

नाशिक (Nashik): केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीने अहमदाबाद ते ढोलेरा सेमी हायस्पीड दुहेरी रेल्वे मार्गाला मंजुरी दिली आहे. हा निर्णय १३ मे २०२६ रोजी जाहीर करण्यात आला. हा प्रकल्प भारतीय रेल्वेचा पहिला स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित सेमी हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर मानला जात आहे. मात्र, यामुळे नाशिक-पुणे दरम्यान उभारल्या जाणा-या सेमाहायस्पीड रेल्वे मार्गाचा मुद्दा पुन्हा उपस्थित झाला आहे.
नाशिक-पुणे दरम्यानचा सेमीहायस्पीड रेल्वेमार्ग रेल्वे मंत्रालयाने रद्द करून जवळपास तीन वर्षे उलटूनही या दरम्यान नवीन मार्ग कसा असावा, याबाबत काथ्याकुट सुरू असताना अहमदाबाद - ढोलेरा दरम्यान देशसातील पहिला सेमीहायस्पीड रेल्वेमार्गास मंजुरी देत केंद्र सरकारने नाशिक, नगर व पुण्यातील नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळल्याची भावना व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र सरकारने महारेल कॉर्पोरेशनच्या माध्यमातून नाशिक-पुणे यांच्या दरम्यान सेमीहायस्पीड ट्रेन उभारणीचा निर्णय घेतला होता. त्या प्रकल्पासाठी महाराष्ट्र सरकार व भारत सरकार प्रत्येकी दहा टक्के निधी देणार व उर्वरित निधी महारेल कॉर्पोरेशन कर्जाद्वारे उभारणी करणार असे ठरले होते.
नाशिक ते पुणे यांच्या दरम्यान २३५ किलोमीटर मार्गासाठी अंदाजे १६ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. या मार्गासाठी महाविकास आघाडीच्या काळात नगर, नाशिक व पुणे जिल्ह्यात भूसंपादनही सुरू झाले होते. मात्र, २०२३ मध्ये रेल्वे मंत्रालयाने या प्रकल्पास मान्यता दिली नसल्याचे कारण देत भूसंपादन प्रक्रिया थांबवण्यास सांगितले.
त्यानंतर तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यात झालेल्या चर्चेत नाशिक व पुणे यांच्या दरम्यान प्रस्तावित केलेला मार्ग व्यवहार्य नाही. तसेच या रेल्मेमार्गामुळे नारायणगाव येथील 'जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप'ला (जीएमआरटी) नुकसान पोहोचू शकते, असे सांगण्यात आले. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी हा मार्ग व्यवहार्य केला जाईल, असे जाहीरपणे सांगितले होते.
त्यानुसार या रेल्वेमार्गाचे आरेखन बदलण्यात येऊन शिर्डीमार्गे प्रस्तावित करण्यात आले. तसेच नाशिक-सिन्नर-शिर्डी- पुणतांबे- नगर- चाकण या बदललेल्या आरेखनानुसार सर्वेक्षणही केले. त्यात या मार्गाची लांबी वाढून २६५ किलोमीटर झाल्याचे जाहीर करण्यात आले. या रेल्वेमा्र्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल जाहीर करण्यात आला.
दरम्यान या बदललेल्या मार्गाला संगमनेर, नारायणगाव परिसरातून तीव्र विरोध होत असल्याने नवीन मार्गाला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. यामुळे नाशिक-पुणे सेमीहायस्पीड रेल्वेमार्ग प्रलंबित असतानाच केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीने अहमदाबाद ते ढोलेरा या सेमीहायस्पीड दुहेरी रेल्वेमार्गाला मंजुरी दिली आहे.
देशातील पहिला सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प आता गुजरातमध्ये साकारणार असून अहमदाबाद ते ढोलेरा या १३४ किलोमीटर मार्गासाठी २० हजार ६६७ कोटी रुपये मंजूर केले आहेत. केंद्र सरकारच्या मते अहमदाबाद ते ढोलेरा प्रकल्प पुढील सेमी हायस्पीड रेल्वे नेटवर्कसाठी मॉडेल प्रकल्प म्हणून वापरला जाईल. तसेच हा प्रकल्प बहुआयामी वाहतूक नेटवर्क तयार करण्याच्या पीएम गतीशक्ती योजनेंतर्गत मंजूर करण्यात आला आहे.
नाशिक ते पुणे दरम्यान देशातील पहिला सेमी हायस्पीड रेल्वेमार्ग उभारण्याची घोषणा २०२१ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात करण्यात आली असताना तो प्रकल्प रद्द करून अहमदाबाद- ढोलेरा दरम्यान नवीन प्रकल्पाची घोषणा करणे म्हणजे या भागातील नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे, अशी भावना व्यक्त होत आहे.
दोन्ही प्रकल्पांची तुलना
नाशिक सेमी हायस्पीड प्रकल्प
अंतर : २३५ किमी
खर्च : अंदाजे १६ हजार कोटी रुपये
वेग : ताशी १८० किलोमीटर
अहमदाबाद-ढोलेरा सेमी हायस्पीड प्रकल्प
अंतर : १३४ किमी
खर्च : अंदाजे २० हजार ६६७ कोटी रुपये
वेग : ताशी २२० किलोमीटर
पूर्ण करण्याचा कालावधी २०३०-३१
नाशिक - पुणे दरम्यानचा रेल्वे प्रकल्प विकसित केला जाणे, ही काळाची गरज आहे. तो प्रकल्प रद्द करून नवीन प्रकल्पाला मंजुरी देण्यास उशीर झाला आहे. त्यातच अगदी तसाच प्रकल्प अधिक निधी मंजूर करून अहमदाबाद ते ढोलेरा दरम्यान उभारण्यास केंद्र सरकारने मंजुरी देण्याची बाब म्हणजे महाराष्ट्रातील, विशेषत: नाशिक, नगर व पुणे येथील नागरिकांना सापत्नभावाची वागणूक देणे आहे. ही बाब आम्ही आता जनतेच्या दरबारात घेऊन जाणार आहोत.
- राजाभाऊ वाजे, खासदार, नाशिक