

नाशिक (Nashik): सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिक त्र्यंबकेश्वर परिसरात शेकडो कोटींची विकास कामे सुरू झाकली झालेली असताना त्र्यंबकेश्वर येथील दहा आखाड्यांमध्ये एकही काम सुरू नसल्याने साधू महंतांनी अनेकदा नाराजी व्यक्त केली होती.
अखेर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाने मंजुरी दिल्यानंतर त्र्यंबकेश्वर पालिकेने दहा आखाड्यांमध्ये पायाभूत सुविधा उभारण्यासाठी ७.५५ कोटींचे टेंडर प्रसिद्ध केले आहे. ही कामे पहिल्या टप्प्यातील असून, आवश्यकतेनुसार आणखी कामे मंजूर केली जातील, असे यापूर्वीच कुंभमेळा प्राधिकरणाने स्पष्ट केलेले आहे. या साधुमहंतांनी प्रत्येक आखाड्यात पाच कोटींची कामे करण्याची मागणी केली होती.
नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यात आखाडे व त्यांचे साधू महंत यांच्या शाही पर्वणी स्नानाला मोठे महत्त्व असते. यामुळे प्रत्येक कुंभमेळ्यात या आखाड्यांतील साधू, महंत व त्यांच्याशी संबंधित आश्रम यांच्यासाठी साधुग्राम उभारले जाते. त्याठिकाणी साधुमहंत यांना पायाभूत सुविधा उभारून दिल्या जातात.
नाशिक त्र्यंबकेश्वर येथील सिंहस्थ नाशिक व त्र्यंबकेश्वर या दोन ठिकाणी भरतो. त्यात दोन्ही ठिकाणांचे अंतर ३० किलोमीटर आहे. आणखी वैशिष्ट्य म्हणजे १३ प्रमुख आखड्यांपैकी दहा आखाडे त्र्यंबकेश्वर येथे आहेत.
या आखड्यांच्या त्र्यंबकेश्वर येथे स्वतःच्या जागा असून सिंहस्थात तेथेच त्यांच्या साधूंची व्यवस्था केली जाते. यामुळे मागील सिंहस्थात प्रशासनाने या आखड्यांमध्ये साधूंसाठी पिण्याचे पाणी, स्वच्छता गृह, अंतर्गत रस्ते व शेड बांधून दिले होते.
या सिंहस्थात कुंभमेळा प्राधिकरणाने मागील बांधकामांची दुरुस्ती, नवीन स्वच्छतागृह, अंतर्गत रस्ते उभारून देण्याची तयारी दर्शवली होती. त्यानुसार प्रत्येक आखाड्यात साधारणपणे एक कोटींची कामे करण्यास मंजुरी दिली होती. त्या मंजुरीनुसार त्र्यंबकेश्वर पालिकेने प्रत्येक आखाड्यातील कामाचे अंदाजपत्रक तयार करून कामे निश्चित केली आहेत.
त्यानुसार पहिल्या टप्प्यात प्रत्येक आखाड्याला साधारणतः ७२ ते ७८ लाखांची कामे दिली आहेत. यात शौचालय ब्लॉक, धर्मध्वज ओटा आणि अंतर्गत सिमेंटचे रस्ते व पाणीपुरवठा ही कामे केली जाणार आहेत. यात सर्वाधिक जागा उपलब्ध असलेल्या जुन्या आखाड्यास सर्वाधिक ८७ लाख १२ हजारांची कामे होणार आहेत.
त्र्यंबकेश्वर पालिकेच्या बांधकाम विभागाने या सर्व कामांचे टेंडर प्रसिद्ध केले आहे. दरम्यान नाशिक येथील तीन आखड्यांनाही निधी मंजूर केला असून महापालिका निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर त्यांचे टेंडर प्रसिद्ध होईल, असे सांगितले जात आहे.
आखाडानिहाय कामे
जुना आखाडा .७८ लाख १२ हजार ८१६
महानिर्वाणी आखाडा. .७२ लाख ६० हजार १४०
अटल आखाडा : ७५ लाख २९ हजार २७९
निरंजनी आखाडा ; ७३ लाख ५६ हजार ३८०
आनंद आखाडा.: ७४ लाख २९ हजार ०५६
आवाहन आखाडा : ७४ लाख ८८ हजार १३३
अग्नी आखाडा : ७७ लाख ६५ हजार ६४४
निर्मल आखाडा : ७६ लाख ४२ हजार ५९०
नया उदासीन आखाडा : ७५ लाख ५२ हजार ०४७
बडा उदासीन आखाडा : ७७ लाख १६ हजार ६३५