

नाशिक (Nashik): नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याची कामे सुरू करण्यासाठी प्रशासनाने वेग घेतला असून अनेक कामांच्या टेंडर प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहेत. त्यातच टेंडर प्रक्रिया पूर्ण होऊन कार्यारंभ आदेश दिलेल्या सहा हजार कोटींच्या कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते १३ नोव्हेंबरला होत आहे.
या पार्श्वभूमिवर नाशिक महापालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री यांनी केवळ १५०० कोटींच्या कामांचे टेंडर स्पर्धात्मक पद्धतीने राबवले गेल्याने २२५ कोटींची बचत झाली आहे, असा दावा केला आहे. या कामांच्या टेंडरमध्ये सहभागी झालेल्या कंत्राटदारांनी सहा ते ३० टक्के दराने काम करण्याची तयारी दर्शवल्याने ही बचत झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्याहस्ते भूमीपूजन होणाऱ्या कामांची माहिती देताना मनीषा खत्री यांनी नाशिक महापालिकेच्या सिंहस्थ कामांना कोणताही विलंब झालेला नाही, एवढेच नाही, तर महापालिकेने प्रस्तावित केलेली कामे सिंहस्थ सुरू होण्याच्या आधी सहा महिने म्हणजे जानेवारी २०२७ पर्यंत पूर्ण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
यापूर्वीच्या म्हणजे २०१५ च्या सिंहस्थ कामांच्या तुलनेत यावेळच्या सिंहस्थांची कामे लवकर सुरू झालेली आहेत, असाही दावा त्यांनी केला आहे. नाशिक शहरात सिंहस्थाच्या निमित्ताने ९६० कोटींच्या रस्त्यांच्या कामांचे टेंडर नुकतेच उघडण्यात आले आहे. या टेंडरमध्ये सर्वात कमी बोली १५ ते २० टक्के कमी दराने आहे. यामुळे निव्वळ रस्त्यांच्या ९६० कोटींच्या कामांमध्ये नाशिक महापालिकेची १६० कोटींची बचत होणार आहे.
याशिवाय नाशिक महापालिकेने ३९७ कोटींच्या मुकणे धरण विस्तारित पाणीपुरवठा योजनेचे टेंडर राबवले आहे. या टेंडरची सर्वात कमी दराची बोली ६ टक्के कमी दराची आहे. यामुळे मुकणे धरणातून विस्तारित पाणी पुरवठा योजनेतून नाशिक महापालिकेची २५ कोटींची बचत होत आहे.
महापालिकेने शहरात ३०० किलोमीटर लांबीच्या ऑप्टिकल फायबर केबल टाकण्याचा ठेका दिलेला आहे. या टेंडरसाठीही ३० टक्के कमी दराने बोली लावण्यात आल्याने नाशिक महापालिकेची जवळपास ४० कोटींची बचत झालेली आहे. या केवळ १५०० कोटींच्या कामांमधून महापालिकेची २२५ कोटींची बचत झालेली आहे.
नाशिक महापालिकेची निवडणूक जानेवारी २०२६ मध्ये होत असून त्यानंतर लोकप्रतिनिधींच्या राजवटीतील विकासकामांसाठी या बचत निधीतून तरतूद केली जाईल, अशी ग्वाही महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी दिली आहे.
सिंहस्थातील कामांच्या टेंडर प्रक्रियेत स्थानिक तसेच देशपातळीवरील मक्तेदारांनी सहभाग घेतल्याने स्पर्धा झाली. यातूनच महापालिकेची बचत झाल्याचा दावा त्यांनी केला. नाशिक महापालिका क्षेत्रात दर्जेदार व गुणवत्तापूर्ण रस्ते कामे होणार असून हे रस्ते १५ ते २० वर्षे टिकतील, असा त्यांनी दावा केला आहे.
दीड महिन्यांत टेंडर प्रक्रिया
नाशिक महापालिकेने सिंहस्थातील कामांसाठी राबवलेल्या टेंडर प्रक्रियेला उशीर झाला असल्याची टीका मनीषा खत्री यांनी फेटाळून लावली आहे. एवढेन नाही, तर २०२५ च्या सिंहस्थाच्या तुलनेत यावेळची सिंहस्थातील विकासकामे लवकर सुरू होणार आहेत, असा दावा त्यांनी केला. सिंहस्थ कामांना वेग आला असून, अवघ्या दीड महिन्यांत टेडर प्रक्रिया पूर्ण करणारी नाशिक महापालिका देशात एकमेव असेल, असा दावा देखील त्यांनी केला आहे