

नाशिक (Nashik): सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तोंडावर कामे सुरू करायची व कामे वेळेत पूर्ण करण्याच्या नावाखाली सुमार दर्जाची कामे करण्याची मोडस ऑपरेंडी या सिंहस्थातील कामांच्या बाबतीत सल्लागार संस्थेने हाणून पाडली आहे.
सध्या शहरात रस्त्यांची कामे सुरू करण्यापूर्वी ते रस्ते भविष्यात पुन्हा खोदण्याची गरज भासू नये, यासाठी गॅस पाइपलाइन, पाणीपुरवठा, मलनिस्सारण, भूयारी गटार तसेच ऑप्टिकल फायबर टाकण्यासाठी युटिलिटी डक्ट तयार केला जात आहे. मात्र, हे काम नियमानुसार होत नसून ती कामे गुणवत्तापूर्ण नसल्याचा ठपका त्या कामांवर देखरेख करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या सल्लागार संस्थेने ठेवला आहे.
त्याअनुषंगाने महापालिका आयुक्त, बांधकाम विभाग, पाणीपुरवठा, मलनिस्सारण विभागाला पत्र पाठविले असून सल्लागार संस्थेकडून ना हरकत दाखला घ्यावा त्यानंतरच देयके अदा करण्याचे निर्देश गुणवत्ता नियंत्रण विभागाने दिले आहेत.
नाशिक शहरात सिंहस्थ कुंभमेळ्याची जवळपास १० हजार कोटींची कामे सुरू आहेत. त्यात शहरातील १२२८ कोटींच्या निधीतील २८ रस्त्यांची कामे सुरू आहेत. हे रस्ते तयार करताना डांबराऐवजी व्हाईट टॅपिंग केले जाणार आहे. एकदा रस्ता तयार झाल्यानंतर त्यावर पुन्हा खोदाई करण्याची गरज पडू नये, यासाठी रस्ता काम करण्यापूर्वी प्रथम युटिलिटी डक्ट तयार केले जात आहेत. त्या डक्टच्या माध्यमातून स्वंयपाकाच्या गॅसची वाहिनी, भूयारी गटार, जलवाहिनी, ड्रेनेज लाईन, ऑप्टिकल फायबर सहजपणे टाकता येण्याची सुविधी केली जात आहे. या रस्त्यांची कामे ३१ मार्च २०२७ पूर्ण करण्याची मुदत आहे. यामुळे या युटिलिटी डक्टची कामे ३१ मार्च पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली आहे.
दरम्यान सिंहस्थ कुंभमेळ्यातील कामे गुणवत्तापूर्णरित्या पूर्ण व्हावीत, यासाठी कुंभमेळा प्राधिकरणाने गुणवत्ता तपासणीसाठी प्रकल्प सल्लागार संस्था (प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट) नियुक्त केल्या आहेत. या सल्लागार संस्थेने (प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंन्ट) युटिलिटी डक्टसाठी खोदलेचे चर बुजवताना मानक कार्यपद्धतीचा (स्टॅण्डर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर) अवलंब केला जात नसल्याची बाब निदर्शनास आणून दिली आहे. यामुळे महापालिकेच्या गुणवत्ता नियंत्रण विभागाने महापालिकेच्या बांधकाम विभाग, पाणी पुरवठा, मलनिस्सारण विभागाला पत्र पाठवून कामांच्या गुणवत्तेबाबत शंका उपस्थित केली आहे.
खोदकाम केलेली चारी बुजविताना खडीकरणाचे थर हे नियमानुसार केले जात नाही. त्यामुळे रस्ते कामांची गुणवत्ता ढासळून रस्ते खचण्याची शंका उपस्थित केली आहे. युटिलिटी डक्टचे काम पूर्ण होत असताना ठेकेदारांकडून परस्पर देयके सादर केले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुणवत्ता नियंत्रण विभागाने मानक कार्यपद्धतीनुसार कामे झाल्याचा दाखला दिल्याशिवाय देयके अदा करू नयेत, असे पत्रात स्पष्ट नमुद करण्यात आले आहे.
कुंभमेळा प्राधिकरणाने या कामांच्या दर्जावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक ॲप विकसित केले असून त्या ॲपवर प्रत्येक कामाच्या प्रत्येक टप्प्याचे छायाचित्र, व्हिडीओ अपलोड केले जात असून प्रत्येक कार्यान्वयीन यंत्रणेला त्या ॲपशी जोडले आहे. यामुळे संबंधित विभागाचे काम कसे सुरू आहे, याची माहिती कार्यालयातूनही बघता येणार आहे. याशिवाय दोन सल्लागार संस्थांची गुणवत्ता तपासणीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतरही सिंहस्थातील कामे दर्जाहिन होत असल्याचे यापूर्वीही समोर आले आहे.