

नाशिक (Nashik) : नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन, तसेच अंमलबजावणीचा कालावधी संपेपर्यंत नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण नाशिक अंतर्गत ५२ नियमित पदे निर्माण करणे व २४ मनुष्यबळ सेवा बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यास म्हणजे ७६ पदांना शासनाने मान्यता दिली आहे.
नाशिक जिल्हा परिषदेचे प्रशासकीय कामकाज आता नवीन इमारतीतून सुरू झाल्यामुळे कुंभमेळा प्राधिकरणाला जुन्या इमारतीत पुरेसी जागा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे आता या पदभरतीला वेग येणार आहे. कुंभमेळा प्राधिकरणचे आयुक्त शेखर सिंह यांनी यापूर्वीच २० जणांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत.
सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणसाठी सरकारने आकृतीबंध निश्चित केला असून, त्यात आयुक्त कक्ष, सर्वसाधारण नियंत्रण, धार्मिक बाबी, गर्दी नियंत्रण, कायदा सुव्यवस्था, निधी नियोजन व खर्च, गुणवत्ता नियंत्रण, सोशल मीडिया व जनसंपर्क या कक्षांसाठी पदे व त्यांची संख्या निश्चित केली आहे.
प्राधिकरणसाठी शासनाने मंजूर केलेली पदे प्रतीनियुक्तीने, निवृत्त अधिकारी, कर्मचाऱ्यांमधून किंवा इतर मार्गाने आणि कंत्राटी पदे थेट जाहिरातीद्वारे अधवा मनुष्यबळ पुरवठा करणाऱ्या यंत्रणेमार्फत नियुक्त करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे.
कुंभमेळा प्राधिकरण कार्यालयात कुंभमेळा आयुक्त (१), लघुलेखक (४), लिपिक (४), अप्पर जिल्हाधिकारी, नगरविकासचे सहआयुक्त (२), मुख्याधिकारी, तहसीलदार(४), मुख्याधिकारी गट ब (१), महसूल सहायक (४), अप्पर पोलिस अधीक्षक किवा पोलिस उपआयुक्त (१), पोलिस निरीक्षक (२), वरिष्ठ लिपिक (२), जिल्हा नियोजन अधिकारी (१), मुख्य लेखा व वित्त अधिकारी(१), वरिष्ठ लेखाधिकारी(१), उपलेखापाल (२), वरिष्ठ लिपिक(३),
अधीक्षक अभियंता (१), कार्यकारी अभियंता (२), उपअभियंता (२), संशोधन अधिकारी (१), लिपिक (३), जिल्हा माहिती अधिकारी (१) ही पदे निर्माण करण्यात आली असून कुंभमेळा आयुक्त यांच्या कार्यालयात सध्या जवळपास १५ पदे भरली असून उर्वरित पदांसाठी आतापर्यंत २० मुलाखती प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी घेतल्या आहेत. सध्या अतिरिक्त जिल्हाधिकारी, अतिरिक्त सीईओ, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या मुलाखती झाल्या आहेत.
सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणला जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीत जागा देण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन होईपर्यंत प्राधिकरणला एका भागात जागा देण्यात आली होती. जिल्हा परिषदेचे बहुतांश विभाग आता नवीन इमारतीत स्थलांतरित झाले आहेत.
यामुळे प्राधिकरण प्रशासनाला पुरेशी जागा उपलब्ध झाल्याने आता आयुक्त कक्ष, सर्वसाधारण नियंत्रण, धार्मिक बाबी, गर्दी नियंत्रण, कायदा सुव्यवस्था, निधी नियोजन व खर्च, गुणवत्ता नियंत्रण, सोशल मीडिया व जनसंपर्क या कक्षांसाठी पदभरती प्रक्रियेला वेग येणार आहे.
याशिवाय सोशल मीडिया व जनसंपर्कासाठी ८ पदे कंत्राटी पद्धतीने घेतली जाणार आहेत. तसेच सल्लागार, विषय तज्ज्ञ, शिपाई, वाहन चालक ही पदे कंत्राटी पद्धतीने भरली जाणार आहेत.