

नाशिक (Nashik): पावसाळा तोंडावर आल्याने शहरातील विविध सुविधा कामांसाठी खोदलेले आलेले रस्ते पूर्ववत करण्याच्या कामाला नाशिक महापालिकेने वेग दिला आहे. महापालिका आयुक्त मनीषा खत्री या प्रत्येक कामाच्या ठिकाणी पाहणी करून संबंधित अधिका-यांना सूचना देत आहेत. यामुळे ही कामे युद्धपातळीवर सुरू आहेत.
पावसाळा सुरू होण्यापूर्वीच ही कामे पूर्ण करून पाणी साचणे, खड्डे निर्माण होणे आणि वाहतुकीतील अडथळे टाळण्याचा महापालिकेचा प्रयत्न असला, तरी शहरातील कामांची सध्याची परिस्थिती बघता, हे खड्डे पूर्ववत करून तेथे पक्के काम करण्याचे मोठे आव्हान नाशिक महापालिका प्रशासनासमोर आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिक महापालिका हद्दीत २८ प्रमुख रस्त्यांची कामे सुरू केली आहेत. त्यात रस्त्यांचे रुंदीकरण, कॉंक्रिटीकरण या कामांचा समावेश आहे. मात्र, ही कामे सुरू करण्यापूर्वी महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने पाणीपुरवठा, ड्रेनेज, ऑप्टिकल फायबर केबल, पीएनजी वाहिनी, पावसाळी गटारी आणि वीज केबलची कामे पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे.
एकदा रस्त्यांची कामे झाल्यांनतर या डक्टसाठी पुन्हा रस्ते खोदण्याची गरज पडू नये, हा यामागील हेतू आहे. मात्र, या डक्टच्या कामांनी उशीर झाल्यामुळे बहुतांश रस्त्यांच्या कामांनाही गती मिळू शकत नाही व सर्व प्रमुख रस्ते खोदून ठेवल्याचे चित्र शहरभर निर्माण झाले आहे.
आता पावसाळा तोंडावर आल्याने या खोदलेल्या रस्त्यांत पाणी साचून नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी खोदण्यात आलेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीला गती देण्याच्या सूचना महापालिकेत्या बांधकाम विभागाने ठेकेदारांनी दिल्या आहेत. महापालिका अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सिंहस्थ कुंभमेळा पायाभूत सुविधा प्रकल्पांतर्गत विकसित होत असलेल्या २८ प्रमुख रस्त्यांपैकी काही रस्त्यांवर कंत्राटदारांनी दुरुस्तीचे काम सुरू केले आहे.
महापिला आयुक्त मनीषा खत्री यांनी अधिकाऱ्यांना खोदलेले सर्व रस्ते समतल करण्यास, तातडीने खड्डे बुजवण्यास आणि रस्त्यांच्या कडेला साचलेला मातीचा व इतर अवशेषांचा ढिगारा हटवण्यास प्राधान्य देण्याचे निर्देश दिले आहेत. वाहनचालक आणि पादचारी यांना सुरक्षितपणे प्रवास करण्यातील सर्व अडथळे दूर करण्याच्याही सूचना दिल्या आहेत.
महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी स्वतः सिंहस्थ कुंभमेळ्याशी संबंधित सर्व रस्ते व प्रकल्पांची प्रगती तपासण्यासाठी पाहणी दौरे करत आहेत. कामे नियोजित वेळेत पूर्ण होत आहेत का, याची खात्री करत आहेत. तसेच पावसाळा सुरू होण्यापूर्वी सर्व विभागांना दुरुस्तीची कामे पूर्ण करण्याच्या सूचना देत आहेत. पुढील दहा दिवसांत खोदलेले रस्ते पूर्ववत करण्याचे आणि रस्त्यांची दुरुस्ती पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.
जानेवारी महिन्यात १८ प्रमुख रस्त्यांवर आणि फेब्रुवारीमध्ये उर्वरित १० रस्त्यांवर युटिलिटी डक्टची कामे हाती घेण्यात आली होती. या डक्टमध्ये पाणीपुरवठा वाहिन्या, ड्रेनेज लाईन्स, पीएनजी, ऑप्टिकल फायबर केबल, महावितरण केबल्स, पावसाच्या पाण्याचा निचरा व्यवस्था आदी कामांचा समावेश आहे. पुढील १० ते १५ वर्षांत वेगवेगळ्या सेवांसाठी पुन्हा पुन्हा रस्ते खोदावे लागू नयेत, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
बहुतांश युटिलिटी डक्टची कामे पूर्ण झाली असून आता खोदलेला भाग पूर्ववत करण्याचे काम प्राधान्याने सुरू आहे. तसेच सिंहस्थ कुंभमेळ्याशी संबंधित आणखी पाच ते सहा रस्त्यांवरही काम सुरू असून ते लवकरच पूर्ण होण्याची अपेक्षा आहे, अशी उत्तरे प्रशासनाकडून दिली जात असली तरी पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व मुख्य आणि अंतर्गत रस्ते वाहन चालविण्यास योग्य स्थितीत बनवण्याचे मोठे आव्हान आहे.
आधीच खोदलेल्या रस्त्यांमुळे वाहन चालकांची मोठी कसरत होत आहे. त्यात प्रशासनाने शहरव्यापी खड्डे दुरुस्ती मोहीम आणि रस्ते समतलीकरणाचे काम पावसाळ्यापूर्वी केले, तरी पावसाने त्या खडीमुरमाने बुजवलेल्या रस्त्यांवर पुन्हा खड्डे पडणार आहेत. त्यावेळी प्रशासनाचा खरा कस लागणार आहे. यामुळे या पावसाळ्यात वाहनचालक व महापालिका प्रशासन या दोघांचीही कसोटी लागणार आहे.