Nashik : प्रशासक राजवटीत अजब कारभार; बकाल झालेल्या उद्यानांच्या देखभालीसाठी दोन कोटी

Nashik Municipal Corporation
Nashik Municipal CorporationTendernama

नाशिक (Nashik) : आधीच्या टेंडरची मुदत संपण्याआधीच नवीन टेंडर वेळेत राबवायचे नाही. मुदत संपल्यानंतर पूर्वीच्या ठेकेदाराला मुदतवाढ द्यायची व विना टेंडर कामांची देयके काढायची, या नाशिक महापालिकेतील पायंड्यानुसार शहरातील २५० उद्याने व ५० जॉगिंग ट्रॅकच्या देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली दोन कोटी रुपयांच्या देयकाला स्थायी समितीवर मान्यता देण्यात आली आहे. मुळात पावसाळ्यात सर्व उद्याने बंद असताना व शहरातील जवळपास सर्वच उदयाने बकाल अवस्थेत असताना ही देयके कोणत्या कामासाठी काढली, असा प्रश्न या निमित्ताने समोर आला आहे.

Nashik Municipal Corporation
Mumbai : 'त्या' प्रसिद्ध जेट्टीचा लवकरच कायापालट! 88 कोटींतून राज्य सरकारचा 'असा' आहे प्लॅन

नाशिक महापालिका हद्दीमध्ये जवळपास ५२४ उद्याने आहेत. यातील केवळ पंधरा ते २० उद्याने मोठी असून इतर उद्याने म्हणजे भूखंड विकसित करताना विकासकाने मनोरंजन पार्क म्हणून सोडलेल्या मोकळ्या जागा महापालिकेने उद्याने म्हणून विकसित केलेल्या आहेत. या विकसित केलेल्या उद्यानांमध्ये नगरसेवकांनी त्यांच्या निधीतून काही खेळणी अथवा ग्रीनजीमसाठी साहित्य बसवले असले, तरी बहुतांश उद्यानांमधील खेळणी तुटली असून ग्रीनजिमचे साहित्य लंपास झालेले आहे. पावसाळ्यात वाढलेले गवत, पाणी नसल्याने सुकलेली झाडे यामुळे या उद्यानांना बकाल अवस्था प्राप्त झाली आहे. यामुळे उद्यानांबाबत स्थानिक नागरिकांच्या तक्रारी असून तिकडे दुर्लक्ष केले जात असताना स्थायी समितीवर या उद्यानांच्या देखभाल व दुरुस्तीची देयके काढल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

Nashik Municipal Corporation
Nashik : झिरवळ यांनी का बोलावली मंगळवारी मंत्रालयात बैठक? काय आहे तक्रार?

महापालिकेच्या उद्यान विभागाकडे या उद्यानांच्या देखभालीची जबाबदार आहे. उद्यानांच्या देखभालीसाठीच्या ठेकेदाराची मुदत मार्च २०२३ मध्ये संपली. मुदत संपण्याआधीच टेंडर न राबवल्याने जवळपास २७३ उद्यानांचे देखभाल व दुरुस्तीच्या कामाला मुदतवाढ देण्यात आली. ही मुदतवाढही संपुष्टात येत असल्याने जुन्या ठेकेदाराने देखभाल दुरुस्तीची कामे झालेल्या उद्यानांची देयके काढण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर ठेवला व त्याला मंजुरीही घेतली. शहरातील अडीचशे उद्याने आणि ५० जॉगिंग ट्रॅकची ठेकेदारांनी मागील सहा महिन्यांत देखभाल व दुरुस्ती केल्याचा दावा केला असून ती देयके देण्याच्या खर्चाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.

Nashik Municipal Corporation
Nashik : पाणीपट्टीची दरवाढ 1 डिसेंबर नाही, तर 1 एप्रिलपासून लागू होणार

यापूर्वीही झाली होती कारवाई

महापालिकेने चार वर्षापूर्वी ३४१ उद्याने ठेकेदारांकडे देखभाल-दुरुस्तीसाठी सोपवली होती. उपायुक्त विजयकुमार मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर उद्यानांची अचानक तपासणी केली. तसेच उद्यानांच्या देखभालीचा अहवाल मागवली असता त्यांनाउद्यानांची देखभाल कागदोपत्री असल्याचे आढळले होते. त्यानंतर त्यांनी  ३५ ठेकेदारांसह १७ कर्मचाऱ्यांना  नोटिसा बजावल्या होत्या. यामुळे शहरातील उद्यानांची देखभाल दुरुस्ती आउटसोर्सिंगने करण्यास पायबंद बसेल, असे मानले जात असतानाच मागील फेब्रुवारीमध्ये महापालिकेने पुन्हा २७३ उद्यानांच्या देखभालीसाठी तीन वर्षांचे २५ कोटींचे टेंडर प्रसिद्ध केले होते. मात्र, मार्चपर्यंत टेंडरची प्रक्रिया पूर्ण न झाल्याने जुन्याच टेंडरला मुदतवाढ दिली. आता राजकीय पक्षांचे कार्यकर्ते असलेल्या ठेकेदारांची दोन कोटींची देयके मंजूर करण्यात आली आहे.

देयके काढलेली विभागनिहाय उद्याने
पंचवटी : ७२
सातपूर : २८
नाशिक रोड : ३९
पश्चिम : ४१
पूर्व  :१४
सिडको : ५६
जॉगिंग ट्रॅक : ५०

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com