
नाशिक (Nashik) : नाशिक जिल्हा परिषदेच्या (Nashik ZP) लघुपाटबंधारे पूर्व व पश्चिम विभागाचे एकत्रीकरण झाले असून, नव्याने तयार झालेल्या जलसंधारण विभागातील टेंडर लिपिकाच्या (Tender Clerk) तक्रारी वाढल्या होत्या. वाढत्या तक्रारींवरून त्यांचा पदभार काढून घेतल्याचे समजते. या बाबतचा प्रस्ताव प्रशासनाकडे सादर झाला आहे. संबंधित टेंडर लिपिकाचा पदभार हा विभागामधील कनिष्ठ सहाय्यक यांच्याकडे दिला जाण्याचा प्रस्ताव आहे.
जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागाच्या पूर्व व पश्चिम या दोन विभागांऐवजी नाशिक जिल्हा परिषदेत एकच जलसंधारण अधिकारी कार्यालय तयार करण्यात आले आहे. यामुळे जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने या दोन्ही विभागांचे समायोजन केले आहे.
जलसंधारण विभागाचे १५ विभाग रद्द करून केवल नऊ विभागीय कार्यालये करण्यात आली आहेत. या एकाच कार्यालयातून विभागाचे कामकाज चालते. या विभागातील टेंडर प्रक्रिया राबविण्याचे काम संबंधित टेंडर लिपिक करत होता.
मात्र, संबंधित टेंडर लिपिक यांच्या कामकाजाबाबत विभागाकडे लेखी तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. दिवसेंदिवस त्यांच्या तक्रारीत वाढ होत होती. वेळात टेंडर न उघडणे, ठराविक कामे करणे आदींबाबतच्या तक्रारीत समावेश होता.
गतवर्षी शिपायांमधून काही कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली होती. यात संबंधित कर्मचाऱ्यास देखील पदोन्नती मिळाली होती. मात्र, कामकाजात तक्रारी येत असल्याने त्यांचा पदभार काढून घेण्यात आला आहे. हा पदभार विभागामध्ये कार्यरत असलेल्या कनिष्ठ सहाय्यकांकडे सोपविण्याची शिफारस विभागाने केली आहे. त्याबाबतची फाइल देखील प्रशासनाकडे प्राप्त झाली आहे. हा पदभार काढल्याने कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.