

नाशिक (Nashik): नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये सध्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खोदकाम सुरू आहेत. त्यात जलवाहिन्या, मलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहेत. त्याचप्रमाणे सिंहस्थ कुंभमेळ्यात गर्दी व्यवस्थापन, सुरक्षा यंत्रणा, आपत्कालीन प्रतिसाद आणि संप्रेषण प्रणाली यासाठी ऑप्टिकल फायबर टाकण्याचेही काम सुरू आहे.
कुंभमेळा प्राधिकरणने या ऑप्टिकल फायबरच्या १४७ कोटींच्या कामांना सप्टेंबर २०२५ मध्ये मान्यता दिलेली आहे. त्यानुसार नाशिक व त्र्यंबकेश्वरमध्ये ३८५ किलोमीटर ऑप्टिकल फायबरचे जाळे टाकले जाणार असून, त्यापैकी १७१ किलोमीटरची कामे आतापर्यंत पूर्ण झाली आहेत. यावर्षाच्या डिसेंबरपर्यंत ही कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणामार्फत ऑप्टिकल फायबर नेटवर्क हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. गर्दी व्यवस्थापन, सुरक्षा यंत्रणा, आपत्कालीन प्रतिसाद आणि संप्रेषण प्रणाली यासाठी हे ऑप्टिकल फायबर नेटवर्क महत्त्वाचे ठरणार आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमधील प्रमुख ठिकाणांना हे नेटवर्क जोडले जाणार असून, कुंभमेळ्यानंतरही शहराच्या दैनंदिन सेवांसाठी ते उपयुक्त राहणार आहे.
नाशिक महानगरपालिकेमार्फत या प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू आहे. ऑक्टोबर २०२५ मध्ये कामाचे आदेश देण्यात आले असून डिसेंबर २०२६ पर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत सुमारे १७१ किलोमीटर डक्टिंग पूर्ण झाले आहे.
प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर शहरातील हजारो सीसीटीव्ही कॅमेरे, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित गर्दी विश्लेषण प्रणाली, सार्वजनिक सूचना व आपत्कालीन संदेश यंत्रणा तसेच नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील एकात्मिक नियंत्रण कक्ष या सर्व प्रणाली या नेटवर्कवर कार्यरत राहतील.
रिंग, मेष आणि लिनीअर पद्धतीने नेटवर्क उभारण्यात येत असल्याने सेवा अखंडित राहणार आहे. या प्रकल्पासाठी उत्पन्न निर्मितीचीही तरतूद करण्यात आली आहे. उर्वरित डक्ट आणि फायबर क्षमता दूरसंचार कंपन्यांना भाड्याने देण्यात येणार असून, त्यातून महानगरपालिकेला स्थिर उत्पन्न मिळू शकणार आहे. या प्रकल्पावरील गुंतवणूक पाच ते सात वर्षांत वसूल होऊ शकते, असा अंदाज आहे.
सिंहस्थ २०२७ मध्ये कोट्यवधी भाविक मोबाईल कनेक्टिव्हिटी, डिजिटल पेमेंट्स आणि तात्काळ माहिती सेवांवर अवलंबून असतील. त्या सर्व सेवा अखंडितपणे सुरू राहाव्यात यासाठी हे नेटवर्क उभारले जात आहे. हे ऑप्टिकल फायबर नेटवर्क नाशिकसाठी दीर्घकालीन पायाभूत गुंतवणूक आहे.
- शेखर सिंह, आयुक्त, कुंभमेळा प्राधिकरण
ठळक मुद्दे...
नाशिक व त्र्यंबकेश्वरमध्ये ३८५ किमी फायबर नेटवर्क
ऑक्टोबर २०२५ मध्ये काम सुरू, डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्णत्वाचे उद्दिष्ट
१७१ किमी डक्टिंग पूर्ण
४,०११ सीसीटीव्ही कॅमेरे
एआय आधारित गर्दी व्यवस्थापन प्रणाली
सार्वजनिक सूचना व आपत्कालीन यंत्रणा
नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे नियंत्रण कक्ष
९६-कोर ऑप्टिकल फायबर नेटवर्क
रिंग, मेष आणि लिनीअर संरचना
वाहतूक, आपत्कालीन सेवा आणि नागरी व्यवस्थापनाला आधार
उर्वरित फायबर क्षमता भाड्याने देण्याची योजना