Smart Simhastha: गर्दी नियंत्रण ते पार्किंगची माहिती एकाच क्लिकवर! सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी 'स्मार्ट' डिजिटल इकोसिस्टीम होणार सज्ज

रिअल-टाईम माहिती, गर्दी व्यवस्थापन, पार्किंग आणि आपत्कालीन सेवा एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर; प्रयागराजच्या धर्तीवर नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये हायटेक नियोजन
Kumbh Mela 2027 Logo
Kumbh Mela 2027 LogoTendernama
Published on

नाशिक (Nashik): नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला आता डिजिटल स्वरूप प्राप्त होत आहे. लाखो नव्हे तर कोट्यवधी भाविकांच्या व्यवस्थापनासाठी अत्याधुनिक माहिती-तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेत नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने अधिकृत वेबसाइट आणि मोबाईल ॲप विकसित करण्यासाठी टेंडर प्रसिद्ध केले आहे.

Kumbh Mela 2027 Logo
Kumbh Mela Nashik 2027: IIT मुंबई तपासणार कुंभमेळ्यातील कामांची गुणवत्ता

त्यातून निवडण्यात येणाऱ्या एजन्सीला केवळ वेबसाइट तयार करण्याचे कामच नव्हे, तर मोबाईल ॲपची निर्मिती, संपूर्ण प्रणालीचे डिझाइन, विकास, चाचणी, अंमलबजावणी, होस्टिंग, देखभाल, सुरक्षा आणि तांत्रिक सहाय्याची जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प केवळ वेबसाइट उभारण्यापुरता मर्यादित नसून, सिंहस्थ कुंभासाठी सर्वसमावेशक डिजिटल इकोसिस्टीम उभारण्याचा प्रयत्न मानला जात आहे.

प्रयागराज महाकुंभ २०२५ मध्ये डिजिटल सेवांचा मोठ्या प्रमाणावर वापर झाला होता. त्याच धर्तीवर नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थमध्येही आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिक प्रभावी वापर करण्याची तयारी कुंभमेळा प्राधिकरणने सुरू केली आहे. या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून भाविकांना अधिक सुलभ सेवा मिळण्याबरोबरच पर्वणीकाळात प्रशासनाची कार्यक्षमता वाढवण्य़ाचा हेतु आहे.

Kumbh Mela 2027 Logo
Nashik: सिंहस्थासाठी लावणार ऑलिम्पिक दर्जाचे दिशादर्शक फलक

त्यादृष्टीने नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने तयार केलेल्या आराखड्यानुसार वेबसाइट आणि मोबाईल ॲपवर भाविकांना आवश्यक असलेली सर्व माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होईल. सिंहस्थ कुंभमेळ्यातील शाही स्नानाच्या तारखा, घाटांची माहिती, मंदिरे, पार्किंग व्यवस्था, वाहतूक मार्ग, निवास व्यवस्था, विविध शासकीय विभागांच्या सेवा, आपत्कालीन संपर्क क्रमांक, महत्त्वाच्या सूचना, नकाशे आणि मार्गदर्शन यांसह अनेक सुविधा डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.

विशेष म्हणजे या प्रणालीमध्ये रिअल-टाईम अपडेट्स देण्याची सुविधाही विकसित करण्यात येणार असून, प्रशासनाकडून तातडीच्या सूचना किंवा वाहतुकीतील बदल त्वरित भाविकांपर्यंत पोहोचवता येणार आहेत.

प्रशासनासाठीही प्रभावी साधन
कुंभमेळ्यादरम्यान पोलीस, महसूल, आरोग्य, महापालिका, परिवहन, आपत्ती व्यवस्थापन अशा अनेक विभागांचा समन्वय आवश्यक असतो. प्रस्तावित डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे विविध विभागांमध्ये माहितीची देवाणघेवाण अधिक जलद आणि प्रभावी होण्याची अपेक्षा आहे. याशिवाय गर्दी व्यवस्थापन, वाहतूक नियंत्रण, नागरिकांच्या तक्रारी, सूचना प्रसारित करणे आणि विविध सेवांचे निरीक्षण यासाठीही या प्रणालीचा उपयोग होणार आहे.

Kumbh Mela 2027 Logo
Kumbh Mela Infra: वेळेचे गणित हुकणार? अवघे 10 महिने शिल्लक! कुंभमेळा प्राधिकरणाच्या कामांचा वेग मंदावलाय का?

आधुनिक तंत्रज्ञानावर भर
सिंहस्थाशी संबंधित हे संकेतस्थळ व संलग्न अॅप  वापरकर्त्यास सहज वापरता येईल असा इंटरफेस, उच्च दर्जाची सायबर सुरक्षा, डेटा संरक्षण, भविष्यात वाढणाऱ्या वापरकर्त्यांची क्षमता, उच्च उपलब्धता आणि कार्यक्षम देखभाल यावर विशेष भर देण्यात येणार आहे. तसेच लाखो भाविक एकाच वेळी ॲप आणि वेबसाइटचा वापर करत असतानाही सेवा सुरळीत सुरू राहतील, अशी प्राधिकरणची अपेक्षा आहे.

यामुळे प्राधिकरणाने माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील अनुभवी कंपन्यांकडून प्रस्ताव मागविले असून, तांत्रिक पात्रता, संबंधित प्रकल्पांचा अनुभव, मनुष्यबळाची क्षमता आणि आर्थिक पात्रता या निकषांच्या आधारे एजन्सीची निवड केली जाणार आहे.

Kumbh Mela 2027 Logo
Nashik Simhastha 2027: पहिल्याच पावसाने उडवली दाणादाण; हलगर्जी कंत्राटदार आणि अधिकारी प्रशासनाच्या रडारवर

स्मार्ट सिंहस्थसाठी महत्त्वाचे पाऊल
डिजिटल इंडिया, ई-गव्हर्नन्स आणि स्मार्ट सार्वजनिक सेवा या संकल्पनांना बळ देणारा हा प्रकल्प आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या व्यवस्थापनात महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे मानले जात आहे. वेबसाईट आणि मोबाईल ॲप ही आता केवळ माहिती देणारी साधने राहिलेली नाहीत.

सिंहस्थसारख्या कोट्यवधी भाविकांच्या मेळाव्यात गर्दी नियंत्रण, आपत्कालीन प्रतिसाद, वाहतूक व्यवस्थापन आणि नागरिकांशी सातत्याने संवाद साधण्यासाठी ती अत्यावश्यक ठरत आहेत. त्यामुळे कुंभमेळा प्राधिकरणाचे हे टेंडर भविष्यातील स्मार्ट सिंहस्थ उभारण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा मानले जात आहे.

Tendernama
www.tendernama.com