
नागपूर (Nagpur) : नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (NMRDA) 2023-24 या आर्थिक वर्षाच्या 1 हजार 480 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी मुंबईत झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
एनएमआरडीएचे आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांनी अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पात प्रधानमंत्री आवास योजना, वृद्धाश्रम व अग्निशमन केंद्र, महालक्ष्मी कोराडी देवस्थान, तीर्थक्षेत्र विकास, दीक्षाभूमी विकास, स्वदेश तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रम, फुटाळा तलाव सुशोभीकरण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटरसाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद झाल्याने प्रलंबित प्रकल्प प्रत्यक्षात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
एनएमआरडीए अंतर्गत सामूहिक विकासासोबत पायाभूत सुविधांच्या विकास कामांवर भर देण्यात आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. नागपूर शहर ही उपराजधानी आहे. त्याचा विकास करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांगीण विकासाला प्राधान्य देण्याचे मान्य केले. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष उपस्थिती होती. मुख्य सचिव मनोजकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, महापालिका आयुक्त आणि प्रशासक राधाकृष्णन बी. एनएमआरडीएचे आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत अर्थसंकल्प सादर करण्यात आला. बैठकीस सहायक आयुक्त अविनाश कातडे, राजेंद्र लांडे, मुख्य लेखाधिकारी पवार आदी अधिकारी उपस्थित होते.
असा होणार खर्च :
रस्ते आणि पूल दुरुस्ती आणि बांधकाम, पाणीपुरवठा यासाठी 200 कोटी देण्यात आले आहे. अमृत-2 योजनेंतर्गत पाणी आपूर्ति पाइपलाइन आणि सीवरेज लाइनसाठी 50 कोटी रुपये, सुरक्षा भिंतीसाठी 10 कोटी रुपये, एनएटीपी अंतर्गत विकास कामांसाठी 35 कोटी रुपये, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घर बांधण्यासाठी 10 कोटी रुपये, वृद्धाश्रम बांधण्यासाठी 5 कोटी रुपये अंदाजित करण्यात आले आहेत. आणि फायर स्टेशन 5 कोटी, महालक्ष्मी कोराडी देवस्थान तीर्थ क्षेत्र विकास कार्यक्रम टप्पा 3 आणि 4 साठी 100 कोटी, दीक्षाभूमीच्या विकासासाठी 49 कोटी, स्वदेश तीर्थ क्षेत्र विकास कार्यक्रमासाठी 25 कोटी, अमृत-2 योजनेंतर्गत विकास कामांसाठी 50 कोटी, फुटाळा तलावाचे सुशोभीकरण 4 कोटी, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटरसाठी 15 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
येथून मिळणार पैसा :
विकास निधीतून 394 कोटी 40 लाख, अग्रिम टैक्स व भांडवल 59 कोटी, प्रकल्प निधी 1025 कोटी, एनएमआरडीएचे अपेक्षित उत्पन्न 56 लाख रुपये असे गृहीत धरण्यात आले आहे. बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, उपराजधानी नागपूर च्या सर्वांगीण विकासासाठी प्राथमिकता दिली जात आहे. त्यामुळे वर्षानुवर्ष प्रलंबित असलेले प्रकल्प लवकरच पूर्ण होतील.