Nashik: गिरणा पात्रातील 8 वाळू घाटांच्या लिलावासाठी तिसऱ्यांदा टेंडर; आतापर्यंत केवळ 2 घाटांचे लिलाव

Sand (File)
Sand (File)Tendernama
Published on

नाशिक (Nashik): नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाने डिसेंबर महिन्यात राबवलेल्या वाळू घाट लिलाव प्रक्रियेत दहा पैकी केवळ दोन ठिकाणी बोलीदारांचा प्रतिसाद मिळाला. त्यात कळवण तालुक्यातील असोली व नाकोडे येथील वाळू घाटांचे लिलाव पूर्ण झाले आहेत. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाने उर्वरित आठ वाळू घाटांसाठी पुन्हा नव्याने तिसऱ्यांदा टेंडर प्रसिद्ध केले आहे. या वाळू घाट लिलावांसाठी जिल्हाधिकारी कार्यलयाने यापूर्वी ऑक्टोबर व डिसेंबर मध्ये टेंडर प्रसिद्ध केले होते.

Sand (File)
Nashik: नाशिक - त्र्यंबकेश्वर येथे गोदावरीवरील घाटांची संख्या वाढविण्याचा निर्णय

राज्य सरकारने २०२३ मध्ये नवीन वाळू धोरण जाहीर केले. त्यानुसार वाळूघाट, वाळूचे दर निश्चित करण्यात आले. मात्र, तेव्हापासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाळूघाट लिलावांना ठेकेदारांचा पुरेसा प्रतिसाद मिळत नाही. तसेच काही वाळू घाटांच्या लिलावांना स्थानिक ग्रामपंचायतींचा विरोध असल्याचेही दिसून आले आहे.

यावर्षी जिल्हाधिकारी कार्यालयाने ऑक्टोबर २०२५ मध्ये गिरणापात्रातील दहा ठिकाणांवरील वाळू घाटांच्या लिलाव प्रक्रियेसाठी ई टेंडर प्रसिद्ध केले होते. त्यावेळी या दहा वाळू घाटांपैकी केवळ दोन घाटांसाठी प्रतिसाद मिळाला होता. त्यात एका घाटासाठी एक व दुस-या घाटासाठी पाच टेंडर आले होते. त्यामुळे केवळ एका वाळू घाटासाठी आलेले टेंडर उघडण्यात आले. मात्र, त्यातही कागदपत्र अपूर्ण होते. यामुळे ती टेंडर प्रक्रिया रद्द करण्यात आली होती.

Sand (File)
Ajit Pawar: 30 टक्के निधी नियोजनासाठी अजितदादांचे 'ते' पत्र आता येणार नाही

त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने पुन्हा नव्याने डिसेंबरमध्ये टेंडर प्रसिद्ध केले होते. त्या टेंडरमध्ये केवळ दोन वाळू घाटांच्या टेंडरला प्रतिसाद मिळाला. त्यांच्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने मुदतीनंतर लिलाव पुकारले. यामुळे ६ जानेवारीस कळवण तालुक्यातील असोली येथील व १६ जानेवारी रोजी त्याच तालुक्यातील नाकोडे येथील वाळू घाट लिलाव पूर्ण झाले. या दोन ठिकाणांहून साधारण तीन हजार ब्रास वाळू उपसा करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

त्यानंतर ३ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाने तिसऱ्यांदा टेंडर प्रसिद्ध केल्यानुसार गिरणानदी पात्रातील उर्वरित आठ ठिकाणच्या वाळू घाटांचे लिलाव प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यात बागलाण तालुक्यातील नरडाणे व आघार खर्द, देवळा तालुक्यातील धांद्री व लोहोणेर तसेच मालेगाव तालुक्यातील महालपाटणे, जायखेडा येसगाव व पाटणे या ग्रामपंचायत क्षेत्रातील वाळूघाटांचा समावेश आहे. या सर्व आठ वाळूघाटांवर मिळून ३० हजार २१० ब्रास वाळू उपसा करण्यास परवानगी देण्यासाठी ई लिलाव प्रक्रिया राबवली जाणार आहे.

Sand (File)
Nashik: सिंहस्थाच्या तयारीला वेग! आत्तापर्यंत तब्बल 10 हजार 500 कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता

प्रक्रियेचे वेळापत्रक असे

३ ते ९ फेब्रुवारी २०२६ : ई-निविदा ऑनलाइन पद्धतीने स्वीकारणे सुरू.

१० फेब्रुवारी : सायंकाळी ०५.३० ला ई-टेंडर (तांत्रिक लिफाफा) उघडण्यात येईल.

११ फेब्रुवारी : ई-निविदा तांत्रिक पडताळणीनंतर वित्तीय लिफाफा उघडण्यात येईल.

१३ फेब्रुवारी ; ई-ऑक्शन (ई-लिलाव) प्रक्रिया सकाळी ११.०० पासून दुपारी १.०० पर्यंत सुरू राहील.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com