

नाशिक (Nashik): सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने प्रस्तावित केलेल्या ‘सिंहस्थ परिक्रमा’ (रिंग रोड) प्रकल्पसाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू झाली आहे. या मार्गासाठी भूसंपादन करण्यापूर्वी जिल्हा प्रशासनाकडून शेतकऱ्यांशी चर्चा सुरू आहे.
या मार्गाविषयी शेतकऱ्यांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. या परिक्रमा मार्गाविषयी प्रशासनाकडून गुप्तता पाळली गेली. तसेच या मार्गाचे स्वरूपही कोणी समोर येऊन न सांगितल्यामुळे हा रस्ता समृद्धी महामार्गासारखा जमिनीपासून उंच असेल का? त्याच्या दोन्ही बाजूंनी कुंपन असेल का, असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांसह इतरांनाही पडले आहेत.
या पार्श्वभूमीवर आता भूसंपादन प्रक्रिया सुरू झाल्यानंतर प्रशासनाकडून या प्रश्नांचे निराकरण केले जात आहे. त्यानुसार हा रिंगरोड चौपदरी राहणार असून त्याला लागून दोन्ही बाजूंनी सर्व्हीस रोड असणार आहे. याशिवाय हा रस्ता डांबरी असणार आहे, असे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. या प्रमाणेच टेंडर प्रसिद्ध करण्यात आल्याचेही आवर्जून सांगितले जात आहे.
सिंहस्थ काळात नाशिस व त्र्यंबकेश्वर येथे कोट्यवधी भाविक येणार आहेत. यामुळे त्या गर्दीचा ताण नाशिकचे सध्याचे रस्ते सहन करू शकणार नाही. यामुळे नाशिक व त्र्यंबकेश्वरमध्ये २०२७ मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेऊन ६५.६६ किलोमीटर लांबीचा रिंगरोड प्रस्तावित केला आहे.
या रिंगरोडमुळे नाशिक शहरावरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच पालघरमध्ये प्रस्तावित केलेल्या वाढवण बंदरासाठी जाणारी वाहतून या रिंगरोडने वळवली जाणार आहे. यामुळे सिंहस्थ कुंभमेळा व भविष्यातील वाहतूक यांचा विचार केल्यास हा रिंगरोड महत्वाची भूमिका बजावणार आहे.
हा सिंहस्थ परिक्रमा मार्ग आडगावचे डीआरडीओ जंक्शन, दिंडोरी रस्त्यावर ढकांबे शिवार, नाशिक-पेठ महामार्ग, गंगापूर- गोवर्धन- त्र्यंबकरोडवर पिंपळगाव बहुले, नाशिक- मुंबई महामार्गावर विल्होळी, नाशिक-पुणे मार्गावर सिन्नर फाटा व आडगाव असा असणार आहे. या रिंगरोडसाठी ३१२० कोटी रुपयांचे टेंडर प्रसिद्ध केले असून भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.
या परिक्रमा मार्गासाठी ६० मीटर रुंद भूसंपादन प्रस्तावित असून त्या मध्यभागी चार पदरी मुख्य रस्ता असणार आहे. विशेष म्हणजे, स्थानिक वाहतुकीसाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी ७ मीटर रुंदीचे दुहेरी सर्व्हिस रोड बांधले जातील. हा संपूर्ण मार्ग डांबरी पृष्ठभागाचा आहे.
या मार्गाला जोडल्या जाणा-या सर्व प्रमुख रस्त्यांवर वाहनांसाठी भुयारी मार्ग आणि सर्व्हिस रोडची तरतूद करण्यात आली आहे. काही ठिकाणी चौक विकसित केले जातील. आणखी विशेष म्हणजे हा रस्ता समृद्धी महामार्गासारखा उंच असणार नाही. तसेच या मार्गाला दोन्ही बाजूंनी कोणतेही कुंपण घातले जाणार नाही. हा रस्ता जमिनीचा पोत आणि स्थानिक गरजा लक्षात घेऊन आवश्यक तितकीच उंची धरून बांधला जाणार आहे.
सुरक्षिततेसाठी योग्य त्या उपाय योजना केल्या जाणार असून स्थानिकांची वहिवाट सुलभ राहील याची दक्षता घेतली आहे. हा मार्ग बांधताना गरजेनुसार ठराविक अंतरावर सिमेंट पाईप टाकून ‘क्रॉसिंग’ची सुविधा दिली जाईल. तसेच, रिंग रोडच्या मार्गात येणाऱ्या नदी-नाल्यांचा नैसर्गिक प्रवाह खंडित होऊ नये म्हणून जलविसर्ग व प्रवाहाची गती तपासून पूल आणि पाईप मोरींची तरतूद करण्यात आल्याचे स्पष्टीकरण भूसंपादन अधिकारी शेतकऱ्यांशी चर्चा करताना देत आहेत.
या महामार्गामुळे भूसंपादनात जमीन जाणार आहे. त्याबदल्यात चांगला मोबदलाही मिळणार आहे. याशिवाय या मार्गामुळे त्या भागातील संपर्क व दळणवळण सुविधा वाढणार असल्याने त्याचा फायदा मोठा आहे, असेही सांगण्याचा प्रयत्न या चर्चेतून केला जात आहे.