
नागपूर (Nagpur) : राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सादर केलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात विदर्भासाठी विविध प्रकल्प व योजनांचा पेटाराच उघडला आहे. विशेष म्हणजे नागपूर येथे एक हजार एकरवर लॉजिस्टिक हब आणि अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथे मराठी विद्यापीठ स्थापन करण्याच्या प्रमुख घोषणांचा त्यात समावेश आहे.
राज्याचे नवीन लॉजिस्टिक धोरण तयार करण्यात येत असून, यात लॉजिस्टीक हबचा प्रस्ताव आहे. नागपूर हे देशाच्या मध्यवर्ती केंद्र असलेल्या व दळणवळणाच्या दृष्टीने सुलभ असल्याने हजार एकरावर लॉजिस्टिक हब तयार करण्याचा शासनाचा मानस असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
विदर्भासाठी महत्त्वाच्या घोषणा
मराठी भाषा विद्यापीठ श्रीक्षेत्र रिद्धपूर (जि. अमरावती) येथे मराठीतील पहिला हस्तलिखित आद्यग्रंथ 'लीळाचरित्र' चक्रधर स्वामींनी लिहिला. त्यामुळे रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्यात येईल. मराठी भाषेत रुची ठेवणाऱ्या लोकांसाठी ही आनंदाची बातमी आहे. उद्यानांचा विकास आंबेगाव (ता. हवेली, जि. पुणे) येथे उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज संकल्पना शिवाजी उद्यानाच्या धर्तीवर अमरावती आणि नागपूर येथे दृकश्राव्य माध्यम उद्यान सुविधेसह सार्वजनिक उद्याने विकसित करण्यात येतील. या उद्यानांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जीवनगाथा प्रदर्शित करण्यात येईल. संत्रा प्रक्रिया केंद्र नागपूर जिल्ह्यातील नागपूर, काटोल व कळमेश्वर तसेच अमरावती जिल्ह्यातील मोर्शी आणि बुलढाणा जिल्ह्यात आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्रे उभारण्यासाठी 20 कोटी रुपये निधी.
विकासासाठी अनेक घोषणा
वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी तीर्थक्षेत्राच्या विकास आराखड्यातील कामे पूर्ण करण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करुण दिला जाईल. अमरावतीतील श्रीसंत गाडगेबाबा यांचे समाधी स्थळ, तसेच संत गाडगेबाबांची कर्मभूमी असलेल्या ऋणमोचन तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 25 कोटींचा निधी देण्यात येईल. हे वर्ष श्रीचक्रधर स्वामी अष्टशताब्दी जन्मोत्सवाचे वर्ष आहे. महानुभाव पंथाच्या दृष्टीने महत्त्वाच्या रिद्धपूर, काटोल, भिष्णूर येथील देवस्थानांच्या विकासासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराजांच्या अमरावती जिल्ह्यातील स्मारकासाठी निधी उपलब्ध करण्यात येईल.
श्रीसंत जगनाडे महाराजांच्या जीवनाचा परिचय नवीन पिढीला व्हावा, यासाठी नागपूर येथे श्रीसंत जगनाडे महाराज आर्ट गॅलरी उभारण्यासाठी 6 कोटींचा निधी देण्यात येईल. तर अमरावतीच्या हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ या क्रीडा क्षेत्रातील नामांकित संस्थेस अभिमत क्रीडा विद्यापीठाचा दर्जा देऊन विशेष अनुदान देण्यात येईल. क्रीडा संकुल विकास नागपूरच्या विभागीय क्रीडा संकुलाच्या कामांसाठी 100 कोटींचा निधी उपलब्धकरण्यात येईल. वैद्यकीय महाविद्यालये राज्यात 14 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची बांधकामे करण्यात येणार असून, त्यात अमरावती, भंडारा, गडचिरोली, वर्धा, बुलढाणा या जिल्हास्थानांचा समावेश आहे.
स्वातंत्र्यलढ्यात हुतात्मा झालेल्या स्वातंत्र्यसैनिकांची स्मृती भावी पिढीला सदैव प्रेरणा देत राहावी, यासाठी वर्धा जिल्ह्यातील आष्टी येथे भव्य असे व साजेसे स्फूर्तीस्थळ उभारण्यात येईल. तसेच महात्मा गांधींनी सुरू केलेल्या मिठाच्या सत्याग्रहाला पाठिंबा म्हणून करण्यात आलेल्या जंगल सत्याग्रहाच्या स्मृतिप्रित्यर्थ तीन ठिकाणी जंगल सत्याग्रह स्मारक उभारण्यात येतील. रा. सु. गवई यांचे स्मारक स्व. रा. सु. गवई यांच्या अमरावती येथील स्मारकाकरिता 25 कोटी रुपये निधीची तरतूद केली आहे. नागपूर विमानतळाचा विस्तार केले जाणार आहे. तसेच नागपुरातील मिहान साठी 100 कोटी रुपये दिले जाणार आहे. विदर्भ साहित्य संघ नागपूर येथील विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दीनिमित्त 10 कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे.