
नाशिक (Nashik) : महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी महापालिकेच्या सर्व विभागांना पावसाळ्यात निर्माण होत असलेल्या संभाव्य परिस्थितीचा घेऊन विशेष सूचना दिल्या आहे. तसेच आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सिंहस्थाची पूर्वतयारी तसेच मोठ्या कामांचा सविस्तर अहवाल मागवला आहे. यामुळे नाशिकच्या विकासाला हातभार लावणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांवर आयुक्तांनी लक्ष केंद्रित केले असल्याचे दिसत आहे.
महापालिका आयुक्तांनी विभागप्रमुखांच्या बैठकीत विविध विभागांचे कामकाज व पद्धती समजून घेतली. अतिरिक्त आयुक्त सेवा व शहर यांच्या कामांचे अधिकार निश्चित करताना प्रत्यक्षात कामाला सुरवात केल्याचे दिसून येत आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडत असल्याने ते खड्डे बुजवण्याबरोबरच रोजच्या उपाययोजनांचा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या. साथरोगाचा फैलाव होण्याची शक्यता असल्याने औषध व धूर फवारणी तातडीने करून त्यासंदर्भातील अहवाल सादर करण्याच्या सूचना विभागांना केल्या. काझी गढी वरील नागरिकांना स्थलांतरित करण्याच्या सूचना देण्यात आल्या. याबरोबरच सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीचा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
विभागीय आयुक्तांच्या सूचनेनुसार तत्कालीन आयुक्त डॉ. चंद्रकात पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली सिंहस्थ समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीने सिंहस्थ पूर्वतयारीचा प्राथमिक अहवालही मागील वर्षी सादर केला आहे. महापालिकेने तयार केलेल्या प्राथमिक आराखड्यात गोदाघाट विकसित करणे, रामकुंडाकडे येणारे रस्ते विकसित करणे, सुशोभीकरण या कामांना प्राधान्य दिले आहे. त्या प्राथमिक आराघड्यात प्रामुख्याने २०१५ च्या सिंहस्थ कुंभमेळा काळात केलेल्या कामांची री ओढल्याचे दिसून आले. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्राप्त होणाऱ्या निधीतून शहरातील प्रमुख रस्ते, ड्रेनेज, पावसाळी गटार योजना या कामांचादेखील समावेश करणे अपेक्षित आहे. मात्र, महापालिकेने तयार केलेल्या या नवीन प्राथमिक अहवालात यापैकी कुठल्याच कामाचा समावेश नाही. यामुळे नवीन आयुक्त आता या पूर्वतयारीच्या प्राथमिक आराखड्यातील कामांबाबत माहिती घेऊन नाशिक शहराच्या विकासाच्या योजनांचा समावेश होईल, अशी अपेक्षा आहे.
सिंहस्थ आराखड्यातील कामे
- रामकुंड परिसर विकसित करणे.
- गोदावरी नदीचे घाट विकसित करणे.
- रामकुंडात स्वच्छ पाणी उपलब्ध करून देणे.
- शहराच्या बाह्य भागात वाहनतळ विकसित करणे.
- शहरातील अंतर्गत व बाह्य रिंग रोड विकसित करणे.
- आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने उपाययोजना करणे.
- साधूग्राममध्ये सुविधा पुरवणे