
पुणे (Pune) : सिंहगड रस्त्यावरील नवीन उड्डाण पुलाचा (Sinhagad Road New Flyover) वापर सुरू झाल्यानंतर वडगाव येथील वीर बाजी पासलकर चौकात प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. (Sinhagad Road Traffic News)
त्यावर उपाययोजना करण्यास महापालिका व वाहतूक पोलिसांनी सुरुवात केली आहे. या चौकातील पोलिस चौकी हटविली जाणार आहे. तसेच स्वारगेटच्या दिशेने जाणारा रस्ता मोठा करण्यासाठी काम सुरू झाले आहे. स्वारगेटकडून धायरीकडे जाणाऱ्या सिग्नलची वेळ वाढविल्यास उड्डाण पुलावरील कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.
विठ्ठलवाडी कमान ते फनटाइम थिएटरपर्यंतचा उड्डाण पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर पासलकर चौकात मोठी कोंडी होत आहे. त्याचा फुगवटा उड्डाण पुलावर येऊन एक किलोमीटरपर्यंत वाहनांची रांग लागत आहे.
ही कोंडी टाळण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील यांनी यापूर्वी पाहणी केली. त्यानंतर आज पुन्हा एकदा पाहणी करून थेट काम सुरू करण्याचे आदेश दिले.
या वेळी महापालिकेचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, सहायक वाहतूक पोलिस निरीक्षक राजकुमार बरडे, महेश पोकळे, राहुल पोकळे, दशरथ मनेरे, सागर कोल्हे आदी यावेळी उपस्थित होते.
पोलिस चौकी हटविणार
पासलकर चौकातील कोंडी होत असल्याने त्याचा परिणाम संपूर्ण सिंहगड रस्त्यासह परिसरातील अन्य रस्त्यांवर होत आहे. पासलकर चौकातील सिग्नलची वेळ वाढविणे, चौकातील वाहतूक पोलिस चौकी हटवून ती जवळ असलेल्या शासकीय जागेत स्थलांतरित करणे, चौकाच्या समोरील गाड्या हटवून तो रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यावर चर्चा करण्यात आली.
कामांना सुरुवात
त्याचप्रमाणे धायरी फाटा येथून उड्डाण पुलापर्यंत असलेली अतिक्रमणे हटविणे, बेशिस्तीने लावलेल्या वाहनांवर कारवाई करणे, चौकातील बसथांबा हलविणे, भाजी विक्रेत्यांना पर्यायी जागा देणे यावर चर्चा होऊन या निर्णयांची त्वरित अंमलबजावणी केली जाणार आहे.
अधिकारी व नागरिकांचा पाहणी दौरा झाल्यानंतर पासलकर चौकात लगेच कामाला सुरुवात झाली. फनटाइम थिएटरच्या समोरचा गतिरोधक महापालिकेने काढून टाकला, तर दुपारपासून महापालिकेने जेसीबीच्या साह्याने पोलिस चौकीसमोरील रस्ता मोठा करण्याचे काम हाती घेतले, तर पोलिसांनी या चौकात लावलेल्या गाड्या काढून कालव्याशेजारील शासकीय विभागाच्या जागेत स्थलांतरित करण्यास सुरुवात केली आहे.
सिग्नलचा वेळ वाढविला
स्वारगेटकडून धायरीकडे जाणाऱ्या सिग्नलचा वेळ कमी असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. या चौकातील अतिक्रमण, अनधिकृत पार्किंग काढून चौक मोकळा होणार आहे. तसेच स्वारगेटच्या दिशेने जाणारा रस्ता मोठा झाल्याने अन्य रस्त्यांवरील भार कमी होईल. त्यामुळे चौकातील अन्य रस्त्यांवरील सिग्नलची वेळ कमी करून तो वेळ स्वारगेट ते धायरी या दिशेच्या सिग्नलला देण्यात आल्याने वाहतूक जलद झाली आहे.
रोज सकाळी कोंडी
पासलकर चौकातील चौकी व त्यापुढील वाहनांमुळे रस्ता अरुंद झाला. त्याचा फटका रोज सकाळी धायरीकडून स्वारगेटला जाणाऱ्या नागरिकांना बसत आहे. पासलकर चौकापासून धायरी फाट्यावरील उड्डाण पुलापर्यंत कोंडीचा फुगवटा निर्माण होतो. चौकातील रस्ता मोठा केल्याने सकाळी कामावर जाणाऱ्या नागरिकांना फायदा होणार आहे.
वडगावातील पासलकर चौकात वाहतूक सुधारणा करण्यास सुरुवात झाली आहे. सिग्नलची वेळ वाढविण्यात आली असून, चौकी स्थलांतरित करणे, चौकात नोपर्किंग करणे याबाबत कार्यवाही त्वरित करण्याचे आदेश पाटील यांनी दिले आहेत.
- अनिरुद्ध पावसकर, मुख्य अभियंता, महापालिका