
पुणे (Pune) : कात्रज चौकातील उड्डाणपुलाच्या कामामध्ये निर्माण होत असलेले अडथळे काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. चौकातील वाहतूक कोंडी आणि भूसंपादनाच्या अडथळ्यांची शर्यत पार करत उड्डाणपुलाचे काम निम्म्यांपर्यंत आले. मात्र, आता उड्डाणपूल उतरविण्यासाठी राजस सोसायटी चौकातील एकूण ११ जागा अडथळा ठरत होत्या. त्या जागा ताब्यात घेणे अत्यंत गरजेचे असताना यामधील केवळ ७ जागा ताब्यात आलेल्या आहेत. भूसंपादन विभागाकडून कामाला गती देत या जागा लवकर ताब्यात घ्याव्यात अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे.
मालमत्ता विभागाने आता जागा ताब्यात घेण्याचा चेंडू भूसंपादन विभागाच्या कोर्टात टाकला आहे. भूसंपादन विभागाकडून जागांची नुकतीच मोजणी करण्यात आली आहे. त्यानुसार भूसंपादन अधिकाऱ्यांकडून सक्तीने जागा ताब्यात घेण्याची कारवाई करण्यात येणार आहे. मोजणीनंतर भूसंपादन विभागाने हरकती आणि सूचनाही मागविल्या आहेत. त्यासाठी एक महिन्याची मुदत आहे. आतापर्यंत एकूण ४ हजार ५७७ चौ.मी. जागा अडथळा ठरत होती. त्यापैकी एकूण सुमारे ९ कोटी रुपये मोजून २ हजार १३९ चौ.मी जागा ताब्यात घेतली आहे. तर, उर्वरित निम्याहून अधिक २४३८ चौरस मीटर जागा ताब्यात घेणे बाकी आहे.
विधानपरिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांनी एकत्रित पाहणी दौरा करुन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या कार्यालयात सर्व अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक घेतल्यानंतर उड्डाणपुलाबाबत नागरिकांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. त्यावेळी भूसंपादन कायद्यान्वये जागा ताब्यात घेण्याचा निर्णयही झाला होता. मात्र, मागील दोन महिन्यापासून भूसंपादनाच्या कामाला हवी तशी गती न मिळाल्याने उड्डाणपुलाचे काम डिसेंबरअखेरपर्यंत पूर्ण होणार का याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
पुन्हा मुदतवाढीची ओढावणार नामुष्की
उड्डाणपूल उतरविण्यासाठी लागणारी संपूर्ण जागा ताब्यात घेण्यासाठी किमान सहा महिन्याचा अवधी लागणार आहे. त्यामुळे सहा महिन्याचा अवधी जागा ताब्यात येण्यास लागल्यानंतर पथविभागामार्फत पुढे किमान तीन महिने सेवा रस्ते करण्यासाठी अवधी लागेल. त्याशिवाय उड्डाणपूल उतरविता येणार नाही. कारण, वाहतूक त्या सेवा रस्त्यांवरुन वळविणे गरजेचे आहे. त्यानंतरच उड्डाणपूल उतरविण्याचे काम सुरु होईल. त्यामुळे उड्डाणपुलाच्या कामाला पुन्हा मुदतवाढीशिवाय पर्याय राहणार नाही.
जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सक्तीचे भूसंपादन करत आहोत. पुणे महापालिकेने तडजोडीने काही जागा ताब्यात घेतली आहे. उर्वरित जागेचा आम्हाला प्रस्ताव मिळाला असून त्यानुसार आम्ही कारवाईला सुरवात केली आहे. या प्रक्रियेनुसार मोजणी झाली आहे. तरीही जागा ताब्यात घेण्यासाठी किमान सहा महिन्याचा कालावधी लागणार आहे.
- श्वेता दारुणकर, विशेष भूमीसंपादन अधिकारी
उड्डाणपुलाच्या कामात सातत्याने अडथळे निर्माण होत आहेत. कामाला दोनवेळा मुदतवाढही दिली आहे. कात्रज-कोंढवा आणि चौक परिसरात सातत्याने वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिकांना हे काम लवकर व्हावे ही अपेक्षा आहे. त्यामुळे प्रशासनाने यावर लवकरात लवकर तोडगा काढून नागरिकांना दिलासा द्यावा.
- रोहन सुरवसे-पाटील, नागरिक