूर (Nagpur) : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंगल्यासाठी जागा जवळपास निश्चित झाली असून, हिवाळी अधिवेशनापूर्वीच तो तयार करण्यात येणार आहे. यासाठी प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात येत असून, यावर कोट्यवधींचा खर्च येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
राज्यात नाट्यमय घडामोडीनंतर शिवसेना (शिंदे गट) व भाजप सत्तेत आले. उद्धव ठाकरे पायउतार होऊन शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली. तर उपमुख्यमंत्रीपद भाजपचे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आले. वर्षभरातच राष्ट्रवादीत फुट पडली आणि अजित पवार यांच्या नेतृत्त्वात राष्ट्रवादीचा गट सत्तेत सहभागी झाला. अजित पवार यांनाही उपमुख्यमंत्री सत्तेत करण्यात आले. त्यामुळे राज्यात दोन उपमुख्यमंत्री झालेत. नागपुरात विधिमंडळ अधिवेशनाचे एक सत्र होते. मुख्यमंत्र्यांसाठी रामगिरी, तर उपमुख्यमंत्र्यांसाठी देवगिरी हे शासकीय निवासस्थान आहे.
देवगिरी बंगला उपमुख्यमंत्री फडणवीस यांना दिला आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी स्वतंत्र बंगला नाही. त्यांच्यासाठी स्वतंत्र बंगला तयार करण्यात येणार आहे. यासाठी दोन जागांचा शोध घेण्यात आला होता. यात मेट्रो रेल्वेचे भवन व सहपोलिस आयुक्त यांचा बंगला होता. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सहपोलिस आयुक्त यांचा बंगला अजित पवार यांच्यासाठी निश्चित करण्यात आला आहे. येथे वास्तव्यास असलेले आयपीएस अधिकाऱ्यांची दुसऱ्या ठिकाणी निवास व्यवस्था करण्यात येणार आहे.
बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या लगत असलेले कॉटेज त्यांना दाखवण्यात आल्याची माहिती आहे. अजित पवार यांच्यासाठी चर्चा आहे. बंगला असल्याने प्रशासनाकडून आवश्यक सर्व काळजी घेतली जात आहे. या बंगल्यावर कोट्यवधींचा खर्च अपेक्षित असल्याचे सूत्रांकडून समजते.
कंत्राटदार सक्रिय :
औपचारिक मंजुरी मिळाल्यावर काम सुरू करण्यात येणार आहे. प्रशासनाकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. या बंगल्याचे काम मिळण्यासाठी काही कंत्राटदारांनी फिल्डिंग लावल्याची चर्चा आहे.