
मुंबई (Mumbai) : अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वे स्थानकामधील चिखलोली रेल्वे स्थानकाच्या फलाटासह इतर कामांसाठी मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्यावतीने ८१ कोटी ९३ लाख रुपयांच्या टेंडर प्रसिद्ध करण्यात आले आहे. सध्याच्या घडीला चिखलोली आणि विस्तारीत बदलापुरातील प्रवाशांना अंबरनाथ आणि बदलापूर स्थानकात लोकल पकडण्यासाठी जावे लागते. परंतु चिखलोली स्थानकाच्या उभारणीनंतर प्रवाशांचा वेळ आणि खर्च दोन्ही वाचणार आहे.
अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यानचा चिखलोली परिसर वेगाने विकसित झाल्याने येथील प्रवाशांची संख्या वाढली. त्यामुळे अंबरनाथ आणि बदलापूर या रेल्वे स्थानकांच्या दरम्यान नवे स्थानक उभारण्याची मागणी होत होती. स्थानिक खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून या स्थानकाच्या उभारणीसाठी सातत्याने प्रयत्न केले जात होते. २०१९ मध्ये या स्थानकाच्या प्रत्यक्ष कामाची प्रक्रिया सुरू झाली. २०२० मध्ये या स्थानकाच्या कामासाठी आवश्यक जागेची पाहणी रेल्वे प्रशासनाने उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आणि तहसील प्रशासनाच्या उपस्थितीत केली होती. त्याबाबतची अधिसूचना यापूर्वीच जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे चिखलोली स्थानकाच्या उभारणीला गती मिळाली.
डिसेंबर २०२० मध्ये मध्य रेल्वेच्या वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापकांनी चिखलोली स्थानकाच्या थांब्याला अधिकृत मंजुरी दिली होती. रेल्वे प्रशासनाने चिखलोली स्थानकाचे इंग्रजी, मराठी आणि हिंदी भाषेतील नाव आणि त्याची अक्षरे निश्चित केली होती. यावेळी चिखलोली स्थानकाचा रेल्वे प्रशासनाचा सांकेतिक क्रमांक, त्याचे संक्षिप्त नावही रेल्वे प्रशासनाने जाहीर केले होते. रेल्वे आणि इतर खासगी मोबाईल ॲप आणि संकेतस्थळांवर या स्थानकाचे नावही दिसू लागले होते. त्यानतंर काही काळ निधीच्या उपलब्धतेवरून थंडावले होते. परंतु राज्याचा हिस्सा उपलब्ध झाल्यानंतर आता अखेर या स्थानकाच्या उभारणीच्या प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा मार्गी लागला आहे. मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्या वतीने या स्थानकाच्या निर्मितीसह इतर संलग्न कामांसाठी ८१ कोटी ९३ लाख रुपयांचे टेंडर जाहीर केले आहे. त्यामुळे या स्थानकाच्या प्रत्यक्ष उभारणीचे काम लवकरच सुरू होणार आहे.