Nagpur : अजून होणार पाणीटंचाई कारण कामे अडकली आचारसंहितेत

water
waterTendernama

नागपूर (उमरेड) (Nagpur) : उन्हाचा पारा कमालीचा वाढत आहे. आग ओकणाऱ्या उन्हात, अंगाची लाहीलाही होत असताना अनेक गावांमध्ये पाणी टंचाईचाही सामना गावकऱ्यांना करावा लागत आहे. यावर उपाययोजना म्हणून पिण्याचे पाणी टंचाई कृती आराखडा लाखमोलाचा ठरतो. उमरेड पंचायत समितीने जिल्हा परिषदेकडे पाणीटंचाई कृती आराखडा पाठविल्यानंतर त्याला हिरवी झेंडीसुद्धा दिली.

water
Nagpur : 'येथे' बनणार 246 खाटांचे वसतिगृह; मिळाला 55 कोटींचा निधी

उमरेड तालुक्यातील एकूण 92 कामांसाठी 1 कोटी 46 लाख रुपयांच्या खर्चाला मंजुरीही मिळाली. असे असले तरी अद्याप कामे सुरू झालेली नाहीत. कामे कधी सुरू होणार, असा सवाल ग्रामस्थांचा आहे. 2023-24 या सत्राकरिता पिण्याच्या पाण्याची टंचाई कृती आराखडा भाग-2 हा 1 जानेवारी ते 31 मार्च 2024 पर्यंत तसेच भाग-3 , 1 एप्रिल ते 30 जूनपर्यंतचा आहे. याबाबतचा प्रस्ताव पंचायत समितीने जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंत्यांकडे पाठविला. भाग-2 मध्ये सात कामांसाठी 70 लाख आणि भाग-3 मध्ये 85 कामांसाठी 75 लाख 65 हजार रुपयांचा खर्च अपेक्षित होता. एकूण 92 कामांसाठी 1 कोटी 45 लाख 65 हजार रुपयांच्या खर्चास मंजुरीचा प्रस्ताव पाठविला गेला. त्याला जिल्हा परिषदेकडून मंजुरीही मिळाली. पंचायत समितीच्या बांधकाम विभाग अभियंत्यास याबाबत  विचारणा केली असता, त्यांनी उपरोक्त माहिती दिली. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून 6 मार्चला या कामांना मंजुरी मिळाली. 20 मार्चला याबाबतचे पत्रही पंचायत समितीकडे पोहोचते झाले. असे असले तरी दुसरीकडे कामे अद्याप सुरूच व्हायची आहेत. याबाबत विचारणा केली असता, निवडणुकीची - आचारसंहिता हे कारण सांगण्यात आले. पाणीटंचाई आराखडा कामांना कसली आचारसंहिता असा सवाल विचारला जात आहे.

water
Nagpur ZP : अनेक विकासकामे प्रलंबित; आता प्रतीक्षा आचारसंहिता...

नळयोजना विशेष दुरुस्ती : 

नळयोजना विशेष दुरुस्तीसाठी प्रत्येकी 10 लाख रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला होता. यामध्ये चनोडा, खुर्सापार, कान्हवा, वायगाव, सुरगाव, पाचगाव, सिर्सी या गावांचा अंतर्भाव आहे. या योजनेच्या एकूण सात गावातील कामांसाठी 70 लाख रुपयांची मंजुरी प्रदान केली गेली.

हातपंप विशेष दुरुस्ती :

उमरेड तालुक्यात हातपंप विशेष दुरुस्तीसाठी एकूण 64 ठिकाणचे प्रस्ताव पाठविण्यात आले होते. यासाठी 22 लाख 40 हजार रुपयांचा खर्च अपेक्षित होता. बोथली, डव्हा, खापरी, फुकेश्वर, खुर्सापार, डोंगरगाव, पिपरडोल, लोहारा, घोटुर्ली, हेवती, कळमना (उमरेड), पिराया, आंबोली, सेव, वानोडा, देणी, चांपा, सुकळी, हळदगाव, पिपळा, आपतूर, सालई, सोनपुरी, ब्राह्मणी, कोटगाव आदी गावांमध्ये एकूण 64 प्रस्तावास हिरवी झेंडी मिळाली. 22 लाख 40 हजार रुपयांचा खर्चही मंजूर झाला.

विहीर खोलीकरण :

उन्हाळ्यात अनेक ठिकाणी पाण्याची पातळी खोल जात असते. अशावेळी सार्वजनिक विहीर खोलीकरणासाठी नियोजन आखले जाते. या योजनेत एकूण नऊ कामांसाठी 45 लाख रुपयांच्या खर्चाचा प्रस्ताव पाठविला गेला. बोथली, ठोंबरा, वेलसाखरा, हळदगाव, उटी, आपतूर, कळमना (बेला), शेडेश्वर, खैरी या नऊ गावांचा यात समावेश होता. या 45 लाख रुपयांच्या कामांनाही मंजुरी  प्रदान केली गेली.

टँकरमुक्त तालुका :

सध्या उमरेड तालुका टँकरमुक्त आहे. सद्यःस्थितीत एकाही गावात टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली नाही. असे असले तरी पाणीसंकट लक्षात घेता, काही खासगी विहिरींच्या अधिग्रहणाबाबतचे नियोजनसुद्धा आखले गेले आहे. यामध्ये उदासा, कहांडला, भापसी, बारव्हा, विरली, पिपळा, अकोला, चनोडा, किन्हाळा, बोथली, सांडीगोंडी, उमरा, मुरझडी, तांबेखनी या 14 गावांमधील खासगी विहिरींच्या अधिग्रहणाचा प्रस्ताव होता. या 7 लाख 70 हजार रुपयांच्या कामांनाही मंजुरी मिळाली. रोजगार हमी योजना, पाणीटंचाई, दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजना या कामांसाठी कधीही कोणतीही आचारसंहिता आड येत नाही. ही कामे थांबविली जाऊ शकत नाहीत वा प्रभावित होत नाही. याबाबत कोणत्याही विभागाला मार्गदर्शन हवे असल्यास आम्ही त्यांना अवश्य सांगू. अशी प्रतिक्रिया उपविभागीय अधिकारी, उमरेड विद्यासागर चव्हाण यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com