नाशिक (Nashik) : जिल्ह्यात यंदा अभूतपूर्व दुष्काळाची परिस्थिती असल्यामुळे भर पावसाळ्यातही काही तालुक्यात टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. दरम्यान दिवाळी संपताच ग्रामीण भागात टँकरच्या फेऱ्या वाढल्या असून, सद्यस्थितीला १८४ गावांमध्ये १८१ टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात असून, त्यासाठी टँकरच्या ४०९ फेऱ्या मारल्या जात आहेत. या गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी दिवसाला तब्बल १५ लाख रुपये खर्च करावा लागत आहे. एकीकडे जिल्हा टँकरमुक्त होऊन प्रत्येक घराला नळाद्वारे शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी जलजीवन मिशनच्या माध्यमातून २६०० कोटींच्या पाणी पुरवठा योजना राबवण्याची मुदत संपत आली असतानाही जिल्हा प्रशासन निव्वळ टँकरवर रोज १५ लाख रुपये खर्च करीत आहे.
नाशिक जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा जवळपास ३० टक्के कमी पाऊस झाला. त्यात पर्जन्य छायेच्या भागात कमी पाऊस झाल्याने तेथे काही ठिकाणी भर पावसाळ्यातही टँकरने पाणी पुरवठा सुरू होता. जिल्ह्यातील टंचाईची परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने टंचाई निवारण कृती आराखडा तयार केला आहे.त्यात पिण्याची पाण्याची गरज भागवण्यासाठी विहिरी अधिग्रहित करणे, टँकरने पाणी पुरवठा करणे या उपाययोजना समाविष्ट केल्या आहेत. टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठी शासनाने टँकर क्षमतेच्या प्रमाणात दर निश्चित करुन दिले आहेत. टँकरला एक टनासाठी ३.४० रुपये प्रति किलोमीटर वाहतूक दर निश्चित केला आहे. तसेच एक टन क्षमतेला टँकरला दिवसाला २७० रुपये भाडे निश्चित केले आहे. जिल्ह्यात १८१ टँकरद्वारे ४०९ टँकर फेऱ्या मारल्या जातात. त्यासाठी जिल्हा प्रशासनाला दिवसाला १२ ते १५ लाख रुपये मोजावे लागतात. एकट्या येवला तालुक्यात गेल्या दहा वर्षात सुमारे सात कोटी रुपये निव्वळ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी खर्च झाला आहे. अवर्षणप्रवण असलेला हा तालुका बिटीश सत्तेपासून दुष्काळी बिरूद घेऊन मिरवतो आहे. टँकरसोबतच तात्पुरती नळ पाणीपुरवठा योजना, विशेष दुरुस्ती, विहीर खोल व गाळ काढणे, विंधन विहीर घेणे खासगी विहीर अधिग्रहण असे मलमपट्टीचे अनेक पर्याय वर्षानुवर्षे प्रशासन राबवत आहे. मात्र, टँकरशिवाय पर्याय नसल्याचे दिसून येते. प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांवर कोट्यवधींचा खर्च होऊनही टँकर बंद झालेले नाहीत.
असे आहे टँकर भाडे
एका टँकरला एक टन पाणी क्षमतेसाठी प्रती किलो मिटर ३ रुपये ४० पैसे दर शासनाने निश्चित केला आहे. तर दिवसाला एका टनसाठी २७० रुपये टँकरचे भाडे दिले जाते. प्रत्येक फेरी साधारणत: १५ ते ५० किलो मिटरपर्यंतची असते. शासकीय दरानुसार जिल्ह्यातील सुमारे ४०९ फेऱ्यांसाठी १२ ते १५ लाख रुपये दिवसाला खर्च येतो. टँकरच्या फेऱ्यांमधील गैरप्रकार टाळण्यासाठी त्यांना जीपीएस प्रणाली बसवण्यात आली आहे. त्यांची ऑनलाईन नोंदणी केली जाते. ऑनलाईन नोंदणीशिवाय त्यांना पैसे दिले जात नाहीत, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.