Nashik ZP: सिंहस्थाची कामे जिल्हा परिषदेकडून नकोत; कोणी केली मागणी?

नाशिक जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
Nashik ZPTendernama
Published on

नाशिक (Nashik): जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील सिंहस्थ कुंभमेळ्याशी संबंधित काही कामे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून करण्याचे नियोजन आहे. यासाठी नुकतेच ७२ कोटींच्या आराखड्यास कुंभमेळा प्राधिकरणकडून मान्यताही देण्यात आली असताना सिंहस्थाशी संबंधित कामे जिल्हा परिषदेकडून करू नयेत, असे कावनई कपीलधारा तीर्थचे महंत गुरूचरणदास महाराज यांनी कुंभमेळा आयुक्त, कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांना निवेदन दिले आहे.

नाशिक जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
Kumbh Mela 2027 Nashik: सिंहस्थासाठी नाशिकमध्ये 3 हजार कोटींच्या 16 प्रकल्पांना केंद्राचा ग्रीन सिग्नल

राज्याच्या पर्यटन विभागाकडून कावनई येथे २०२४ मध्ये विविध विकासकामांसाठी ३.५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असताना जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने त्यातील ५० टक्के कामे अद्याप सुरूच केलेली नाहीत. पर्यटन विभागाची ३.८० कोटींची कामे दोन वर्षांत न करू शकलेली जिल्हा परिषद यंत्रणा ७२ कोटींची कामे वर्षभरात कशी करणार, असा प्रश्न महतांनी उपस्थित केला आहे.

नाशिके व त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होत असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने पायाभूत सुविधा उभारण्याची हजारो कोटींची कामे सध्या नाशिक व त्र्यंबकेश्वर परिसरात सुरू आहेत. ही कामे प्रामुख्याने नाशिक महापालिका, त्र्यंबकेश्वर नगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ यांच्यामार्फत सुरू आहेत. त्यातील काही कामे सर्वतीर्थ टाकेद, कावनई व बेझे या जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातील असल्याने कुंभमेळा प्राधिकरणने ती जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून करण्याचा निर्णय घेतला आहे.

या ३५ कोटींच्या कामांना ऑक्टोबर २०२५ मध्ये राज्याच्या ग्रामविकास विभागाने मंजुरी दिलेली आहे. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने त्यातील रस्त्यांच्या कामांची टेंडर प्रक्रिया राबवून त्याचे कार्यारंभ आदेश दिले आहेत.

नाशिक जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
Uday Samant: यवतमाळ नगरपरिषदेच्या 'त्या' टेंडर प्रक्रियेची चौकशी करणार

दरम्यान कुंभमेळा प्राधिकरणने सर्वतीर्थ टाकेद, कावनई व बेझे येथील चक्रतीर्थ परिसरासाठी स्वतंत्र आराखडा तयार करण्याचा निर्णय घेतला व दिल्ली येथील एका संस्थेवर आराखडा तयार करण्याचे काम सोपवले. यामुळे ग्रामविकास विभागाने या तीनही ठिकाणी मंजूर केलेल्या कामांची कार्यवाही तोपर्यंत थांबवण्याचा निर्णय घेतला.

मागील महिन्यात टाकेद, कावनई व चक्रतीर्थ येथील विकास कामांचा आराखडा तयार झाल्यानंतर या आठवड्यात कुंभमेळा प्राधिकरणने या तिन्ही ठिकाणी करण्यात येणा-या कामांच्या ७२ कोटींच्या विकास आराखड्यास मान्यता दिली. तसेच या कामांची कार्यान्वयन यंत्रणा जिल्हा परिषद असल्याचेही स्पष्ट केले.

दरम्यान नवीन आराखड्यातील कामे जिल्हा परिषदेकडून करण्यात येणार असल्याचे समजताच कावनई येथील कपीलधारा तीर्थचे महंत गुरूचरणदास महाराज यांनी २५ फेब्रुवारी रोजी कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांची भेट घेऊन कावनई येथील सिंहस्थाशी संबंधित कामांची अंमलबजावणी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून करू नये, असे निवेदन दिले.

नाशिक जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
नाशिकमध्ये ABBची 184 कोटींची गुंतवणूक; सातपूर MIDCमध्ये...

त्यानंतरही कुंभमेळा प्राधिकरणच्या बैठकीत ही कामे जिल्हा परिषेकडून करण्यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर महंत गुरूचरणदास महाराज यांनी मुंबईत कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांच्या कार्यालयात जाऊन हीच मागणी करणारे निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी २०२४ मध्ये कावनई परिसर विकासासाठी पर्यटन विभागाने ३ कोटी ८० लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. त्यातील निम्मी कामे दोन वर्षांनंतरही सुरू झालेली नाही. तसेच उरलेली कामे अपूर्ण आहे.

याबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता कार्यकारी अभियंता उडवाउडवीची उत्तरे देतात. मागील दोन वर्षात ३.८० कोटींची कामे पूर्ण न करू शकलेले जिल्हा परिषद यंत्रणा आता वर्षभरात ७२ कोटींची कामे कशी करणार, असा प्रश्न उपस्थित करीत महंतांनी सिंहस्थ कुंभमेळ्याशी संबंधित कामे जिल्हा परिषदेकडून करू नयेत, असे म्हटले आहे.

कावनई येथील महंतांच्या आरोपाविषयी कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे यांनी सांगितले की, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने नवीन आराखडा तयार करण्यात येणार असल्याने आधी मंजूर केलेली कामे थांबवली होती. ती कामे आधीच सुरू केली असती, तर द्विरुक्ती होण्याची शक्यता होती. तसेच पर्यटन विभागाकडून २०२४ मध्ये मंजूर झालेल्या कामांपैकी काही कामे सुरू असून उर्वरित कामे लवकरच सुरू होतील.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com