
नाशिक (Nashik) : पंचवटीतील छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील महामार्गावरील हॉटेल मिर्ची चौकात झालेल्या बस दुर्घटनेनंतर अपघाताचे कारण तपासण्यासाठी नेमलेल्या समितीने शहरातील सर्व ब्लॅकस्पॉट अर्थात अपघात प्रवण क्षेत्रांचा शोध घेऊन त्यावर उपाययोजना करण्याचा अहवाल दिला होता. त्यानंतर आठ महिन्यांनी जागे झालेल्या महापालिकेने नाशिक शहरातील अपघाताच्या सर्व २६ ब्लॅकस्पॉटच्या मुक्तीसाठी अडीच कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी सादर केला आहे. पावसाळा तोंडावर आल्यानंतर हा प्रस्ताव मान्यतेसाठी आल्याने ही कामे पावसाळ्यानंतरच पूर्ण होतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
पंचवटीतील छत्रपती संभाजी महाराज महामार्गावरील हॉटेल मिर्चीलगतच्या चौकात ८ ऑक्टोबर २०२२ रोजी बस दुर्घटना होऊन त्यात १२ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपघाताचे कारण शोधण्यासाठी समिती नेमण्याची घोषणा केली होती. या ठिकाणी गतिरोधकाची मागणी असताना दुर्लक्ष केल्याचा फटका बसल्याचे समोर आले होते. संदर्भात सर्व स्तरातून टीका झाल्यानंतर रेझिलिएंट इंडिया कंपनीने ४५ दिवस सर्वेक्षण करत महापालिकेला अहवाल सादर केला होता. या कंपनीने शहरातील सर्वच रस्त्यांवर ब्लॅकस्पॉट अर्थात अपघात प्रवण क्षेत्रांचे सर्वेक्षण केल्यानंतर त्यांना २६ ब्लॅक स्पॉट आढळून आले होते.
या २६ ब्लॅकस्पॉटच्या ठिकाणी गेल्या तीन वर्षांतील अपघातांचे प्रमाण, त्यामागील कारणे, रस्त्यावरून धावणाऱ्या वाहनांची संख्या, स्थानिक व बाह्य वाहतूक, वाहतूक कोंडीची कारणे व त्यावरील उपाययोजना याबाबत अहवाल देण्यात आला होता. त्या अहवालात सुचवलेल्या उपाययोजना करण्याचा निर्णय महापालिकेच्या बांधकाम विभागाने घेतला आहे. अहवाल व यासंदर्भात उपाययोजना दिल्यानंतर त्यानुसार कामे करण्यासाठी टेंडर प्रक्रिया राबवण्यात आली आहे. याबाबत अडीच कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावाला मंजुरी घेऊन संबंधित ठेकेदारांना तातडीने कार्यारंभ आदेश दिले जातील, अशी माहिती शहर अभियंता वंजारी यांनी दिली.
२३ ठिकाणी सिग्नल
शहरात महापालिकेने निश्चित केलेल्या २६ पैकी २३ ब्लॅकस्पॉटवरील अपघात कमी करण्यासाठी सिग्नल बसवले जाणार आहेत. याबरोबरच अपघात टाळण्यासाठी गतिरोधक टाकणे, झेब्रा क्रॉसिंग, स्पीड टेबल, थर्मोप्लास्टिक पेंटने पट्टे मारणे, कॅट आय बसविणे, रोड मार्कर, हॅजार्ड मार्कर, सूचना फलक, नो पार्किंग फलक अशी कामे केली जाणार आहेत.