
नाशिक (Nashik) : नाशिक महापालिकेच्या (NMC) घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून शहरातील कचरा गोळा करण्यासाठी वापरल्या घंटागाड्यांबाबत तक्रारी वाढल्याने विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी घंटागाडीच्या अनियमिततेची चौकशी आठ दिवसांत करण्याचे आदेश देण्याला जवळपास दीड महिने झाले. तसेच दुसरे स्मरणपत्र देण्यास महिना झाला तरी अद्यापही या चौकशीला मुहूर्त लागत नसल्याचे दिसत आहे. ही चौकशी करण्यास आणखी दोन आठवडे लागणारअसल्याचे महापालिकेकडून सांगितले जात आहे.
विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे महापालिकेचा तात्पुरता प्रभार असताना त्यांनी घंटागाडीच्या कामकाजाविषयी चौकशी आदेश दिले होते. प्रारंभी घंटागाडीची चौकशी आठ दिवसात करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, अधिकारी रजेवर असल्याचे कारण देत व संबंधित अधिकारी सहकार्य करीत नसल्याचे कारण सांगत या1 चौकशीला सुरुवातही झाली नाही. यामुळे विभागीय आयुक्तांनी पुन्हा आदेश दिले. त्यानंतर ८जूनपासून चौकशी झाल्याचे सांगण्यात आले. चौकशी समितीने प्रत्यक्ष भेटी देऊन घंटागाडीची माहिती घेतली जात आहे. त्यांची अवस्था, मेन्टेनेस याबाबी तपासल्या जात आहेत, अशी माहिती महापालिकेकडून देण्यात आली. घंटागाडी ठेकेदारांकडून कशा पध्दतीने काम केले जाते, यातून तपासले जात आहे.
तसेच घंटागाडी प्रत्यक्षात कचरा संकलनासाठी किती जात आहे. गाड्यांची स्थिती, मोठया-छोटी वाहने आदीची माहिती घेण्यात आलीय, असे सांगितले जात असताना जूनच्या शेवटच्या आठवड्यातही चौकशी अहवाल आला नाही.याबाबत महापालिकेच्या प्रभारी आयुक्तांनी चौकशी होणार आहे, पण आता पावसाळापूर्व कामांना प्राधान्य दिले जात आहे, असे सांगितले. यामुळे घंटागाडी चौकशी बाबत संशय निर्माण झाला. या चौकशी समितीत यांत्रिकी विभागाचे अधीक्षक अभियंता उदय धर्माधिकारी, वित्त व लेखा अधिकारी नरेंद्र महाजन, कार्यकारी अभियंता बाजीराव माळी, तसेच घनकचरा संचालक डॉ. कल्पना कुटे या अधिकार्यांचा समावेश आहे. चौकशी समितीने आठ दिवसांत अहवाल देण्याचे आदेश असून प्रत्यक्ष चौकशी सुरू झाली, असे जाहीर होऊनही महिना उलटला आहे. विभागीय आयुक्तांचे आदेश असूनही महापालिकेचे अधिकारी चौकशीबाबत घेत असलेली भूमिका बघता, घंटागाडीचे ठेकेदार।किती प्रभावी आहेत, याचा अंदाज येत आहे.
ठेका प्रारंभीपासून वादात
शहरातील कचरा संकनासाठीचा पूर्वीचा ठेका १५० कोटींचा असताना नवीन ठेका थेट ३५४ कोटीवर गेल्यापासून हा ठेका वादग्रस्त ठरला आहे. शहरात घरोघरी जाऊन कचरा संकलन ठेक्याच्या रकमेत दुपटीने वाढ केल्यानंतरही घंटागाडीच्या सेवेच्या तक्रारी कायम आहेत. डिसेंबर २०२२ पासून शहरात ३९६ घंटागाड्या सुरू झाल्या असून, काही ठेकेदारांकडून लहान घंटागाड्यांचा वापर केला जात आहे. घंटागाडी अनियमिततेच्या अनेक तक्रारी आहेत. मात्र, घनकचरा व्यवस्थापन विभाग त्यास दाद देत नसल्याच्या तक्रारी विभागीय आयुक्त गमेंकडे करण्यात आल्या आहेत. त्याची गंभीर दखल घेत गमे यांनी घंटागाडीच्या अनियमिततेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.