
नाशिक (Nashik) : राज्य सरकारने विभागीय, जिल्हा व तालुका या तीनही ठिकाणी तालुकास्तरावरील खेळाडूंना सुविधा मिळाव्यात यासाठी क्रीडा संकूल उभारण्याचे धोरण जाहीर केले होते. त्यानुसार प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी क्रीडा संकूल उभारण्यासाठी निधी दिला. या धोरणानुसार नाशिक जिल्ह्यातील १५ तालुक्यांमधील १३ क्रीडा संकुलांचे काम पूर्ण झाले आहेत. या काम पूर्ण झालेल्या क्रीडा संकुलांना नवीन तीन कोटी रुपये निधी दिला जाणार आहे. मात्र, सिन्नर, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा या तीन क्रीडा संकुलांचे काम अद्यापही अपूर्ण आहे. या तीनही ठिकाणचे क्रीडा संकूल उभारण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असून ही क्रीडासंकुले रखडण्याबाबत क्रीडा विभाग अनभिज्ञ असल्याचे दिसत आहे.
ग्रामीण भागातील खेळाडूना आंतराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा उपलब्ध व्हाव्या, यासाठी त्रिस्तरीय क्रीडा संकुलांची उभारणी करण्याचे धोरण राज्य सरकारने स्वीकारले आहे. यासाठी यात विभागीय, जिल्हा आणि तालुका पातळीवर प्रत्येकी एक क्रीडा उभारण्यात येत आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये तालुका क्रीडा संकुलांना मान्यता देण्यात आली होती. तालुका क्रीडा संकुलांसाठी सुमारे दोन हेक्टर जागा असून, यात एक दोनशे मीटर लांबीचा इनडोअर बहुउद्देशीय हॉल, दोनशे व चारशे मीटरची धावपट्टी आणि विविध खेळांची क्रीडांगणे उभारणली जाणार आहेत. प्रत्येक तालुक्यासाठी एक कोटी रुपये निधी देण्यात आला आहे. त्यातील ९१ लाख रुपये बांधकामासाठी वापरले जाणार असून पाच लाखांचे क्रीडा साहित्या व चार लाख रुपये किरकोळ खर्चासाठी दिले आहेत. यातील येवला, पेठ, दिंडोरी, नांदगाव, नाशिक, बागलाण, सटाणा, मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य, नांदगाव, कळवण, इगतपुरी या तालुक्यातील क्रीडा संकुले पूर्ण झाली आहेत. जिल्हास्तरीय क्रीडा संकूल नाशिक शहरालगत सय्यदपिंप्री येथे उभारण्यात आले आहे.
नवीन धोरणानुसार काम पूर्ण जालेल्या तालुका क्रीडा संकुलांच्या देखभाल दुरुस्तीसाठी प्रत्येकी आणखी तीन कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील १३ तालुका क्रीडा संकुलांना प्रत्येकी तीन कोटींचा निधी लवकरच प्राप्त होणार आहे. मात्र, त्र्यंबकेश्वर व सुरगाणा येथील क्रीडा संकुलांचे काम अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र, घोडे कुठे अडले याबाबत क्रीडा खाते अनभिज्ञ आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून काम केले जात असून क्रीडाविभागाकडून सातत्याने पाठपुरावा केला जात असला तरी क्रीडा विभागाला ठोस उत्तर मिळत नाही, असे सांगितले जात आहे.
सिन्नरसाठी नवीन प्रस्ताव
प्रत्येक तालुक्याच्या क्रीडा संकुलासाठी एक कोटी रुपये दिले असताना सिन्नरसाठी ११ कोटी रुपये निधी मंजूर केला. या क्रीडा संकुलाचे काम झालेले नाही. त्यातच आता सिन्नरच्या तालुका क्रीडा कार्यालयाने ३५० कोटी रुपयांचे क्रीडा संकूल उभारण्याचा प्रस्ताव सरकारकडे सादर केला आहे.