
नाशिक (Nashik) : जलजीवन मिशनमधील (Jal Jeevan Mission) भ्रष्टाचारावर सरकार गंभीर असून, अशा प्रकरणांना खपवून घेतले जाणार नाही, असा कडक इशारा जलसंपदामंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी दिला आहे. ‘कागदोपत्री बिले सादर करून निधी लाटणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.
जलजीवन मिशन अजून पूर्णत्वास गेले नसले तरी योजना अपयशी ठरली असे म्हणता येणार नाही, असे महाजन म्हणाले. ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी योजना असून, प्रत्येक घरात नळाद्वारे शुद्ध पाणी पोहोचवण्याचा सरकारचा निर्धार आहे, असेही त्यांनी सांगितले.
नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी दीड ते दोन वर्षांचा कालावधी असून, कामे वेळेत पूर्ण होतील असा विश्वास महाजन यांनी व्यक्त केला. सिंहस्थासाठी आवश्यक असलेला निधी कुठेही कमी पडू दिला जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
जळगावमध्ये काही पाकिस्तानी नागरिक उपचारासाठी आल्याचे मान्य करताना, इतर सर्व पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असेही महाजन यांनी स्पष्ट केले. नाशिकमधील अलीकडील हिंसाचार प्रकरणावर बोलताना, ‘कोणाचीही दादागिरी किंवा गुंडगिरी सहन केली जाणार नाही,’ असा इशारा त्यांनी दिला.
केंद्र सरकारच्या जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाचे स्वागत करत, ‘हा निर्णय केवळ घोषणांपुरता न ठेवता प्रत्यक्षात उतरवला गेला आहे,’ असे ते म्हणाले.
राज्यात यंदा समाधानकारक पाणीसाठा असला तरीही पाण्याचा वापर जपून करावा, असे आवाहन महाजन यांनी केले. नाशिक शहरातील विस्कळित पाणीपुरवठ्यावर लक्ष देण्याचे आणि अधिकाऱ्यांना योग्य सूचना देण्याचे त्यांनी आश्वासन दिले. नाशिक मेट्रो प्रकल्पासंदर्भातील तांत्रिक बाबींची तपासणी सुरू असून लवकरच शहरात मेट्रो प्रकल्प सुरू होईल, असेही त्यांनी सांगितले.