
पुणे (Pune) : जुन्या पुणे-मुंबई महामार्ग रुंदीकरणाचे काम पावसाळा तोंडावर आलेला असतानाही अद्याप पूर्ण झालेले नाही. एक किलोमीटर अंतरामध्ये पदपथ, दुभाजक, सेवारस्त्यांची कामे अजूनही संथ गतीने सुरू आहेत. अनेकदा मुदतवाढ दिल्यानंतरही संबंधित कामासाठी महापालिका प्रशासनाकडून आणखी मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता आहे.
महापालिका प्रशासनानाकडून मागील दीड वर्षांपासून जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील अंडी उबवणी केंद्रासमोरील चौक ते बोपोडी चौक या तीन किलोमीटर रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम केले जात आहे. खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मालकीची जमीन, खडकी रेल्वे स्थानकासमोरील जयहिंद चित्रपटगृहाची जागा ताब्यात घेऊन बोपोडी चौक ते संविधान चौक दरम्यानच्या रस्त्याचे रुंदीकरण झाले आहे. मात्र संविधान चौक ते अंडी उबवणी केंद्र या दरम्यानच्या रस्त्याचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. संबंधित ठेकेदाराला मार्च अखेरपर्यंत काम पूर्ण करण्यास सांगण्यात आले होते. मात्र अद्यापही काम अपूर्णच आहे.
अशी आहे स्थिती
- अंडी उबवणी केंद्रासमोरील चौक ते संविधान चौक या एक किलोमीटरच्या अंतरामधील रस्त्याच्याकडेला सीमाभिंत बांधून झाली आहे
- पावसाळी वाहिन्या, सेवा वाहिन्यांचीही कामे झाली आहेत
- सांडपाणी वाहिन्या टाकण्याचे काम होणार आहे
- संविधान चौक ते टपाल कार्यालयापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पदपथ, सेवा रस्ता, पथदिवे, दुभाजकाची कामे अपूर्ण अवस्थेतच आहेत
- काम पूर्ण झालेल्या ठिकाणी राडारोडा, माती, सिमेंटचे ब्लॉक, चेंबरची झाकणे रस्त्याच्याकडेलाच पडलेली आहेत
- या कामासाठी फिल्ड मार्शल करिअप्पा रस्ता ते टपाल कार्यालय यादरम्यान असणारा बसथांबा काढलेला आहे
- त्यामुळे प्रवाशांना अक्षरशः रस्त्यावर थांबण्याची वेळ आली आहे
विलंब नेमका कोणामुळे?
वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक पोलिसांकडून रस्त्याचे काम करण्यासाठी महापालिकेस वेळेची मर्यादा घालण्यात आली होती. मात्र या मर्यादेमुळे काम पूर्ण होण्यास अडथळा येईल, असे पत्र महापालिकेकडून वाहतूक पोलिसांना पाठविण्यात आले. त्यामध्ये एक ते दीड महिना काम करण्यास अडचण आली. तसेच हा परिसर लष्करी असल्याने युद्धजन्य परिस्थितीमुळे तेथे खोदाईची कामे तात्पुरत्या स्वरूपात थांबविण्याच्या सूचना लष्कराकडून दिल्या होत्या. या कारणांमुळे रस्त्याच्या कामाला विलंब होणार असल्याचा बचाव महापालिकेच्या पथविभागाकडून करण्यात आला आहे.
संविधान चौक ते अंडी उबवणी केंद्रादरम्यानच्या कामाला पोलिसांकडून वेळेची मर्यादा घातली होती. तसेच युद्धजन्य परिस्थितीमुळेही काम करण्यास अडथळा आला होता. संबंधित काम मे महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.
- मनोज गाठे, उपअभियंता, पथ विभाग, पुणे महापालिका