Nashik Municipal Corporation
Nashik Municipal CorporationTendernama

Nashik : लोकसभा निवडणुकीमुळे महापालिकेची नालेसफाई लांबणार का? कारण काय?

Published on

नाशिक (Nashik) : महापालिकेकडून दरवर्षी एप्रिल-मे मध्ये पावसाळापूर्व नाला सफाईची कामे करीत असते. यंदा लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्यामुळे महापालिका प्रशासन निवडणूकसंबंधी कामांना जुंपले आहे. यामुळे नालेसफाईच्या कामाला विलंब होण्याची शक्यता आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी येत्या २० मेस मतदान होणार आहे. तोपर्यंत महापालिका प्रशासन निवडणुकीच्या कामात व्यस्त राहणार असल्याने नालेसफाईच्या कामांना जूनमध्ये मुहूर्त मिळण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या अंदाजपत्रकात गोदावरी स्वच्छतेसाठी तीन कोटींची तरतूद केली आहे. या तरतुदीतून नालेसफाईची कामे केली जातात.

Nashik Municipal Corporation
Nashik : स्वखर्चाने गाळ खोदून वाहून नेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांचा नवा निर्णय

महापालिका पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व नाल्यांतील घाण व गाळ काढून विशेष स्वच्छता मोहीम दरवर्षी राबवते. पावसाळ्यात व पावसाळ्यापूर्वी मुसळधार पावसामुळे नाले, गटारी तुंबतात. त्यामुळे सखल भागातील नागरी वस्तीत पाणी शिरण्याचा धोका असतो. नालेसफाई न केल्यामुळे गावठाण भागातील नाले व भूमिगत गटारींच्या बाहेर पाणी पडून पूरसदृश परिस्थिती निर्माण होते.

मागील काही वर्षांपासून नाशिक शहरातील रस्ते अल्पशा पावसातही तुंबतात. मोठ्या पावसात तर महापालिकेच्या या नालेसफाईचे पितळ दरवर्षी उघडे पडते. दरवर्षी महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून मे महिन्याच्या सुरवातीपासूनच नालेसफाईच्या कामाला सुरुवात होते. शहरातील नैसर्गिक नाले, भूमिगत गटारींची साफसफाई केल्याचे जाहीर केले जाते. प्रत्यक्षात पहिल्या मोठ्या पावसाने या सफाईतील कामचुकारपणा उघडकीस येत असतो. त्यावरून टीका होत असल्याने महापालिकेकडून आता शहरातील सहाही विभागांत दीड महिना आधीपासून ही मोहीम राबवली जात असते.

Nashik Municipal Corporation
Pune : धक्कादायक, पुण्यात दररोज तब्बल 900 वाहनांची पडते भर

यावर्षी निवडणूक कामांमुळे नाले सफाई २० मेपर्यंत होणे अशक्य दिसत आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी वीस मेस मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. इतर शासकीय कार्यालयांप्रमाणे महापालिकेचेही अडीच ते तीन हजार मनुष्यबळ निवडणूक प्रक्रियेत गुंतले आहे. त्यामुळे मनपात शुकशुकाट आहे. बांधकाम विभागही त्यास अपवाद नाही.

प्राथमिक स्तरावर बांधकाम विभागाकडून नालेसफाईचे प्राथमिक नियोजन सुरू आहे. त्यामुळे या कामाचे प्रस्ताव तयार करून ते मंजूर करण्याच्या प्रक्रियेसाठी कार्यालयांमध्ये कर्मचारी नाही. यामुळे प्रस्ताव तयार होऊन ते मंजूर होण्यासाठी मतदान पार पडल्यानंतरच मुहूर्त लागणार असल्याचे बोलले जात आहे.

Tendernama
www.tendernama.com