

नाशिक (Nashik): महाराष्ट्र सरकारला प्रयागराज कुंभाप्रमाणे नाशिकचा कुंभमेळाही भव्य करायचा आहे. मात्र, सिंहस्थ कुंभमेळा भरणाऱ्या त्र्यंबकेश्वरचे कुशावर्त व नाशिकचे रामकुंड येथे जागा अगदीच तोकडी आहे. प्रयागराज कुंभमेळ्याच्या तुलनेत नाशिकला दहा टक्के भाविक आले, तरी नाशिकची सध्याची व्यवस्था कोलमडून पडू शकते.
यावर उपाय म्हणून कुंभमेळा विकास प्राधिकरणने त्र्यंबकेश्वरला गोदावरीवर जव्हारफाटा ते प्रयागतीर्थ व नाशिकला लक्ष्मीनारायण घाट, गंगापूर धबधबा, नवशा गणपती घाट व ओढा येथे गोदावरीवर घाट उभारण्यास प्रशासकीय मान्यता दिली आहे. यामुळे अमृतस्नानाच्या दिवशी कितीही भाविक आले, तरी त्यांना कुंभस्नानाची पर्वणी साधता येणार आहे.
यासाठी कुंभमेळा विकास प्राधिकरणकडून २७५ कोटींच्या घाटांना मंजुरी दिली असून त्यातील काही कामे सुरू झाले असून काही कामे टेंडर पातळीवर आहेत.
सिंहस्थ कुंभमेळा नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे विभागला गेला आहे. त्र्यंबकेश्वर येथे सन्यासी, उदासी व निर्मळ संप्रदायाचे १० आखाडे अमृतस्नान करतात, तर नाशिक येथे बैरागी संप्रदायाचे तीन आखाडे अमृतस्नान करतात. नाशिक-त्र्यंबकेश्वर येथील सिंहस्थ पावसाळ्यात येतो. तसेच या ठिकाणी स्नानासाठी जागा अपुरी आहे. त्यातच त्र्यंबकेश्वर येथे कुशावर्त कुंड अगदी तोकडे असून त्याच्याभोवती दाट लोकवस्ती आहे.
यामुळे तेथे एका मर्यादेच्या पलिकडे भाविक स्नान करू शकत नाही. यामुळे प्रशासनाने त्र्यंबकेश्वरला गोदावरीवर नवीन घाट उभारून तेथे भाविकांना कुंभस्नानाची सुविधा उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
त्र्यंबकेश्वरला दोन किलोमीटर घाट
मागील सिहस्थात अहिल्या धरणालगत नया उदासीन आखाड्यालगत घाट बांधण्यात आला होता. मात्र, या ठिकाणी कोणीही भाविक स्नानासाठी गेले नाहीत. ही बाब लक्षात घेऊन यावेळी गोदावरीवर जव्हार फाटा ते प्रयागतीर्थ या दरम्यान जवळपास दोन किलोमीटरचे घाट बांधण्यात येणार आहे. या घाटांवर पाणी उपलब्ध राहावे, यासाठी जलसंपदा विभागाकडून उपसा सिंचन योजनेद्वारे गौतमी गोदावरी धरणातून पाणी आणून ते अहल्या धरणात टाकले जाणार आहे.
यामुळे गोदावरी वाहती राहील व भाविकांची कुंभस्नानाची सोय होईल. यासाठी गोदीवरीच्या दोन्ही तीरांच्या बाजूने ३० मीटरचे रस्ते तयार केले जाणार असून तेथे पलीकडच्या तीरावर जाण्यासाठी ठिकठिकाणी पूल बांधले जाणार आहेत. यामुळे पर्वणीकाळात कितीही भाविक वाढले, तरी त्यांना कुंभस्नान घडवण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे.
या नवीन घाटांवर धार्मिक वातावरण निर्माण करण्यासाठी या घाटांवर गौतम ऋषी यांची भव्य मूर्ती बसवली जाणार आहे. या सर्व बाबींसाठी कुंभमेळा विकास प्राधिकरणने १७७ कोटी रुपयांची तरतूद केली जाणार आहे. ही सर्व कामे महाराष्ट्र पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडून केली जात आहेत.
नाशिकला चार घाट
नाशिकला गोदावरीवर रामकुंड ते गाडगेमहाराज पूल तेथून अमरधामपर्यंत मागील सिंहस्थात तसेत स्मार्टसिटी योजनेतून घाट बांधलेले आहेत. प्रयागराज कुंभमेळ्याला मिळालेला उदंड प्रतिसाद बघता नाशिकच्या सिंहस्थातही भाविकांची संख्या वाढू शकते हे गृहित धरून कुंभमेळा प्राधिकरणने नाशिकला गोदावरीवर नवीन चार घाट बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार लक्ष्मीनारायण घाट, गंगापूर धबधबा घाट, नवशा गणपती घाट उभारले जाणार आहे. यासाठी महाराष्ट्र पायाभूत सुविधा विकास महामंडळाने ७० कोटी रुपयांचे टेंडर प्रसिद्ध केले आहे.
लक्ष्मीनारायण घाटाचा उपयोग तपोवनात येणा-या भाविकांना करता येणार आहे. तसेच हरसूलमार्गे गुजरातहुन येणा-या भाविकांना गंगापूर धबधबा घाट व नवशा गणपती घाटाचा उपयोग करता येणार आहे. यावेळी ओढा रेल्वेस्थानक येथेही पर्वणी काळात रोज किमान २० रेल्वेगाड्या येऊ शकतील, अशी सुविधा करण्यात येत आहे.
या ठिकाणी उतरलेल्या भाविकांसाठी तेथे गोदावरी तीरावर घाट बांधण्यात येत असून त्यासाठी जलसंपदा विभागाने २० कोटी रुपयांचे टेंडर प्रसिद्ध केले आहे.
सिंहस्थ पर्वणीपर्यंत आलेल्या भाविकांना त्र्यंबकेश्वर येथे कुशावर्तात व नाशिकला रामकुंड परिसरात कुंभस्नान करता यावे, असेच आमचे प्रयत्न आहेत. पण एखाद्या पर्वणीला एकाचवेळी भाविकांची संख्या खूप वाढली व त्याना रामकुंड व कुशावर्त येथे पोहोचण्यास वेळ लागणार असल्यास. त्यांना या नवीन घाटांवर कुंभस्नानाची सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे. भाविकांना त्यांच्या इच्छेनुसार स्नान करण्याची मुभा असणार आहे. नवीन घाट हे गर्दी व्यवस्थापनाचा भाग आहे. त्यात भाविकांची दिशाभूल केली जाणार नाही.
- शेखर सिंह, आयुक्त, सिंहस्थ कुंभमेळा विकास प्राधिकरण