

नाशिक (Nashik): नाशिक शहरातील रस्त्यांची दिवसेंदिवस खालावत चाललेली अवस्था आणि पहिल्याच पावसामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीबाबत नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तांना पत्र पाठवून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. शहरातील प्रमुख मार्ग खोदल्यामुळे नाशिकची अवस्था नांगरलेल्या शेतासारखी झाली आहे. तसेच अंतर्गत रस्ते खड्यांत हरवल्यामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होत असून अपघातांचे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त करत खासदार वाजे यांनी प्रशासनाला कठोर शब्दांत इशारा दिला आहे. तसेच नियोजनाचा अभाव, मंजुरीला झालेला उशीर आणि ठेकेदारांवर नसलेला वचक यामुळे शहरातील रस्त्चांची दुरवस्था झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
नाशिक शहरात मंगळवारी मॉन्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्त्यांची वास्तविक अवस्था समोर येऊ लागली आहे. अनेक भागांमध्ये रस्त्यांवरील डांबरीकरण उखडले असून मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. विशेषतः नव वसाहतींच्या भागांमध्ये तसेच वाढत्या लोकवस्तीच्या परिसरांमध्ये रस्त्यांची अवस्था अधिकच बिकट झाली आहे.
या पार्श्वभूमीवर खासदार वाजे यांनी महापालिका आयु्क्तांना दिलेल्या पत्रात शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था ही केवळ पायाभूत सुविधांच्या कमतरतेचे लक्षण नसून नागरिकांच्या सुरक्षिततेशी थेट संबंधित बाब असल्याचेही लक्षात आणून दिले आहे. पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे दुचाकींचे अपघात वाढण्याचा धोका निर्माण झाल्याचेही त्यांनी लक्षात आणून दिले आहे.
नाशिक शहरातील विविध भागांत रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहतुकीचा वेग मंदावला असून अनेक ठिकाणी दररोज वाहतूक कोंडी होत आहे. कार्यालयीन वेळा, शाळा-महाविद्यालये आणि बाजारपेठांच्या परिसरात नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान होत असून नागरिकांच्या आर्थिक भारातही वाढ होत असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
विशेषतः अंबड, सातपूर, इंदिरानगर, सिडको, पंचवटी, मखमलाबाद, गंगापूर रोड, नाशिक रोड तसेच शहरालगतच्या नव्या विकसित होणाऱ्या भागांमध्ये रस्त्यांची अवस्था चिंताजनक बनल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत.चत असल्याने डासांची उत्पत्ती वाढून आरोग्याच्या समस्याही निर्माण होण्याची शक्यता आहे.
निकृष्ट कामांवरही प्रश्नचिन्ह
खासदार वाजे यांनी रस्त्यांच्या निकृष्ट दर्जाच्या कामांबाबतही चिंता व्यक्त केली आहे. काही ठिकाणी नुकतेच करण्यात आलेले रस्ते पहिल्याच पावसात उखडल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. त्यामुळे संबंधित कामांची गुणवत्ता, देखरेख आणि जबाबदारी निश्चित करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. रस्ते तयार झाल्यानंतर अल्पावधीतच त्यांची दुरवस्था होत असेल, तर संबंधित यंत्रणा आणि ठेकेदारांची जबाबदारी निश्चित केली पाहिजे, असेही खासदार वाजे यांनी म्हटले आहे.
सिंहस्थाच्या नावाने पळवाट
प्रशासनाला रस्ते खोदण्याबाबत आणि रस्त्यांच्या अवस्थेबाबत प्रश्न विचारल्यानंतर प्रशासन सातत्याने सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामामुळे हा त्रास सहन करावा लागेल, अशी सबब दिली जाते. मात्र, नियोजनाचा अभाव, मंजुरी आणि निधीला झालेला उशीर आणि ठेकेदारांवर नसलेला वचक हे मूळ कारण असल्याचं खासदार राजाभाऊ वाजे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
महापालिकेकडे प्रमुख मागण्या
- शहरातील सर्व खड्डेमय रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून वाहतूक सुरळीत करावी.
- निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या संबंधित ठेकेदारांवर कठोर कारवाई करावी.
- मुख्य व अंतर्गत रस्त्यांच्या डागडुजीसाठी विशेष कृती आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करावी.