Nashik
NashikTendernama

Nashik: गोदावरीवरील रामझुला पुलाच्या व्यवहार्यतेवर प्रश्नचिन्ह

विकासाच्या कुंभमेळ्यात आपण सूचवलेल्या कामांचाही समावेश व्हावा, यासाठी लोकप्रतिनिधी, मंत्री यांच्यात स्पर्धा
Published on

नाशिक (Nashik): सिंहस्थ कुंभमेळानिमित्ताने सध्या नाशिक व त्र्यंबकेश्वर परिसरात अनेक विकासकामे मंजूर केली असून, अनेक कामे मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहेत. या विकासाच्या कुंभमेळ्यात आपण सूचवलेल्या कामांचाही समावेश व्हावा, यासाठी लोकप्रतिनिधी, मंत्री यांच्यात स्पर्धा लागल्याचे चित्र दिसत आहे. त्यातूनच सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण, नाशिक महापालिका यांना नवनवीन कामांच्या सूचना दिल्या जात आहेत. त्या सूचना देताना त्या कामांचा सिंहस्थ कुंभमेळ्याशी कितपत संबंध आहे, याचाही विचार केला जात नाही.

Nashik
Nashik: नाशिककरांसाठी गुड न्यूज! सिंहस्थापूर्वीच फुटणार प्रमुख 12 चौकांतील वाहतूक कोंडी

अशाच सूचनांचा परिपाक म्हणजे रामसेतू पुलाला समांतर प्रस्तावित केलेला २५ कोटींचा रामझुला पूल आहे. या पुलाचा आकार लक्षात घेता त्याचा हेतू कितपत उपयोग होणार याचा कोणताही विचार न करता रामझुला बांधण्याचा निर्णय घेताना महापालिका प्रशासनाने केवळ प्राधिकरण निधी देणार आहे, म्हणून होऊ दे खर्च या भावनेतून कामे सूचवत नाही ना अशी शंका आता नागरिकांना येऊ लागली आहे. दरम्यान हा रामझुला तपोवनात उभारण्याचीही मागणी समोर आली आहे.

पंचवटी व नाशिक यांना जोडणारे नाशिक शहरात अनेक पूल आहेत. त्या प्रत्यक्ष रामकुंड परिसरात तीन पूल आहेत. त्यातील रामसेतू हा पूल गोदावरीस पूर आल्यानंतर पाण्याखाली जातो. तसेच तो पूल धोकादायक झाला आहे. यामुळे महापालिकेने सिंहस्थ आराखड्यात रामसेतू पूल पाडण्याचा निर्णय घेऊन त्या ठिकाणी नवीन पूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे.

हा पूल धोकादायक असल्याने यापूर्वीच तो बंद करण्यात आला होता. महापालिकेने निधी अभावी तो पूल सिंहस्थ निधीतून उभारण्यासाठी आतापर्यंत त्याबाबत निर्णय घेतला नव्हता. आता कुंभमेळा प्राधिकरणाने नाशिकमधील रस्ते व गोदावरीवरील तीन नवीन पुलांना मंजुरी दिली असून त्यात रामसेतू पुलाचा समावेश आहे.

Nashik
Nashik: जिल्हाधिकाऱ्यांचा एक निर्णय अन् 390 गावांची 'त्या' समस्येतून होणार कायमची सुटका

हा पूल रामसेतूप्रमाणे केवळ पादचा-यांसाठी उभारला जाणार आहे. गोदावरी नदीवर जुने नाशिकमधील बालाजी कोट ते पंचवटीतील गणेशवाडी भाजीबाजार यांना जोडणार आहे. हा भाग सखल असल्यामुळे तेथे उभारलेला पूल गोदावरीला पूर आल्यानंतर पाण्याखाली जातो. यामुळे आमदार देवयानी फरांदे यांच्या सूचनेनुसार रामसेतूच्या समांतर राम झुला पूल तयार केला जाणार आहे.

रामसेतू पूरस्थितीत पाण्याखाली जात असल्याने घाट परिसर व सध्याचे पादचारी पूल अनेकदा वाहतुकीला बंद ठेवावे लागतात. त्यामुळे रामसेतूप्रमाणे न करता हा रामझुला धनुष्याच्या आकाराचा केला जाणार आहे. या आकारामुळे नाशिकचे धार्मिक महत्त्व त्यातून उमटेल, असे मानले जात आहे.

नवीन रामझुला पूल निळ्या पूररेषेच्या पातळीपेक्षा उंच असणार आहे. यामुळत तो वर्षभर वापरण्या योग्य राहील. महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, भाविक आणि पर्यटक यांना सुरक्षित मार्ग उपलब्ध होईल. बालाजी मंदीर, रामकुंड, काळाराम मंदीर, मेनरोड, सराफ बाजार, तपोवन आणि गणेशवाडी बाजार हे प्रमुख भाग यामुळे जोडले जातील, असे या पुलाची उभारणा करण्यासाठी सांगितले जात आहे. दरम्यान या पुलाचा वापर खूपच कमी होणार असल्याने व त्याता हेतु पर्यटन वाढ हा असेल, तर रामझुला हा तपोवनात उभारण्यात यावा, अशी मागणी पुढे आली आहे.

Nashik
Nashik: मंत्री कोकाटेंनी शोधली सिंहस्थ आराखड्यातील त्रुटी! काय सूचविले 2 नवे पर्याय?

पुलाच्या व्यवहार्यतेचे काय?

पूल, धरण, बंधारे, रस्ते आदी प्रकल्पांना मंजुरी देण्यापूर्वी त्याचा व्यवहार्यता अहवाल तयार केला जातो. रामझुला उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यापूर्वी त्याचा व्यवहार्यता अहवाल तयार करण्यात आला होता का, या प्रश्नाचे कोणाकडेही उत्तर नाही. त्याचप्रमाणे हा रामझुला निळ्या पूर रेषेपेक्षा अधिक उंच राहणार आहे. तसेच तो धनुष्याच्या आकाराचा असणार आहे, या दोन बाबींचा विचार केल्यास तो पूल चढून जाणे वृद्ध, दिव्यांग यांना शक्य आहे का, या बाबींचाही विचार केलेला दिसत नाही.

त्याचप्रमाणे आधीच महापालिकेने गोदावरीच्या पुरांचा विचार न करता अनेक पूल उभारल्याने  शहरात पूररेषा वाढून नागरिकांचे नुकसान झालेले आहे. त्यात आणखी एका पुलाची भर पडायला नको, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

Nashik
Nashik: केंद्र - राज्य सरकार संयुक्तपणे उभारणार सिंहस्थ परिक्रमा मार्ग

महापालिकेला रामसेतूला पर्यायी पूल उभारायचा असेल, तर त्याला एकही पिलर नको, पूरपाण्याला अडथळा नको म्हणून तो पूल सबमर्सिबल असला पाहिजे. तो पूर्णपणे पादचारी असला पाहिजे व त्याच्यावरून चढणे-उतरणे वृद्ध, दिव्यांग यांना शक्य झाले पाहिजे, याबाबींचा विचार होणे महत्वाचे आहे.

- देवांग जानी, अध्यक्ष, गोदाप्रेमी संस्था, पंचवटी

Tendernama
www.tendernama.com