नाशिक कुंभमेळा प्राधिकरणाने भूमिका बदलली; अखेर गंगापूर डावा कालवा सुशोभीकरणाला मंजुरी

साबरमती रिव्हरफ्रंटच्या धर्तीवर विकासाची घोषणा; कालव्यालगत रस्ता उभारण्यासही मंजुरी, मात्र प्रशासकीय मान्यता अद्याप बाकी
Simhastha Maha Kumbh Mela, nashik
Simhastha Maha Kumbh Mela, nashikTendernama
Published on

नाशिक (Nashik): सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील पायाभूत सुविधांच्या कामांना गती देताना कुंभमेळा प्राधिकरणाने गंगापूर डावा कालवा तट सुशोभीकरणाच्या कामाला मंजुरी दिल्याचे महापालिकेने जाहीर केले आहे. महात्मा नगर ते मोतीवाला होमिओपॅथी कॉलेज या मार्गासाठी ६५ कोटी रुपयांना प्रशासकीय मान्यता दिल्यानंतर आता डाव्या कालव्याच्या विकासालाही मंजुरी मिळाली आहे. साबरमती रिव्हरफ्रंटच्या धर्तीवर कालवा परिसराचा विकास केला जाणार असल्याचे महापौरांनी सांगितले.

Simhastha Maha Kumbh Mela, nashik
महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णयः 500 कोटींवरील टेंडरसाठी आता ठेकेदारांचे ‘रेटिंग’

महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी रामायण निवासस्थानी उपमहापौर विलास शिंदे आणि स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेऊन या प्रकल्पाची माहिती दिली. गंगापूर उजव्या कालव्याप्रमाणेच डाव्या कालव्याच्या विकासालाही मंजुरी मिळाली असून, लवकरच कामाला सुरुवात होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रकल्पामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडण्याबरोबरच नागरिकांना विविध सार्वजनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत. सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर कालवा परिसराच्या विकासावर भर देण्यात येणार असून, त्यातून शहराच्या वाहतूक व्यवस्थेलाही चालना मिळेल, असा दावा महापौरांनी केला. पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था, नदी व कालवा परिसराचा विकास आणि नागरिकांच्या आवश्यक सुविधांवर भर देत शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या समन्वयातून कामांना गती देण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Simhastha Maha Kumbh Mela, nashik
Explainer: नाशिक-पुणे रेल्वेमार्गाचा वाद नेमका काय आहे?

प्राधिकरणाच्या भूमिकेत नेमका बदल कसा झाला?

काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सिंहस्थाशी संबंधित शिखर परिषदेत महापालिकेच्या समांतर गंगापूर रोडच्या प्रस्तावाला कुंभमेळा प्राधिकरणाकडून मंजुरी मिळत नसल्याचा मुद्दा उपस्थित झाला होता. त्यावेळी कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी सिंहस्थाशी संबंधित कामे कोणत्या भागात करायची आणि त्यांना कधीपर्यंत मान्यता द्यायची, याबाबत निर्णय घेणे आवश्यक असल्याचे सांगितले होते. त्यांच्या भूमिकेला मुख्यमंत्र्यांनीही पाठिंबा दिला होता.

त्यामुळे सिंहस्थाशी थेट संबंधित नसलेल्या कामांना कुंभमेळा प्राधिकरण मंजुरी देणार नाही, असा संदेश गेला होता. मात्र, आता गंगापूर उजव्या कालव्यावरून गंगापूर रोडला समांतर रस्त्याच्या कामाला मंजुरी देतानाच डाव्या कालव्याचे सुशोभीकरण आणि त्यालगत रस्ता उभारण्याच्या कामालाही मंजुरी दिल्याचे महापौरांनी जाहीर केले आहे.

या कामांना अद्याप प्रशासकीय मान्यता मिळालेली नाही. मात्र, लवकरच प्रशासकीय मान्यता मिळण्याचे संकेत देण्यात आले आहेत. सिंहस्थाशी थेट संबंध नसलेल्या या कामाला कुंभमेळा प्राधिकरणाने मंजुरी कशी दिली, असा प्रश्न त्यामुळे उपस्थित होत आहे.

Simhastha Maha Kumbh Mela, nashik
टेंडर कोण भरू शकतो? सरकारी काम मिळवण्यासाठीची पात्रता काय?

याचसाठी प्राधिकरण लक्ष्य?

नाशिकमध्ये गेल्या महिनाभरापासून विशेषतः सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेच्या नगरसेवकांकडून कुंभमेळा प्राधिकरणाच्या आयुक्तांवर टीका केली जात होती. शहरातील रस्त्यांची कामे महापालिकेच्या बांधकाम विभाग आणि प्रशासनाच्या अखत्यारित असतानाही या कामांवरून कुंभ प्राधिकरणाला लक्ष्य केले जात असल्याचे चित्र होते.

भाजपच्या शहराध्यक्षांनी नाशिकचे प्रश्न बाहेरून आलेल्यांपेक्षा स्थानिकांना अधिक समजतात, तसेच अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींच्या सूचनांकडे गांभीर्याने पाहावे, असे वक्तव्य केले होते. मात्र, या आठवड्यापासून नगरसेवकांचा प्राधिकरणावरील विरोध अचानक मावळल्याचे दिसत आहे. त्यामुळे या विरोधामागील नेमके कारण काय होते, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Simhastha Maha Kumbh Mela, nashik
टेंडर म्हणजे काय? जाणून घ्या टेंडर प्रक्रियेचा A to Z प्रवास

Key Points

  • नाशिक कुंभमेळा प्राधिकरणाने गंगापूर डावा कालवा तट सुशोभीकरणाला मंजुरी दिल्याचे महापालिकेचे जाहीर,

  • साबरमती रिव्हरफ्रंटच्या धर्तीवर कालवा परिसराचा विकास करण्याची घोषणा,

  • कालव्यालगत रस्ता उभारण्याच्या कामालाही मंजुरी; प्रशासकीय मान्यता अद्याप बाकी,

  • यापूर्वी सिंहस्थाशी संबंधित नसलेल्या कामांना मंजुरी न देण्याची भूमिका मांडण्यात आली होती,

  • नगरसेवकांचा प्राधिकरणावरील विरोध अचानक मावळल्याने या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित.

Tendernama
www.tendernama.com