Mumbai : मेट्रोचा प्रवास सुसाट; बीकेसी ते आचार्य अत्रे चौक मेट्रो मार्गाचे लोकार्पण

Devendra Fadnavis
Devendra FadnavisTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या कुलाबा-वांद्रे-सीप्झ-आरे मेट्रो 3 मार्गिकेवरील टप्पा 2 अ बीकेसी ते आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानका दरम्यानच्या (9.77 किमी) सेवेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. मेट्रो तीनच्या आचार्य अत्रे चौक ते कुलाबा या मार्गावरील अंतिम टप्प्याचा शुभारंभ येत्या ऑगस्ट महिन्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली.

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : ‘नवीन नागपूर’ला मुख्यमंत्र्यांची तत्वतः मान्यता

मुंबई मेट्रो लाईन-3 (फेज 2अ - बीकेसी ते आचार्य अत्रे चौक) सेवेचा विस्तार शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बीकेसी स्थानकातून हिरवी झेंडी दाखवून केला. त्यानंतर मान्यवरांनी बीकेसी ते सिद्धीविनायक मेट्रो स्थानकादरम्यान प्रवास करत मेट्रोचा आनंद लुटला. यावेळी जपानचे महावाणिज्यदूत यागी कोजी सान, प्रभारी मुख्य सचिव राजेश कुमार, बृहन्मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, मुंबई मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे आदी उपस्थित होते. मेट्रोच्या शुभारंभानंतर मुख्यमंत्री श्री. फडणवीस माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, कुलाबा-वांद्रे-सीप्झ-आरे मेट्रो 3 च्या आरे जेव्हीएलआर ते बीकेसी  या 13 कि.मी. मार्गाचे लोकार्पण 7 ऑक्टोबर 2024 रोजी झाले. आता फेज 2अ - बीकेसी ते आचार्य अत्रे चौक मेट्रो मार्ग हा दुसरा टप्पा उद्यापासून नागरिकांसाठी खुला होणार आहे. आतापर्यंत 22 कि.मी. मेट्रो सुरू झाली आहे. मेट्रोचे काम वेगाने पूर्ण करण्यात येत असून मेट्रो तीनचे काम अंतिम टप्प्यात पोचले आहे. येत्या ऑगस्टमध्ये मेट्रो 3 च्या अंतिम टप्प्याचा मार्गावरील मेट्रो सेवा सुरू होईल. मेट्रो 3 मुंबईतील विमानतळांशीदेखील जोडली जाणार आहे.

Devendra Fadnavis
Mumbai : कोंढाणे धरणाचे 1318 कोटींचे टेंडर ‘त्या’ कंपनीकडे

मेट्रोचे काम हे अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार

मेट्रोचे काम हे अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार आहे. बीकेसी ते आचार्य अत्रे चौक हा मेट्रोचा मार्ग मिठी नदीच्या खालून जात आहे. त्याचप्रमाणे गिरगाव सारख्या गर्दीच्या ठिकाणीही मेट्रोचे काम सुरळीत झाले आहे. आता अंतिम टप्प्यातील दोन स्थानकांची कामे वेगाने सुरू आहेत. आतापर्यंतच्या मेट्रोला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. अंतिम टप्पा सुरू झाल्यानंतर कुलाबा-वांद्रे-सीप्झ-आरे या मार्गावर प्रवाशांना उत्तम कनेक्टिविटी मिळेल. या मार्गावरील सर्व मेट्रो स्थानकेही अत्याधुनिक सुविधांनीयुक्त असून प्रत्येक स्थानकावर प्रवेशासाठी अनेक प्रवेश मार्ग असल्याने गर्दीचे योग्य व्यवस्थापन होईल. तसेच मेट्रो मार्ग हे प्रदूषणमुक्त व पर्यावरणपूरक आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले. मुंबई महानगर प्रदेशात मेट्रोची कामे मोठ्या वेगाने सुरू आहेत. याद्वारे मुंबईकर तसेच महामुंबईतील नागरिकांसाठी सुलभ व अखंड परिवहन जोडणी (सिमलेस ट्रान्स्पोर्ट सिस्टीम) यंत्रणा तयार करण्याचे काम सुरू आहे. यावर्षी 50 कि.मी. तर पुढील वर्षी आणखी 50 कि.मी. मेट्रोचे काम पूर्ण करण्याचा मानस आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Devendra Fadnavis
Mumbai : केंद्राच्या 'त्या' योजनेसाठी आता नव्याने टेंडर

सिंगल प्लॅटफॉर्मवर सर्व सार्वजनिक परिवहन सेवा मिळणार

मेट्रो, बेस्ट, लोकल या सर्व सार्वजनिक वाहतूक सेवांसाठी सिंगल प्लॅटफॉर्म तयार करण्यात येत असून यातून प्रवाशांना एकाच तिकीटावर प्रवास करण्याची सुविधा मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात मुंबईत हा प्रयोग सुरू करण्यात येणार असून त्यानंतर महामुंबईतही ही सेवा देण्यात येणार आहे. सध्या यावर प्रायोगिक तत्वावर काम सुरू असून लवकरच त्याचा व्यावसायिक वापर सुरू होईल. यामुळे नागरिकांना मुंबई तसेच महामुंबई परिसरात सुलभपणे प्रवास करता येईल, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले. बेस्टने कालच गुगल सेवेबरोबर सांमजस्य करार केला आहे. यापुढे बेस्टच्या बसेसचे रिअल टाईम लोकेशन गुगलवर मिळणार असून या ठिकाणी प्रवाशांना आपल्या प्रवासाचे नियोजनही करता येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

मेट्रो प्रकल्पामुळे मुंबईकरांना दिलासा - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, मुंबईकरांसाठी आजचा दिवस आनंदाचा आहे. मेट्रोमुळे मुंबईतील लाखो नागरिकांना दिलासा मिळणार आहे. मेट्रोमुळे या मार्गावरील सुमारे चार ते पाच लाख वाहने कमी होणार आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर इंधन व वेळेची बचत होणार आहे. देशातील सर्वात मोठे मेट्रोचे जाळे मुंबईत उभारण्यात येत आहे. नागरिकांची गरज ओळखून कामे होत आहेत. त्यामुळे रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. मेट्रोची कामे पूर्ण झाल्यानंतर रस्त्यावरील 50 टक्के वाहने कमी होतील. त्यामुळे महामुंबईकरांसाठी मेट्रो प्रकल्प वरदान ठरणार आहे. 

टप्पा 2 अ - बीकेसी ते आचार्य अत्रे चौक मेट्रो मार्गाची माहिती :

- स्थानकांची संख्या - 6 (सर्व भूमिगत)

- अंतर – 9.77 किमी

- हेडवे - 6 मि 20 सेकंद

- तिकिटाचे दर - किमान भाडे रु. १०/-, कमाल भाडे रु. ४०/-

- गाड्यांची संख्या - ८

- प्रवास वेळ (बीकेसी ते आचार्य अत्रे चौक)- १५ मिनिटे २० से

- फेऱ्यांची संख्या - २४४ फेऱ्या

- प्रवास वेळ आरे जेव्हीएलआर ते आचार्य अत्रे चौक- ३६ मी

- तिकिट दर आरे जेव्हीएलआर ते आचार्य अत्रे चौक किमान भाडे रु. १०/-, कमाल भाडे रु. ६०/-

- एकूण एस्केलेटरची (सरकते जीने) संख्या (आरे जेव्हीएलआर ते आचार्य अत्रे चौक) २०८

- एकूण उद्वाहक (लिफ्ट) संख्या (आरे जेव्हीएलआर ते आचार्य अत्रे चौक) - ६७

कनेक्टिविटी

बीकेसी, वरळी यांसारख्या बिझनेस हब्सना जोडले जाणार आहे. बीकेसी स्थानक मेट्रो मार्ग 2 बी आणि बुलेट ट्रेनशी भविष्यात जोडले जाणार असून त्यामुळे प्रवासी संख्येत वाढ होणार आहे. सिद्धिविनायक मंदिर, माहीम दर्गा आणि माहीम चर्च यासारखी धार्मिक स्थळे तसेच शिवाजी पार्क, रवींद्र नाट्य मंदिर, शिवाजी मंदिर, यशवंत नाट्य मंदिर, प्लाझा सिनेमा यासारखी मनोरंजनाची ठिकाणे देखील या मेट्रो मार्गाने जोडली जाणार आहेत.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com