

नाशिक (Nashik): गोदावरीच्या काठावर उभ्या राहणाऱ्या ‘गोदावरी गॅलरी’ आणि सिंहस्थ काळात साजऱ्या होणाऱ्या ‘गोदाफेस्ट’च्या माध्यमातून नाशिकची सांस्कृतिक व सामाजिक ओळख अधिक ठळक करण्याचा प्रयत्न प्रत्यक्षात येणार आहे.
या दोन्ही उपक्रमांसह जिल्ह्यातील नावीन्यपूर्ण आणि सामाजिक विकासाच्या प्रकल्पांसाठी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) निधीचा नियोजनबद्ध वापर करण्यासाठी नाशिक जिल्हा प्रशासनाने CSRBOX या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेसोबत सामंजस्य करार केला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या करारावर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि CSRBOXचे मुख्य कार्यकारी अधिकारी भोमिक शाह यांनी स्वाक्षऱ्या केल्या. या करारानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात ‘CSR पॉलिसी अँड अॅक्शन युनिट’ (CPAU) स्थापन करण्यात येणार असून, जिल्ह्याच्या विकास प्राधान्यांनुसार CSR गुंतवणूक आकर्षित करणे, तिचे व्यवस्थापन आणि अंमलबजावणी या युनिटमार्फत केली जाणार आहे.
CSRBOX ही संस्था देशभरात ३५० हून अधिक कंपन्या आणि CSR फाउंडेशन्ससोबत कार्यरत असून, नाशिकमध्ये ‘नाशिकरण’सारखे उपक्रम यापूर्वी राबवले गेले आहेत. या कराराअंतर्गत CSRBOXकडून जिल्हा प्रशासनाला तांत्रिक मार्गदर्शन दिले जाणार असून, गरजाधारित प्रस्ताव तयार करणे आणि शासकीय - अशासकीय संस्थांमध्ये समन्वय साधण्यासाठी एका प्रतिनिधीची नियुक्ती केली जाणार आहे.
या करारातील केंद्रस्थानी असलेली ‘गोदावरी गॅलरी’ सामाजिक प्रश्नांवर नावीन्यपूर्ण उपाय शोधण्यासाठी आणि परिणामकारक कल्पनांना व्यासपीठ देण्यासाठी विकसित केली जाणार आहे. तर ‘गोदाफेस्ट’च्या माध्यमातून नाशिकची सांस्कृतिक ओळख अधोरेखित करत, सांस्कृतिक अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा उद्देश आहे.
CSR निधीचा असा धोरणात्मक वापर करून नाशिकच्या विकासाला दिशा देण्याचा हा प्रयत्न लोकसहभाग, नवकल्पना आणि संस्कृती यांचा संगम घडवणारा ठरेल, असा विश्वास जिल्हा प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे.