नाशिक (Nashik) : शहरालगतच्या संसारी व चांदसी या ग्रामपंचायतींच्या हद्दीतील नववसाहतींमध्ये रस्ते उभारण्यासाठी अखेर नाशिक महानगर विकास प्राधिकरणने अखेर सव्वा पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. ग्रामपंचायतींच्या हद्दीत असलेल्या व नाशिक महापालिकेलगतच्या या वसाहतींच्या विकास आराखड्यावर नोंदणी शुल्क आकारून नाशिक महानगर विकास प्राधिकरण शुल्क आकारणी करीत असूनही तेथे सुविधा पुरवत नसल्याने तेथील रहिवाशांची मोठी ओरड आहे. अखेरीस या दोन ग्रामपंचातींच्या हद्दीत रस्त्यांसाठी निधी उपलब्ध केला असून इतर ग्रामपंचायतींच्या हद्दीतही पायाभूत सुविधा उपलब्ध करून देतील, अशी आशा व्यक्त होत आहे.
पुण्यापाठोपाठ नाशिक शहर झपाट्याने विकसित होत असून, वाढत्या शहरीकरणामुळे येथेही नियोजन बिघडत चालले आहे. याशिवाय आता शहरालगतच्या ग्रामपंचायतींच्या हद्दीतही मोठ्या प्रमाणात इमारती उभ्या राहू लागल्या आहेत. ग्रामीण हद्दीत येत असलेल्या या नववसाहतींचा विकास नियोजनपूर्वक व्हावा यासाठी राज्य सरकारने २०१५-१६ मध्ये नाशिकमहानगर विकास प्राधिकरण स्थापन झाले. महपालिकेसारखेच नियोजन आणि विकास प्राधिकरण असल्याने महापालिका हद्दीलगत म्हणजेच या प्राधिकरणाच्या क्षेत्राचा स्वतंत्र विकास आराखडा मंजूर करून त्यानुसार नवीन बांधकामांना मंजुरी दिली जाते.
मात्र, सध्या प्राधिकरणाकडे बांधकाम आराखडा मंजुरीसाठी टाऊन प्लॅनिंग विभाग वगळता अन्य कोणतीही यंत्रणा नाही. यामुळे एकीकडे या नववसाहतींवर विकास शुल्क आकारणी करणारे नाशिक महानगर विकास प्राधिकरण काहीही सुविधा पुरवत नाही व संबंधित ग्रामपंचायतीला त्यांना सुविधा देणे आवाक्याबाहेरचे आहे. यामुळे या भागातील नागरिक पायाभूत सुविधांपासून वंचित आहेत. या विकासशुल्कपोटी प्राधिकरणाकडे सुमारे चाळीस कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. मात्र, त्यातून नागरिकांसाठी काहीही सुविधा पुवल्या जात नाहीत. नाशिक महापालिका हद्दीलगतच्या चांदसी, जलालपूर, आडगाव, संसारी, नाशिक रोडलगत सध्या मोठ्या प्रमाणात बांधकामे होत आहेत. या नववसहातींमध्ये हजारो नागरिक राहत आहेत. मात्र, दुसरीकडे धड रस्ते ना पाणी, गटारींची समस्याही मोठ्या प्रमाणात आहे.
एनएमआरडीएकडून कोणत्याच सुविधा पुरवल्या जात नसल्याने ही शुल्क वसुली बंद करावी, अशी त्यांची भावना आहे. यावर तोडगा म्हणून महानगर विकास प्राधिकरणने ते शुल्क महापालिकेकडे वर्ग करावे व महापालिकेने त्यातून पायाभूत सुविधा पुरवाव्यात असाही प्रस्ताव आला होता. मात्र, त्यावर काहीही हालचाल होण्याच्या आतच शासनाच्या नगरविकास विभागाचे अवर सचिव अजयसिंग पाटील यांनी महानगर विकास प्राधिकरणाचे आयुक्त सतीश खडके यांना पत्र पाठवले असून चांदसी गाव अंतर्गत रस्ता सुधारणा कामांसाठी २ कोटी ५५ लाख तर संसारी गाव येथे रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे व नाल्याला संरक्षक भिंत उभारण्यासाठी २ कोटी ७२ लाख रुपये या प्रमाणे ५ कोटी २७ लाख मंजूर करण्यात आले आहेत. महानगर प्राधिकरणने तो निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केला असून त्याविभागामार्फत ही कामे केली जाणार आहेत. गेल्या पावसाळ्यात चांदशी भागातील नागरिकांचे प्रचंड हाल झाले होते. त्यानंतर आता रस्त्यांसाठी निधी मंजूर झाल्याने आगामी पावसाळ्यापर्यंत रस्ते तयार होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास चांदसीवासीयांचे हाल थांबतील.