सिंहस्थाच्या माध्यमातून नाशिकचे ग्लोबल ब्रॅण्डिंग; डिजिटल, सोशल मीडियासह राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय माध्यमांवर भर

धार्मिक परंपरा, गोदावरी, तीर्थस्थळे, स्थानिक कला, खाद्यसंस्कृती आणि वारसा स्थळांच्या प्रसिद्धीसाठी स्वतंत्र आशय व सोशल मीडिया मोहिमेचे नियोजन
Sinhast Mahakumbh
Sinhast MahakumbhTendernama
Published on

नाशिक (Nashik): सिंहस्थाच्या निमित्ताने पायाभूत सुविधा, पर्यटन, आरोग्य, वाहतूक आणि गर्दी व्यवस्थापनाचे आराखडे तयार केले जात असतानाच आता नाशिक-त्र्यंबकेश्वरच्या ब्रॅण्डिंगसाठीही व्यापक माध्यम आराखडा तयार करण्यात येणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या माध्यमातून नाशिकची धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटनविषयक ओळख देशासह जागतिक पातळीवर पोहोचविण्यासाठी व्यापक व प्रभावी आराखडा तयार करावा, असे निर्देश माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी दिले.

Sinhast Mahakumbh
नाशिक कुंभमेळा प्राधिकरणाने भूमिका बदलली; अखेर गंगापूर डावा कालवा सुशोभीकरणाला मंजुरी

नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या सभागृहात माध्यम आराखड्यासंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. महासंचालक ब्रिजेश सिंह यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत सिंहस्थाच्या जागतिक स्तरावरील ब्रॅण्डिंगसाठी माध्यमांच्या समन्वित वापरावर भर देण्यात आला.

डिजिटल आणि पारंपरिक माध्यमांचा समन्वय

नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे १२ वर्षांनंतर कुंभमेळा भरत आहे. या पार्श्वभूमीवर पारंपरिक माध्यमांसोबतच डिजिटल माध्यमे, समाजमाध्यमे, दृक्-श्राव्य माध्यमे तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध माध्यमांचा समन्वयित वापर करण्याचे निर्देश देण्यात आले.

कुंभमेळ्याची वैशिष्ट्ये, धार्मिक परंपरा, ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा, गोदावरी नदी आणि प्रमुख तीर्थस्थळांची माहिती देश-विदेशातील भाविक आणि पर्यटकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी नियोजनबद्ध मोहीम राबविण्याचे नियोजन आहे.

पर्यटन ओळख निर्माण करण्यावर भर

कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिक-त्र्यंबकेश्वरची स्वतंत्र पर्यटन ओळख निर्माण करण्याबरोबरच अध्यात्मिक ठिकाणे, स्थानिक कला, संस्कृती, खाद्यपरंपरा, वारसा स्थळे आणि पर्यटनस्थळांचे प्रभावी सादरीकरण करण्यावर भर देण्यात आला आहे.

यासाठी विविध माध्यमांच्या गरजेनुसार स्वतंत्र आशय निर्मिती, प्रसिद्धीसाठी साहित्य आणि सोशल मीडिया मोहिमेचे सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Sinhast Mahakumbh
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थासाठी आश्रमांना १२ कोटींचा निधी; ८४ संस्थांची नोंदणी

विकासकामांची माहितीही पोहोचविणार

सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर नाशिक-त्र्यंबकेश्वरसह जिल्ह्यात सुरू असलेल्या दीर्घकालीन विविध पायाभूत सुविधा आणि विकासकामांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यावरही भर देण्यात आला आहे.

तसेच चुकीची माहिती आणि अफवांचे तातडीने खंडन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. कुंभमेळा प्राधिकरणाच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध विकासकामांची सविस्तर माहिती कुंभमेळा आयुक्तांनी बैठकीत दिली.

रामकुंड परिसराची पाहणी

बैठकीनंतर महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी रामकुंड परिसराला भेट देऊन पाहणी केली. सिंहस्थाच्या अनुषंगाने भाविकांना उपलब्ध होणाऱ्या सुविधा, प्रमुख स्थळांचे माध्यमीय सादरीकरण आणि प्रसिद्धीच्या दृष्टीने आवश्यक बाबींची त्यांनी माहिती घेतली.

यावेळी पोलिस आयुक्त डॉ. संदीप कर्णिक, कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, माहिती व जनसंपर्क विभागाचे संचालक डॉ. किशोर गांगुर्डे, प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त कमलाकर रणदिवे, नाशिक विभागाचे उपसंचालक डॉ. किरण मोघे, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, महासंचालकांचे विशेष कार्य अधिकारी इर्शाद बागवान आणि वृत्तचित्र विभागाचे वरिष्ठ सहायक संचालक सागरकुमार कांबळे आदी उपस्थित होते.

Sinhast Mahakumbh
सिंहस्थ कुंभमेळाः त्र्यंबकेश्वरमध्ये प्रयागतीर्थाजवळ 196 एकरांवर साधुग्राम

Key Points

  • सिंहस्थाच्या निमित्ताने नाशिक-त्र्यंबकेश्वरच्या ब्रॅण्डिंगसाठी व्यापक माध्यम आराखडा तयार करणार,

  • डिजिटल, समाजमाध्यमे, दृक्-श्राव्य तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या समन्वित वापरावर भर,

  • धार्मिक परंपरा, गोदावरी, तीर्थस्थळे, ऐतिहासिक-सांस्कृतिक वारसा आणि पर्यटनस्थळांची प्रसिद्धी करण्याचे नियोजन,

  • स्थानिक कला, संस्कृती आणि खाद्यपरंपरेला माध्यमांमधून प्रभावीपणे सादर करण्यावर भर,

  • विविध माध्यमांसाठी स्वतंत्र आशय निर्मिती आणि सोशल मीडिया मोहिमेचे नियोजन,

  • सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवरील दीर्घकालीन पायाभूत सुविधा आणि विकासकामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या सूचना,

  • चुकीची माहिती आणि अफवांचे तातडीने खंडन करण्याचे निर्देश.

Tendernama
www.tendernama.com