Nashik : शाळा दुरुस्तीचा निधी वळवला रस्ते दुरुस्तीसाठी; महापालिकेच्या शिक्षण विभागाचे अखेर 'बांधकाम'ला पत्र
नाशिक (Nashik) : महापालिकेच्या बांधकाम विभागाने मागील तीन वर्षांपासून शिक्षण विभागाच्या शाळा दुरुस्तीसाठी तरतूद केलेला निधी रस्ते दुरुस्तीसाठी वळवला आहे. यामुळे तीन वर्षांपासून महापालिकेच्या शाळांची दुरुस्ती अभावी दुरवस्था झाली आहे. यामुळे अखेरीस शिक्षण विभागाने बांधकाम विभागाला पत्र पाठवून सध्या शाळांना उन्हाळी सुट्या असून या काळात महापालिकेच्या सर्व शाळांची दुरुस्ती होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
एकीकडे महापालिकेच्या शाळांमध्ये स्मार्टस्कूल योजनेसाठी तरतूद केली जात असताना या शाळांची दुरुस्तीअभावी झालेली दुरवस्था या पत्रामुळे समोर आली आहे.
नाशिक महापालिकेच्या ८८ प्राथमिक व १२ माध्यमिक शाळा आहेत. या शाळांच्या ७० इमारती आहेत. स्मार्ट सिटी कंपनीकडून ८२ शाळांमध्ये स्मार्टस्कूल प्रकल्प राबवण्यात आला आहे. मात्र, महापालिकेच्या ८२ पैकी यातील जवळपास ३५ शाळांना पुरेसा वीजपुरवठा नाही. त्या व्यतिरिक्त १२ शाळांची दुरवस्था झाली आहे.
शिक्षण विभागाकडून दरवर्षी शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर वर्गखोल्या दुरुस्तीचे पत्र बांधकाम विभागाला सादर केले जाते. मागील तीन वर्षांपासून महापालिकेचा शिक्षण विभाग बांधकाम विभागाला पत्र देत आहे. मात्र, त्यानंतरही या बारा शाळांमधील वर्गखोल्यांची दुरुस्ती करण्यात आलेली नाही.
महापालिका अंदाजपत्रकात शाळा दुरुस्तीसाठी निधीची तरतूद करते. मात्र, हा निधी परस्पर शहरातील रस्ते दुरुस्तीसाठी वळवला जातो. त्यामुळे एकीकडे शाळा स्मार्ट होत असताना त्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होणार असेल, तर महापालिकेच्या शाळांचा दर्जा कसा सुधारणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शिक्षण विभागाने यावर्षीही बांधकाम विभागाला पत्र पाठवले असून, त्यात वर्गखोल्या दुरुस्तीची मागणी करण्यात आली आहे. या पत्रात शाळा दुरुस्तीकडे केल्या जात असलेल्या दुर्लक्षाबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
विविध उपक्रमांमुळे ६६ महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या वाढत आहे. त्यात वर्गखोल्या कमी पडत आहेत. त्या शिवाय वर्ग खोल्यांची दुरुस्ती देखील गरजेची असल्याने मागणी केली आहे, असे शिक्षण विभागाचे म्हणणे आहे.
विद्यार्थ्यांची संख्या वाढत असल्याने वर्गखोल्या अपुऱ्या पडत असल्याचे या पत्रात निदर्शनास आणून दिले आहे. महापालिकेच्या शिक्षण विभागाने पाठवलेल्या पत्रानुसार वर्ग खोल्यांच्या खिडक्यांचे तावदाने बदलणे, दारांना कडी-कोयंडा बसवणे, खिडक्यांना जाळी बसवणे, स्वच्छतागृहांची दुरस्ती, छत गळती, नवीन वर्गखोल्या बांधणे, पत्र्यांचे शेड टाकणे, शोषखड्डा करणे, ग्रील व चॅनल गेट बसविणे, या कामांचा समावेश आहे.